संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केरळ किनारपट्टीजवळ धोकादायक माल वाहून नेणारे लिबेरियन कंटेनर जहाज बुडाले; आयसीजी आणि भारतीय नौदलाकडून सर्व 24 खलाशांची यशस्वी सुटका

Posted On: 25 MAY 2025 11:45AM by PIB Mumbai

 

लिबेरियन कंटेनर जहाज एमएससी इएलएसए 3 (आयएमओ नं. 9123221) आज 25 मे 2025 रोजी सकाळी सुमारे 0750 वाजता कोची किनाऱ्याजवळ बुडाले. जहाजावरील सर्व 24 खलाशांना वाचवण्यात आले असून त्यापैकी 21 जणांना

आयसीजीने (भारतीय तटरक्षक दल) वाचवले, तर उर्वरित 3 जणांना भारतीय नौदलाच्या आयएनएस सुजाता जहाजाने वाचवले. जहाजाबरोबर 640 कंटेनर बुडाले असून त्यामध्ये 13 कंटेनर धोकादायक मालाने भरलेले होते, आणि 12 कंटेनरमध्ये कॅल्शियम कार्बाईड होता. जहाजात 84.44 मेट्रिक टन डिझेल आणि 367.1 मेट्रिक टन फर्नेस तेल देखील होते.

केरळच्या किनाऱ्यावरील संवेदनशील सागरी परिसंस्थेच्या पार्श्वभूमीवर, आयसीजीने पूर्ण प्रदूषण प्रतिसाद तयारी सक्रिय केली आहे. तेल सांडणे ओळखण्याच्या प्रगत प्रणालीने सुसज्ज आयसीजीचे विमान हवाई देखरेख करत आहे, तर प्रदूषण प्रतिसाद उपकरणांनी सज्ज आयसीजीचं जहाज ‘सक्षम’ घटनास्थळी तैनात आहे. सध्या तरी कोणत्याही प्रकारच्या तेल सांडण्याची नोंद झालेली नाही. ही आपत्कालीन परिस्थिती 24 मे रोजी सुरू झाली, जेव्हा एमएससी इएलएसए 3 हे जहाज विझिंजमहून कोचीकडे जात असताना, कोचीच्या दक्षिण-पश्चिमेस सुमारे 38 नॉटिकल मैलांवर ते 26 अंशांनी डावीकडे कलले. जहाजाची स्थिरता बिघडल्यामुळे मदतीसाठी संदेश पाठवण्यात आला. कोचीतील आयसीजीच्या सागरी आपत्कालीन प्रतिसाद उपकेंद्राने ( एमआरएससी) तात्काळ समन्वयित प्रतिसाद सुरू केला. हवाई देखरेखीसाठी आयसीजीचे डॉर्नियर विमान पाठवण्यात आले. त्यांना दोन जीवन रक्षक नौकेमध्ये असलेले खलाशी आढळले. आयसीजीची गस्त जहाजे आणि व्यापारी जहाजे एमव्ही हान यी व एमएससी सिल्व्हर 2 यांनाही आंतरराष्ट्रीय शोध व बचाव शिष्टाचारानुसार मदतीसाठी वळवण्यात आले.

संध्याकाळपर्यंत, रशिया, युक्रेन, जॉर्जिया आणि फिलिपिन्स येथील नागरिकांसह 24 पैकी 21 खलाशी वाचवण्यात आले. उर्वरित तीन वरिष्ठ खलाशी जहाजाच्या बचावासाठी आवश्यक तयारीकरीता जहाजावर थांबले होते. मात्र रात्रीच्या सुमारास जहाजाची स्थिती अधिकच बिघडली आणि ते 25 मे 2025 रोजी उलटले. त्यानंतर उर्वरित तीन खलाशांना जहाज सोडावे लागले आणि त्यांना INS सुजाता द्वारे वाचवण्यात आले. जहाज कलण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

***

NM/N.Gaikwad/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2131097)