माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी व्हिएतनामच्या प्रतिनिधीमंडळाची घेतली भेट
भारत आणि व्हिएतनाम दरम्यान माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर सहमती
Posted On:
05 JUN 2025 6:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2025
केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीव्ही) पोलिटब्युरो सदस्य आणि सीपीव्हीच्या केंद्रीय माहिती, शिक्षण आणि जनसंपर्क आयोगाचे अध्यक्ष गुयेन ट्रोंग नगिया, यांच्या नेतृत्वाखालील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ यांच्यात आज नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत भारत आणि व्हिएतनाम दरम्यान माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर सहमती झाली. बैठकीला माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्यासह उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.

भारत आणि व्हिएतनाम दरम्यान घनिष्ठ आणि स्नेहमय द्विपक्षीय संबंधांची परंपरा आहे.2022 साली दोन्ही देशांनी राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचे 50 वे वर्ष साजरे केले. 2016 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिएतनाम भेटीदरम्यान भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांचे रूपांतर 'व्यापक धोरणात्मक भागीदारी'मध्ये झाले.

जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, 2025 (1 - 4 मे, 2025) मध्ये व्हिएतनामच्या मोठ्या प्रतिनिधीमंडळाने नोंदवलेल्या सहभागाची केंद्रीय राज्यमंत्र्यांनी प्रशंसा केली. गुयेन ट्रोंग नगिया यांनी भारत ही जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आल्याबद्दल प्रशंसा केली आणि दोन्ही देशांमधील मजबूत मैत्री आणि भागीदारीवर भर दिला. या बैठकीत दोन्ही देशांच्या माध्यम संस्थांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. दोन्ही देशांनी सामायिक बौद्ध वारशासह, परस्परांच्या संस्कृतीमधील दृढ संबंधांवर भर दिला आणि एकमेकांबरोबरचे बहुआयामी सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करण्यावर सहमती दर्शवली.
S.Kane/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2134291)