माहिती आणि प्रसारण मंत्रालय
चित्रपण रसग्रहण अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यासाठी (2025 मध्य) एफटीआयआयने दिली मुदतवाढ
आता 15 जून 2025 पर्यंत अर्ज सादर करता येणार
पुण्यात 23 जून ते 11 जुलै 2025 या काळात हा अभ्यासक्रम घेतला जाणार
Posted On:
09 JUN 2025 6:35PM by PIB Mumbai
मुंबई/पुणे, 9 जून 2025
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेने (एफटीआयआय) वर्ष 2025 च्या मध्यात होऊ घातलेल्या अत्यंत महत्त्वाच्या चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याच्या कालमर्यादेत वाढ केली आहे. हा अभ्यासक्रम पुणे येथे दिनांक 23 जून ते 11 जुलै 2025 या कालावधीत घेतला जाणार आहे. यासाठीचे अर्ज आता 15 जून 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सादर करता येतील.
संस्थेने जाहीर केलेल्या मुदतवाढीमुळे देशभरातील चित्रपट रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून अर्ज करण्यासाठी आधी जाहीर झालेली 7 जूनची मर्यादा गाठता न आलेल्या अधिकाधिक इच्छुक सहभागींना या अभ्यासक्रमात सामावून घेण्याच्या हेतूने मुदतवाढ देण्यात आली आहे. एफटीआयआय आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ – भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्यातर्फे संयुक्तपणे घेतला जाणारा हा अभ्यासक्रम भारतभरात चित्रपटविषयक शिक्षणापर्यंत पोहोचण्याच्या मार्गांचे लोकशाहीकरण करण्याच्या उद्देशाने एफटीआयआयतर्फे राबवल्या जाणाऱ्या अधिक विस्तृत प्रसारविषयक उपक्रमांचा भाग आहे.
अधिक गहन, पूर्णवेळ स्वरुपात बांधणी केलेला हा अभ्यासक्रम सहभागींना चित्रपटाचे सौंदर्य, इतिहास आणि भाषेचा रचनात्मक परिचय करून देतो. यामध्ये आठवड्याचे शेवटचे दोन दिवस वगळता इतर सर्व दिवस सकाळी साडेनऊ ते रात्री साडेआठ या कालावधीत घेण्यात येणाऱ्या सत्रांमध्ये व्याख्याने, स्क्रीनिंग तसेच चर्चा यांचा समावेश असेल.सहभागींना यावेळी 35 मिमी आणि डिजिटल स्वरूप अशा दोन्ही प्रकारांमध्ये चित्रपटांचा अनुभव घेण्याची संधी हे या अभ्यासक्रमाचे विशेष आकर्षण असेल.
या अभ्यासक्रमात चित्रपटाच्या एक कलाकृती आणि संवादाचे माध्यम अशा दोन्ही स्वरूपांचा शोध घेतला जाणार असून त्यात भारतीय तसेच जागतिक चित्रपट परंपरांवर अधिक भर दिला जाणार आहे. अभ्यासक्रमातील सहभागी निवडक क्लासिक्स-फिक्शन, नॉन-फिक्शन तसेच माहितीपट प्रकारच्या चित्रपटांच्या रसग्रहणासोबत सखोल विश्लेषणात्मक चर्चेत भाग घेतील. सुप्रसिध्द चित्रपटनिर्मात्यांसोबत सहभागींचा संवाद हा या कार्यक्रमाचा अविभाज्य भाग असेल. या अभ्यासक्रमात एफटीआयआयमधील प्रमुख व्याख्यात्यांसह प्रतिष्ठित पाहुणे प्राध्यापक देखील व्याख्याने देतील.
एफटीआयआयचे प्राध्यापकगण सदस्य इंद्रनील भट्टाचार्य आणि वैभव आबनावे या अभ्यासक्रमाचे समन्वयक असतील.भारतभरातील शिक्षक, माध्यम क्षेत्रातील व्यावसायिक, संशोधक, चित्रपट संस्थांचे सदस्य, माध्यमांशी संबंधित सरकारी अधिकारी तसेच चित्रपट रसिकांसाठी हा अभ्यासक्रम घेण्यात येत आहे.
दर्शवण्यात आलेले स्वारस्य आणि चित्रपट तसेच माध्यम संबंधित क्षेत्रांमध्ये असलेला अनुभव यांच्या आधारावर आलेल्या अर्जांची छाननी होईल. परगावी राहणाऱ्या सहभागींसाठी मर्यादित संख्येत वसतिगृहाची सोय उपलब्ध आहे मात्र ही सोय पुरवताना दिव्यांग आणि महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. उर्वरित उमेदवारांनी पुण्यात त्यांचा प्रवास, निवास आणि जेवण्याचा खर्च स्वतः करणे अपेक्षित आहे.
इच्छुक उमेदवारांनी खालील लिंकद्वारे उपलब्ध अर्ज भरावा:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScJXSd_n0o7n5CBo6yVVRODFgQEx4AcpqeBeSIM8d1LsOJrcQ/viewform
अभ्यासक्रमाचे शुल्क, पात्रता तसेच शुल्क भरण्याची प्रक्रिया यांचे तपशील जाणून घेण्यासाठी कृपया एफटीआयआयच्या खालील अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी:
https://ftii.ac.in/p/vtwa/film-appreciation-course-mid-year-2025-23-june-11-july-2025
* * *
(Source: FTII) | PIB Mumbai | N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2135205)