संरक्षण मंत्रालय
माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या पाच मुली आणि पाच मुलांचा समावेश असलेल्या एनसीसीच्या चमूचा संरक्षणमंत्र्यांनी केला सत्कार
असामान्य कामगिरी केल्याबद्दल रु. 10 लाखांचा धनादेश देऊन केला सन्मान
Posted On:
12 JUN 2025 2:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2025
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज, 12 जून 2025 रोजी, राष्ट्रीय छात्र सेनेच्या (NCC) गिर्यारोहक संघाचा सत्कार केला. या संघात सरासरी 19 वर्षे वयाच्या पाच मुली आणि पाच मुलांचा समावेश होता, ज्यांनी 18 मे 2025 रोजी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर केले. कर्नल अमित बिश्त यांच्या नेतृत्वाखाली या चमूने दाखवलेले अदम्य धैर्य, जिद्द आणि देशभक्तीचा सन्मान करण्यासाठी, तसेच खडतर परिस्थितीत कोणतीही दुखापत न होता हा पराक्रम केल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी त्यांना 10 लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला.

नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक येथे झालेल्या कार्यक्रमात या कॅडेट्सनी त्यांच्या या मोहिमेतील अनुभव सामाईक केले. खडतर प्रशिक्षण, बारकाईने केलेले नियोजन आणि मोहिमे दरम्यान आलेली आव्हाने यांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. धैर्य, शिस्त, चिवटपणा आणि संयमाच्या या परीक्षेत दिमाखदार कामगिरी करून यशस्वी झाल्याबद्दल त्यांनी या चमूची प्रशंसा केली.

तरुण पिढीसाठी हे कॅडेट्स प्रेरणास्रोत असल्याचे सांगत राजनाथ सिंह म्हणाले की, या मोहिमेद्वारे या धाडसी कॅडेट्सनी असा संदेश दिला आहे की, देशाच्या तरुणाईसाठी जगातील सर्वात उंच शिखरही मर्यादा असू शकत नाही. माउंट एव्हरेस्ट सर करताना त्यांनी जे धैर्य आणि दृढनिश्चय दाखवला, त्याच हिमतीने ते भविष्यातील आव्हानांवरही मात करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कॅडेट्समध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना रुजवण्यासाठी, तसेच त्यांना शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम बनवून आणि त्यांच्या सामाजिक कौशल्यांचा विकास करून त्यांची सर्वांगीण वाढ सुनिश्चित करण्यासाठी एऩसीसीकडून होत असलेल्या प्रयत्नांची संरक्षणमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांनी कॅडेट्सच्या कुटुंबियांनी या प्रयत्नात दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचेही कौतुक केले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांचा समावेश होता.
माऊंट एव्हरेस्टची यशस्वी चढाई करण्याची एनसीसीची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 2013 आणि 2016 मध्ये अशाच प्रकारची कामगिरी करण्यात आली होती. या मोहिमेत 10 छात्रसैनिक, अधिकाऱ्यांचे एक पथक, ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स, मार्गदर्शक आणि नॉन कमिशन्ड ऑफिसर्सचा समावेश होता. या चमूत सुभेदार मेजर बलकार सिंग, या माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या भारतीय लष्कराच्या पहिल्या सुभेदार मेजरचा समावेश होता. यातील सर्वात लहान कॅडेट केवळ 16 वर्षांचा होता.

नुकत्याच झालेल्या मोहिमेतील चमूला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 3 एप्रिल 2025 रोजी रवाना केले होते. या संपूर्ण मोहिमेदरम्यान, या चमूने सुरक्षा नियमावलीचे आणि परिचालनविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन केले ज्यामुळे प्रत्येक टप्प्यावर या चमूतील सर्व सदस्यांची सुरक्षितता सुनिश्चित झाली.
S.Kakade/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2135907)