आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशभरात योग महाकुंभची उत्सवी लाट : आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 ची चित्तवेधक प्रस्तावना

Posted On: 18 JUN 2025 7:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2025

21 जून 2025 रोजी साजऱ्या होत असलेल्या 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून, योग महाकुंभाच्या बॅनरखाली संपूर्ण भारतात योग उत्सवाची लाट उसळली आहे. या राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व करत नवी दिल्लीतील आरके पुरम येथील हार्टफुलनेस मेडिटेशन सेंटर मध्ये आज तीन दिवसीय योग महाकुंभाची सुरुवात झाली. कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (कॉनकॉर) आणि मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा (एमडीएनआयवाय) यांनी हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात योग प्रात्यक्षिके, वेलनेस सत्रे तसेच माइंडफुलनेस आणि कम्युनिटी वेलनेसवर लक्ष केंद्रित करणारे सांस्कृतिक सादरीकरण समाविष्ट आहे.

लडाखच्या डोंगराळ भूप्रदेशात निर्मळ वातावरणात देखील 15 जून रोजी आणखी एक ऐतिहासिक योग महाकुंभ कार्यक्रम सुरू झाला. लडाखमधील इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ योग अँड मेडिटेशन (आयएफवायएम) 2025 ने लडाख मधील पँगोंग सरोवर (13,000+ फूट), नुब्रा व्हॅली, सिंधू घाट आणि एमआयएमसी देवचन कॅम्पस, यासारख्या नयनरम्य ठिकाणी योग प्रात्यक्षिक सादर करून यापूर्वीच जगाचे आणि देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.

आयुष मंत्रालय, महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर (एमआयएमसी), लडाख केंद्रशासित प्रदेश प्रशासन, एलएएचडीसी लेह आणि संलग्न संस्थांनी संयुक्तपणे आयोजित केलेला हा महोत्सव म्हणजे, 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' या यंदाच्या संकल्पनेची सशक्त अभिव्यक्ती आहे.

उत्तर प्रदेशातील नोएडा येथेही 15 जूनपासून आणखी एक योग महाकुंभ सोहळा सुरू झाला. अरहम ध्यान योगाने नोएडाच्या सेक्टर 50 मध्ये योग महाकुंभ सुरू केला. या कार्यक्रमात हरित योग सत्रासाठी युवक आणि अनेक कुटुंबे एकत्र आली.

विविध भौगोलिक क्षेत्रातील समुदाय एकाच वेळी श्वास आणि संतुलनाद्वारे योग प्रात्याक्षिके सादर करत असताना, हे कार्यक्रम योग साधनेचे जागतिक आकर्षण आणि निरोगी, अधिक सुसंवादी जग घडवण्यामधील भारताचे नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित करतात. सर्व कार्यक्रम जनतेसाठी खुले आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी आणि योग साधनेला जीवनशैली म्हणून स्वीकारण्यासाठी नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहन आहे.


S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2137477)