संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑपरेशन सिंदूर हा दहशतवादाविरुद्ध भारताचा थेट प्रहार आहे; जर पाकिस्तानने काही आगळीक केली  तर त्याला भारतीय नौदलाच्या मारक क्षमतेचा  सामना करावा लागेल: आयएनएस विक्रांतवरून  संरक्षण मंत्र्यांचा इशारा


“ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही; हा फक्त एक विराम आहे”

दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक पद्धतीचा  वापर करण्यास भारत मागेपुढे पाहणार नाही-  राजनाथ सिंह

“जर पाकिस्तान चर्चेबाबत गंभीर असेल, तर त्याने हाफिज सईद आणि मसूद अझहर यांना भारताच्या हवाली करावे जेणेकरून न्याय होईल   ”

“नौदल हे रणनीतीविषयक सामर्थ्य  बनले  आहे जे  हिंद महासागर क्षेत्रात भारताचे अस्तित्व बळकट करते;  शत्रूला इशारा देते की भारत आता केवळ एक प्रादेशिक शक्ती नाही, तर ती एक जागतिक शक्ती बनत आहे”

Posted On: 30 MAY 2025 1:18PM by PIB Mumbai

 

ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी कारवाई नाही, तर दहशतवादाविरुद्ध भारताचा थेट प्रहार आहे आणि जर पाकिस्तानने कोणतीही  आगळीक   केली  तर यावेळी त्यांना भारतीय नौदलाच्या मारक क्षमतेचा आणि त्वेषाचा सामना करावा  लागेल ,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज 30, मे 2025 रोजी गोवा किनाऱ्यावर भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवरून  अधिकारी आणि नौदलाच्या जवानांना संबोधित करताना सांगितले.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय नौदलाने "मूक सेवेचे" कौतुक करताना, संरक्षण मंत्री म्हणाले की, शक्तिशाली कॅरियर बॅटल ग्रुपने हे सुनिश्चित केले की पाकिस्तानी नौदल धोकादायक पाऊल उचलणार  नाही  अन्यथा त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले असते. त्यांनी पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला की जर त्यांनी वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला तर भारताकडून प्रत्युत्तराची कारवाई नौदलाच्या हाती असेल. 

राजनाथ सिंह यांनी निक्षून सांगितले  की पाकिस्तानने हे समजून घेतले पाहिजे की स्वातंत्र्यापासून ते  दहशतवादाचा जो  धोकादायक खेळ खेळत आहेत , त्याची वेळ आता संपली आहे. "आता, जर पाकिस्तानने भारताविरुद्ध कोणतेही दहशतवादी कृत्य केले तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि पराभवाला सामोरे जावे लागेल. दहशतवादाचा धोका समूळ  नष्ट करण्यासाठी भारत  प्रत्येक पद्धतीचा वापर करेल, त्यासाठी भारत मागेपुढे पाहणार नाही." असे ते म्हणाले.

संरक्षण मंत्री म्हणाले की, पाकिस्तानी भूमीतून उघडपणे भारतविरोधी कारवाया केल्या जात आहेत आणि  भारत सीमा आणि समुद्र दोन्ही बाजूंनी दहशतवाद्यांविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहे. आज संपूर्ण जग भारताच्या नागरिकांचे दहशतवादापासून संरक्षण करण्याचा भारताचा अधिकार मान्य करत आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तानने त्याच्या भूमीवर फोफावत असलेल्या दहशतवादाची पाळेमुळे स्वतःच्या हातांनी उखडून टाकावीत यावर त्यांनी भर दिला.

हाफिज सईद आणि मसूद अझहर सारख्या दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले. "हे दोघेही केवळ भारताच्या 'मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या' यादीत नाहीत तर संयुक्त राष्ट्रांनी निर्देशित केलेल्या  दहशतवादी सूचीत देखील ते आहेत. मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अलीकडेच भारतात आणण्यात आले आहे. हाफिज सईद देखील मुंबई हल्ल्यातील दोषी आहे आणि त्याला शिक्षा झालीच  पाहिजे," असे ते म्हणाले.

पाकिस्तानकडून वारंवार चर्चेची मागणी केली जात आहेत्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा स्पष्ट केले की, "जर चर्चा होणार असेल तर ती केवळ  दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरच होईल. जर पाकिस्तान चर्चेबाबत गंभीर असेल तर त्यांनी हाफिज सईद आणि मसूद अझहर सारख्या दहशतवाद्यांना भारताच्या हवाली  करावे जेणेकरून न्याय होईल. "

एकात्मिक मोहिमेतील भारतीय नौदलाची भूमिका कौतुकास्पद असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. जेव्हा भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी भूमीवरील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले तेव्हा अरबी समुद्रात नौदलाची आक्रमक तैनाती, त्यांची अतुलनीय सागरी क्षेत्र सतर्कता  आणि वर्चस्व यामुळे पाकिस्तानी नौदल त्यांच्याच किनाऱ्यापुरते सीमित  राहिले. "पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 96  तासांच्या आत समुद्रात तैनात असलेल्या आमच्या पश्चिमी ताफ्याच्या जहाजांनी पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावर जमिनीवरून जमिनीवर आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा आणि टॉर्पेडोचा यशस्वी मारा केला. यातून आपले प्लॅटफॉर्म, प्रणाली आणि कर्मचाऱ्यांची युद्ध सज्जता  आणि आपला इरादा  आणि सज्जता दिसून आली, ज्याने  शत्रूला बचावात्मक स्थितीत येण्यास भाग पाडले," असे ते म्हणाले.

