आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एमडीएमआयवायतर्फे योग बंधन कार्यक्रमाचे आयोजन: जगभरातील योग दूतांनी योग प्रेरित आपला जीवनप्रवास केला सामायिक !

Posted On: 17 JUN 2025 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जून 2025

 

आंतरराष्ट्रीय योग दिन (आयडीवाय)2025 निमित्त सध्या सुरु असलेल्या कार्यक्रमांचा भाग म्हणून केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या आधिपत्याखालील मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेने आज दिनांक 17 जून 2025 रोजी ‘योग बंधन’ या  उद्घाटनपर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या 10 कार्यक्रमांपैकी एक असलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाने योगक्षेत्राशी संबंधित संस्थांदरम्यान भागीदारीच्या माध्यमातून जागतिक सहकार्य बळकट करण्याप्रती भारताची वचनबद्धता अधोरेखित केली.

‘योग बंधन’ कार्यक्रमाने जगभरातील जागतिक योगदूतांना एकत्र आणून योगाच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाणघेवाण, शैक्षणिक संवाद तसेच जागतिक स्वास्थ्यासाठी सामायिक दृष्टी निर्माण करण्याचा मंच म्हणून काम केले. या कार्यक्रमात जगभरातील 15 देशांतून आलेले योग शिक्षक, योग अभ्यासक, स्टुडिओ संस्थापक, लेखक, स्वास्थ्य तज्ञ यांच्यासह प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा उत्साही सहभाग बघायला मिळाला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनपर सत्रात केंद्रीय आयुष मंत्रालय सचिव वैद्य राजेश कोटेचा उपस्थित होते. त्यांच्या बीजभाषणात त्यांनी जागतिक स्वास्थ्यविषयक चर्चेच्या अग्रभागी योगाची स्थापना करणाऱ्या भारताच्या द्रष्ट्या नेतृत्वावर अधिक भर दिला. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयातून (एनएसएसओ) प्राप्त आकडेवारीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की भारताच्या ग्रामीण तसेच शहरी लोकसंख्येपैकी सुमारे 95% जनतेला आयुष प्रणालींची माहिती आहे आणि सुमारे 35% लोक सक्रियतेने एखाद्यातरी स्वरूपाचा योगाभ्यास सराव करत आहेत.

त्यांच्या व्यापक परदेश प्रवासाचे अनुभव सांगताना, योगाला संपूर्ण जगभरातून प्रतिसाद मिळतो आहे अशी टिप्पणी कोटेचा यांनी केली. आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 साठी आयोजित महत्त्वाच्या कार्यक्रमांअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या हरित योग, योगा कनेक्ट यांसारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांची त्यांनी तपशीलवार माहिती दिली.  जगभरात 3.3 लाख कार्यक्रम यापूर्वीच आयोजित झाले असून येत्या 21 जून रोजी होणाऱ्या आयडीवाय 2025 च्या मुख्य कार्यक्रमापर्यंत ही संख्या 5 लाखांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे याकडे त्यांनी निर्देश केला.

प्रमाणित योग व्यावसायिकांची जगभरातून येणारी वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी योग प्रमाणीकरण मंडळाच्या (वायसीबी) सध्या सुरु असलेल्या अद्ययावतीकरणाबाबत देखील त्यांनी माहिती दिली. तसेच परस्पर सहकार्य आणि विकासासाठी वायसीबीशी सहयोग करण्याबाबत त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना प्रोत्साहित केले.

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या महासंचालक के.नंदिनी सिंगला यांनी आंतरराष्ट्रीय मान्यवरांच्या सहभागाचे कौतुक केले. त्या पुढे म्हणाल्या, “प्रत्येक योगप्रेमी हा योगाचा खरा दूत असून तो योगाचे लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावत आहे. परदेशी मान्यवरांनी दिल्ली, वाराणसी,जोधपुर, जयपूर यांसारख्या महत्वाच्या शहरांमध्ये योग सादरीकरण केलेले बघणे खूप उत्साहजनक  आहे. भारताच्या सांस्कृतिक राजनैतिकतेचे हे मोठे यश आहे.”

भारताला भेट देणाऱ्या मान्यवरांसाठी कमी मुदतीचे योग अभ्यासक्रम सुरु करण्याची सुचना देखील सिंगला यांनी यावेळी केली.

आयुष मंत्रालयाच्या संयुक्त सचिव मोनालिसा दास त्यांच्या भाषणात म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय योग दिवस आता राष्ट्रीय सीमेच्या पलीकडे जाणाऱ्या, आरोग्य आणि सुसंवाद प्राप्त करण्याच्या उद्देशाने लाखो व्यक्तींना एकत्र आणणाऱ्या जागतिक चळवळीत परिवर्तीत झाला आहे.

एमडीएनआयवायचे संचालक डॉ.काशिनाथ समागंडी यांनी आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे स्वागत केले आणि ते म्हणाले, “योग बंधन हा कार्यक्रम योगाचे कालातीत ज्ञान जागतिक समुदायाशी सामायिक करण्याप्रती भारताच्या अविचल कटिबद्धतेचे दर्शन घडवतो.”

उद्घाटनपर सत्रानंतर, उपस्थित प्रतिनिधींनी एमडीएनआयवाय परिसराचा मार्गदर्शित दौरा केला, योग संवाद आणि ज्ञान विनिमय यांवर आधारित संवादी सत्रात भाग घेतला तसेच एमडीएनआयवायच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सांस्कृतिक योग मिश्र सादरीकरणामध्ये उपस्थित देखील राहिले.

उपस्थित प्रतिनिधींनी या कार्यक्रमादरम्यान योग संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या सहयोगात्मक संधींचा शोध घेतला.

आगामी काही दिवसांच्या काळात हे जागतिक योग राजदूत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, संस्थांना भेटी तसेच धोरण स्तरावरील चर्चांमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांचा हा दौरा दिनांक 21 जून 2025 रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 निमित्त आयोजित भव्य सोहोळ्यामधल्या सहभागाने  समाप्त होईल. 

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2137044)