माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळाची कोरिया प्रजासत्ताकाला (ROK) भेट

Posted On: 26 MAY 2025 5:07PM by PIB Mumbai

 

खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळाने ऑपरेशन सिंदूरवरील आपल्या बैठकीची सुरुवात भारताचे कोरियामधील राजदूत अमित कुमार यांच्या निवेदनाने केली. या बैठकीच्या आयोजनामागे कोरिया-विशिष्ट दृष्टिकोन आहे यावर अमित कुमार यांनी प्रकाश टाकला. यातून दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या भारताच्या भूमिकेचा मजबूत संदेश सर्वांपर्यंत पोहोचवणे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.

2. या शिष्टमंडळाने कोरियामधील भारतीय समुदायाशी संवाद साधला आणि ऑपरेशन सिंदूरबद्दलचे आपले विचार सामायिक केले. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्टपणे विशद केले. भारतात सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांवरही शिष्टमंडळाने प्रकाश टाकला. या हल्ल्याला भारताने दिलेला प्रारंभिक प्रतिसाद तसेच त्यानंतरची कारवाई नेमकी, लक्ष्यित, तणाव टाळणारी आणि जबाबदार होती, हे शिष्टमंडळाने अधोरेखित केले. दहशतवादाविरुद्ध भारताच्या तत्वनिष्ठ आणि दृढ भूमिकेला दुजोरा देत,शिष्टमंडळाने पुनरुच्चार केला की दहशतवाद आणि संवाद एकत्र राहू शकत नाही.

3. शिष्टमंडळाने माजी कोरियाई परराष्ट्र मंत्री डॉ. यून यंग-क्वान, माजी परराष्ट्र उपमंत्री चो ह्युन, भारतातील कोरियाचे माजी राजदूत शिन बोंग-किल आणि ली जून-ग्यु, संसदीय परराष्ट्र व्यवहार समितीचे रँकिंग सदस्य प्रतिनिधी किम गन आणि राष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्राचे संचालक मेजर जनरल शिन सांग-ग्युन यांच्यासह प्रख्यात कोरियन मान्यवरांशी वस्तुनिष्ठ संवाद साधला. शिष्टमंडळाने कोरियाई मान्यवरांना पहलगाममधील दहशतवादाच्या भयानक कृत्याबद्दल तसेच त्यानंतर भारताने केलेल्या नेमक्या आणि तणावविरहित कारवाईबद्दल माहिती दिली. वित्तीय कारवाई कार्यदलासह (एफएटीएफ) आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सुधारणात्मक कारवाई करण्याची गरज देखील या शिष्टमंडळाने अधोरेखित केली. दहशतवादाविरुद्ध भारताच्या अटींवर जलद आणि निर्णायक प्रत्युत्तर देण्याच्या भारताच्या "न्यू नॉर्मल" ची शिष्टमंडळाने पुष्टी केली. दहशतवादी आणि दहशतवादाचे प्रायोजक यांना वेगळे मानले जाऊ शकत नाही, हे शिष्टमंडळाने अधोरेखित केले. कोरियन प्रतिनिधींनी दहशतवादाला आपला ठाम विरोध व्यक्त केला आणि भारताच्या भूमिकेप्रति सहमती व्यक्त केली.

४. हे शिष्टमंडळ उद्या कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, कोरियाच्या राष्ट्रीय संसदेतील नेते, कोरियातील आघाडीच्या विचारसरणीच्या संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधणार आहे आणि त्यानंतर स्थानिक प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहे.

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2131478)