आयुष मंत्रालय
योग कनेक्ट 2025 : एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योगाभ्यास या संकल्पनेवर आधारित प्रत्यक्ष आणि आभासी उपस्थिती अशा संमिश्र स्वरुपातील जागतिक शिखर परिषदेचे उद्या नवी दिल्ली इथे आयोजन
जगभरातील प्रमुख आंतरराष्ट्रीय योग संस्था आणि आरोग्य समुदाय प्रतिनिधींच्या आभासी माध्यमातून उपस्थितीसह 1000 पेक्षा जास्त जण होणार सहभागी
योग प्रभाव अहवाल - आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दशकभरातील प्रभावाचा अभ्यास अहवाल उद्या प्रकाशित केला जाणार
Posted On:
13 JUN 2025 5:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जून 2025
11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा आघाडीचा कार्यक्रम म्हणून आयुष मंत्रालयाच्या वतीने 14 जून 2025 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथे योग कनेक्ट ही प्रत्यक्ष आणि आभासी उपस्थिती अशा संमिश्र स्वरुपातील एका जागतिक शिखर परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने भारतासह परदेशातील योगगुरु, धोरणकर्ते, आरोग्य तज्ज्ञ, उद्योग व्यवसाय क्षेत्रातील आघाडीची व्यक्तिमत्वे, संशोधक आणि जागतिक इन्फ्ल्यूएन्सर एकत्र येणार आहेत.
योगाभ्यासाच्या क्षेत्रातील सर्वोच्च संशोधन संस्था असलेल्या केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन परिषदेकडे या शिखर परिषदेच्या समन्वयाची जबाबदारी असेल. योग कनेक्ट ही शिखर परिषद प्रत्यक्ष आणि आभासी उपस्थिती अशा संमिश्र स्वरुपात आयोजित केली जाईल. या परिषदेत 1,000 पेक्षा जास्त जण प्रत्यक्ष उपस्थित असतील, त्यांच्यासह अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय योग संस्था आणि आरोग्य समुदायांचे प्रतिनिधी आभासी पद्धतीने या परिषदेत सहभागी होतील. बहारीन, अमेरिका, ब्रिटन आणि दक्षिण कोरियासह चारपेक्षा जास्त देशांमधील तज्ञ देखील या परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत सहभागी होणार असलेली प्रत्येक व्यक्ती ही योगाभ्यास, आरोग्यसेवा, संशोधन तसेच आरोग्य क्षेत्रासारख्या आपापल्या क्षेत्रांमधील प्रतिष्ठित आणि आघाडीचे व्यक्तिमत्वे असणार आहेत. त्यांच्या सहभागाने भारताच्या योग चळवळीचे जागतिक महत्त्व अधोरेखित होणार आहे.
या शिखर परिषदेच्या निमित्ताने योग प्रभाव या अहवालाचे प्रकाशनही केले जाणार आहे. या अहवालात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्याच्या अनुषंगाने केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन परिषदेने देशभरात केलेला संशोधनात्मक अभ्यास आणि त्याअंतर्गतची निरीक्षणे असणार आहेत. या अहवालात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने देशभरात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची व्याप्ती, परिणामकारकता आणि त्याच्या परिवर्तनकारी प्रभावाबद्दलची मौल्यवान माहिती असेल, त्यामुळे हा अहवाल शिक्षणतज्ञ, संशोधक आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञांसाठी महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे.
याव्यतिरिक्त, खाली नमूद केलेल्या तीन महत्त्वाच्या ज्ञान वर्धक माहितीचे प्रकाशनही या परिषदेच्या निमित्ताने केले जाणार आहे.
योगाभ्यासाचा दशकभरातील प्रभाव (ई बुक)
योगाभ्यास विषयक संशोधनाचा वैज्ञानिक पातळीवरील विश्लेषणात्मक आणि मूल्यात्मक अहवाल
भारतीय वृक्ष वैभवम्: मूळ भारतीय वृक्षांचे महत्त्व आणि त्यांची प्रत्येक काळातील उपयुक्तता दर्शवणारे सचित्र माहितीपत्रक
या परिषदेअंतर्गत खाली नमूद विषयांवरच्या विविध सत्रांचेही आयोजन केले जाणार आहे.:
i. असंसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी योगाभ्यास
ii. कॉमन योग प्रोटोकॉल आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रभावाच्या मूल्यांकनाविषयीचे अभ्यासात्मक संशोधन
iii. योगाभ्यास आणि तंत्रज्ञान : नवोन्मेषकांचे सादरीकरण
iv. सर्वांसाठी योगाभ्यासाचा दृष्टीकोन
v. योगाभ्यास आणि त्याची उपयुक्तता
vi. योगाभ्यास आणि जीवनाच्या विविध टप्प्यांवरील महिलांचे आरोग्य
vii. योगाभ्यास विषयक वाणिज्य आणि उद्योग
स्वामी बाबा रामदेवजी, आचार्य बाळकृष्णजी, एच.आर. नागेंद्रजी, परमपूज्य भिक्खू संघसेन आणि श्री भरत भूषणजी यांसारख्या योगाभ्यासाच्या क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा सहभाग हे या परिषदेचे एक मुख्य आकर्षण असणार आहे.
योग कनेक्ट ही योगाभ्यासाच्या भविष्याला आकार देण्यासाठी काम करत असलेल्या लोकांना एकत्र आणणारी मोठी संधी ठरणार आहे. ही परिषद म्हणजे 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला, तेव्हापासून सुरू झालेल्या भारताच्या या जागतिक योग चळवळीला दहा वर्षे पूर्ण झाल्याचा सोहळा असणार आहे. योगाभ्यास ही भारताने जगाला दिलेली भेट आहे, अशा शब्दांत युनेस्कोनेही योगाभ्यासाचा गौरव केला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित होत असलेल्या अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून भारत जगासोबत आरोग्य, संतुलन आणि एकतेचा संदेश सातत्यपूर्णतेने सामायिक करत आहे.
N.Chitale/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2136206)