गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीमावर्ती भागांमध्ये नुकसान झालेल्या घरांसाठी अतिरिक्त नुकसानभरपाई देण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्वरित कृतीची सुनिश्चिती करत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून 2,060 घरांसाठी 25 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद केली


पंजाबमधील सीमावर्ती भागांमध्ये देखील अशाच पद्धतीने नुकसान भरपाई देण्यात येणार

सीमाभागातील नागरिकांसोबत मोदी सरकार ठामपणे उभे आहे

Posted On: 09 JUN 2025 9:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जून 2025

 

सीमावर्ती भागांमध्ये नुकसान झालेल्या घरांसाठी अतिरिक्त नुकसानभरपाई देण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे 2,060 घरांसाठी 25 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद देऊन त्वरित कृतीची सुनिश्चिती केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच झालेल्या जाहीर कार्यक्रमात बोलताना, ऑपरेशन सिंदूर नंतर जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारामुळे ज्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांना अतिरिक्त नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली.

या संदर्भात, विशेष बाब म्हणून पंतप्रधान मोदी यांनी संपूर्णतः उध्वस्त झालेल्या प्रत्येक घरासाठी 2 लाख रुपये आणि काही प्रमाणात पडझड झालेल्या प्रत्येक घरासाठी 1 लाख रुपये अतिरिक्त नुकसानभरपाई घोषित केली. केंद्रीय गृह मंत्रालयाने या निर्णयावर तातडीने कार्यवाहीची सुनिश्चिती केली आहे. पंजाबमधील सीमावर्ती भागांमध्ये देखील अशाच पद्धतीने नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

दिनांक 29 आणि 30 मे 2025 ला केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी पूँछ भागाचा दौरा केला. या भेटीदरम्यान, अमित शाह यांनी सीमापार गोळीबारात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अनुकंपा तत्वावर नोकऱ्यांची नेमणूकपत्रे सुपूर्द केली. सीमापार गोळीबारात झालेल्या नुकसानीची नियमानुसार तातडीने भरपाई देण्यात आली.

ऑपरेशन सिंदूरपाठोपाठ जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागांमध्ये विविध ठिकाणी सीमापार गोळीबाराच्या अनेक घटनांची नोंद झाली. रहिवासी भाग, शाळा, गुरुद्वारा,मंदिरे, मशीद यांसारखी धार्मिक स्थळे तसेच व्यावसायिक मालमत्ता यांच्यावर सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारामुळे शेकडो कुटुंबांना त्रास सहन करावा लागला. घटनांचा अंदाज घेऊन परिणामकारक प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने धडाडीने उपाययोजना राबवल्या.सीमेवरील जिल्ह्यांमधून एकूण 3.25 लाख व्यक्तींना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले त्यापैकी 15,000 व्यक्तींची अन्न, पाणी, आरोग्य सुविधा, वीज इत्यादी सोयींनी सुसज्जित निवारे/निवास केंद्रे अशा ठिकाणी करण्यात आली.

सर्व सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याकरिता एकूण 394 रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली त्यापैकी 62 रुग्णवाहिका एकट्या पूँछ जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या होत्या. आरोग्यसुविधा, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, पशुधन, अत्यावश्यक वस्तू इत्यादींशी संबंधित सेवांसाठी एकूण 2818 नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2135270)