आयुष मंत्रालय
पारंपरिक औषध उपचार पद्धतीवरील एका ऐतिहासिक कराराद्वारे आयुषला जागतिक स्तरावर मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारताची जागतिक आरोग्य संघटनेसोबत भागीदारी
या उपक्रमामुळे आयुष वैज्ञानिक पद्धतीने जगभरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल : पंतप्रधान
Posted On:
25 MAY 2025 6:05PM by PIB Mumbai
पारंपरिक औषध प्रणालींच्या जागतिक दर्जात बदल घडवून आणण्यासाठी सज्ज असलेले एक ऐतिहासिक पाऊल टाकत, 24 मे 2025 रोजी आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्यात एक करार करण्यात झाला. आंतरराष्ट्रीय आरोग्य उपाय वर्गीकरणांतर्गत (ICHI)समर्पित पारंपरिक औषध प्रारुपावरील कामाची सुरुवात या कराराद्वारे दिसून येते.
मन की बातच्या 122 व्या भागात या कामगिरीचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की : "मित्रांनो, आयुर्वेदाच्या क्षेत्रातही असे काही घडले आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला खूप आनंद होईल. कालच, म्हणजे 24 मे रोजी, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक आणि माझे मित्र तुलसीभाई यांच्या उपस्थितीत एक सामंजस्य करार झाला. या कराराशिवाय, आरोग्य उपायांच्या आंतरराष्ट्रीय वर्गीकरणा अंतर्गत एका समर्पित पारंपरिक औषध प्रारुपावर काम सुरू झाले आहे. या उपक्रमामुळे आयुष वैज्ञानिक पद्धतीने जगभरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल."
जागतिक आरोग्य संघटनेच्या रोगांच्या आंतरराष्ट्रीय वर्गीकरणाला (ICD-11) पूरक असलेले आंतरराष्ट्रीय आरोग्य उपाय वर्गीकरण (ICHI), कोणते उपचार आणि आरोग्य उपाय केले जातात याचे दस्तऐवजीकरण करते. पारंपरिक औषध प्रारुपाच्या समावेशासह, आयुर्वेद, योग, सिद्ध आणि युनानी प्रणालींमधील उपचारपद्धती - जसे की पंचकर्म, योग चिकित्सा, युनानी चिकित्सा आणि सिद्ध प्रक्रिया - आता जागतिक स्तरावर प्रमाणित पद्धतींच्या रुपात ओळखल्या जातील.
यामुळे अनेक फायदे होतील:
● आयुष सेवांसाठी पारदर्शक बिलिंग आणि वाजवी किंमत.
● आरोग्य विमा संरक्षणात आयुष उपचारांचे सुलभ एकत्रीकरण.
● रुग्णालय व्यवस्थापन, क्लिनिकल दस्तऐवजीकरण आणि आरोग्य संशोधन वाढवणे.
● सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आयुष उपचारांसंदर्भात अधिक जागतिक सुलभता.
हा विकास भारताच्या पारंपरिक ज्ञानाचा समृद्ध वारसा जागतिक आरोग्य सेवांच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असून याला वैज्ञानिक वर्गीकरण आणि आंतरराष्ट्रीय मानकांचे समर्थन आहे.
या कराराचे स्वागत करताना, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी एक्स या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
"पारंपरिक औषध आणि आरोग्य उपायांच्या आंतरराष्ट्रीय वर्गीकरणासाठी @WHO च्या कामासाठी #India कडून 30 लाख डॉलर्स योगदानासाठी @moAyush सचिव वैद्य राजेश कोटेचा यांच्याशी करार करताना आनंद होत आहे. #HealthForAll साठी 🇮🇳 च्या निरंतर वचनबद्धतेचे आम्ही स्वागत करतो."
रोगांच्या आंतरराष्ट्रीय वर्गीकरणाला (ICD-11) आणि उपचारांच्या नवीन आंतरराष्ट्रीय आरोग्य उपाय वर्गीकरण (ICHI) प्रारुपाचा एकत्रित परिणाम म्हणून आयुष, जागतिक आरोग्य सेवा प्रणालींचा एक अविभाज्य, पुराव्यावर आधारित आणि धोरण-मान्यताप्राप्त भाग बनेल याची खात्री करेल.
हे केवळ कोडिंग अपडेटपेक्षा जास्त असून ते भारताच्या पारंपरिक उपचार प्रणालींद्वारे परवडणाऱ्या, सुलभ आणि विश्वासार्ह आरोग्यसेवेच्या दिशेने एक परिवर्तनकारी पाऊल आहे.
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2131207)