कॅरियर बॅटल ग्रुपच्या सैन्य तैनातीतून भारताचा हेतू आणि क्षमता प्रभावीपणे दिसून येते असेही संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. भारतीय नौदलाचे प्रचंड सामर्थ्य, त्याचे लष्करी कौशल्य आणि विध्वंसक क्षमता यांनी शत्रूचे मनोबल खचले, असे त्यांनी नमूद केले. भारतीय भूमीवर कोणताही दहशतवादी हल्ला झाल्यास 'युद्ध' मानले जाईल आणि त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाईल, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्पष्ट संदेशाचा पुनरुच्चार करून त्यांनी नौदलाला त्यांच्या सज्जतेत कोणतीही कसर न सोडण्याचे आवाहन केले.

ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही; सध्या फक्त एक विराम आहे, एक इशारा आहे. जर पाकिस्तानने पुन्हा तीच चूक केली तर भारत अधिक कठोर कारवाई करेल असा पुनरुच्चार राजनाथ सिंह यांनी केला. 

ऑपरेशन सिंदूर दरम्यान सशस्त्र दलांचा वेग , दृढता आणि स्पष्टतेचे कौतुक करताना, संरक्षणमंत्री म्हणाले की अचूक हल्ल्यांनी तिन्ही सेवादलांमधील तसेच मंत्रालये आणि सरकारी संस्थांमधील अव्याहत समन्वय प्रतीत झाला. या कारवाईने दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आश्रयदात्यांना स्पष्ट संदेश दिला की भारत आता सहन करणार नाही आणि चोख उत्तर देईल असेही त्यांनी नमूद केले. "अत्यंत अल्पावधीत, आम्ही पाकिस्तानचे दहशतवादी तळ आणि त्यांचे मनसुबे धुळीस मिळवले. आमचा प्रतिसाद इतका जोरदार होता की पाकिस्तानने थांबण्याची विनंती केली. आम्ही आमच्या स्वतःच्या अटींवर आमच्या लष्करी कारवाई थांबवली " असे ते म्हणाले.

ऑपरेशन सिंदूर नंतर लष्कर आणि हवाई दलाच्या जवानांशी  आणि आता नौदल योद्ध्यांशी संवाद साधताना राजनाथ सिंह यांनी समाधान व्यक्त केले की भू, जल किंवा आकाश कुठेही, भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.

भाषणाचा समारोप करताना संरक्षण मंत्र्यांनी उद्धृत केले की, "आज, आपण अशा युगात आहोत जिथे युद्धे केवळ गोळ्या आणि बॉम्बने लढली जात नाहीत, तर सायबर स्पेस, डेटा वर्चस्व आणि धोरणात्मक प्रतिबंधाद्वारे देखील लढली जातात. या क्षेत्रात नौदल प्रगती करत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे." भारतीय नौदल हे केवळ हिंद महासागराचे संरक्षक नव्हे तर या प्रदेशात भारताचे अस्तित्व बळकट करणारी रणनीतीच्या दृष्टीने एक  शक्ती म्हणून त्यांनी भारतीय नौदलाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते शत्रूला इशारा देते की भारत आता केवळ एक प्रादेशिक शक्ती राहिलेली नाही तर जागतिक शक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे ते म्हणाले.

आयएनएस विक्रांतवर, राजनाथ सिंह यांच्यासोबत नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी; फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ पश्चिम नौदल कमांड व्हाइस ॲडमिरल संजय जे. सिंह आणि भारतीय नौदलाचे इतर वरिष्ठ अधिकारी होते.

संरक्षण मंत्री 29 मे 2025 रोजी गोव्यात पोहोचले आणि ऑपरेशन सिंदूरच्या सुरुवातीच्या टप्प्यात सहभागी झालेल्या भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. आयएनएस विक्रांत व्यतिरिक्त, त्यांनी कॅरियर बॅटल ग्रुपचा भाग असलेल्या आणि पाकिस्तानी नौदलाच्या तुकड्यांना सीमित करत मकरन किनाऱ्याजवळच राहण्यास  भाग पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या इतर प्रमुख आघाडीच्या युद्धनौकांना त्यांनी भेट दिली.

आयएनएस हंसा येथे आगमन झाल्यावर, राजनाथ सिंह यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर त्यांना सागरी आघाडीवरील कार्यान्वयनाच्या प्रगतीबद्दल आणि सागरी पथकांच्या एकूण सज्जतेविषयी अवगत करण्यात आले.

***

N.Chitale/S.Kane/V.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2132775)