नौवहन मंत्रालय
लिंगभाव समानतेप्रति वचनबद्धता बळकट करत भारताने साजरा केला 'सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांसाठीचा आंतरराष्ट्रीय दिन'
Posted On:
18 MAY 2025 6:20PM by PIB Mumbai
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी 'सागर में सम्मान' या केंद्र सरकारच्या एका धोरणात्मक उपक्रमाचे अनावर केले. सागरी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्याच्या तसेच भविष्यासाठी सज्ज असणारे सागरी कार्यबल तयार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आज मुंबईत सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांसाठीच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दिन समारंभात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात सागरी क्षेत्राची समावेशकता, कायापालट आणि शाश्वततेचा स्पष्ट संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सागरी परिसंस्थेत वाढ आणि लवचिकता वाढविण्यासाठी महिलांना सक्षम बनवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सोनोवाल यांनी कार्यक्रमात सुमारे 100 महिला खलाशांच्या गटाशी संवाद साधला.
“सागरी क्षेत्रात महिलांची भरती, नोकरी कायम राखणे आणि शाश्वत रोजगाराद्वारे त्यांचा गौरव करण्यासाठी हा दिवस आवश्यक आहे, असे या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना यावर्षी 'महिलांसाठी संधींचा महासागर' या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम आयोजित करत आहे. ही संकल्पना, जागतिक सागरी दिन 2025 च्या ‘आपला महासागर, आपले कर्तव्य, आपली संधी’ या संकल्पनेशी सुसंगत आहे, असेही त्यांनी सांगितले. आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि सागरी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांची उपस्थिती मजबूत करण्यासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
“सागरी क्षेत्रात महिलांचे सक्षमीकरण करणे ही बाब केवळ समानतेशी संबंधित नाही तर ती एक धोरणात्मक गरज आहे. त्यांचे नेतृत्व या क्षेत्रासाठी नवोन्मेष, शक्ती आणि अधिक शाश्वत भविष्य प्रदान करते, असे आकडेवारीचा दाखला देत सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले. राष्ट्र उभारणीच्या कार्यात अविश्वसनीय योगदानासाठी आपली नारी शक्ती नवीन भारताचा एक मूलभूत आधारस्तंभ आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. ‘सागर में सम्मान’ हा उपक्रम सागरी क्षेत्रात अधिकाधिक महिलांना सामील होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठीच आहे.”
'सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांसाठीचा आंतरराष्ट्रीय दिन’समारंभात, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भारतीय सागरी क्षेत्रातील 10 उत्कृष्ट महिलांचा गौरव आणि सत्कार केला.




***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2129496)