संरक्षण मंत्रालय
दहशतवादाविरोधातील भारताची लढाई हा आता राष्ट्रीय संरक्षण सिद्धांताचा एक भाग असून, आम्ही हे हायब्रीड आणि प्रॉक्सी युद्ध मुळापासून उखडून टाकू - भुज येथील हवाई दल तळाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली भेट
Posted On:
16 MAY 2025 2:06PM by PIB Mumbai
“दहशतवादाविरोधातील भारताची लढाई हा केवळ सुरक्षेचा विषय नसून, तो आता राष्ट्रीय संरक्षण सिद्धांताचा एक भाग बनला आहे, आणि आम्ही हे हायब्रीड आणि प्रॉक्सी (बनावट) युद्ध मुळापासून उखडून टाकू," असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 16 मे 2025 रोजी गुजरातमधील भुज हवाई दल तळावर हवाई योद्ध्यांना संबोधित करताना सांगितले. सध्याची शस्त्रसंधी म्हणजे, भारत पाकिस्तानची त्याच्या वर्तणुकीच्या आधारावर चाचणी घेत आहे. वागणूक सुधारली तर ठीक, पण त्यामध्ये कसूर झाली तर कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असे ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर अद्याप संपले नाही, असे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. आमची कृती ही चित्रपटाची केवळ एक झलक होती. आवश्यकता भासली, तर आम्ही संपूर्ण चित्रपट दाखवू. दहशतवादावर हल्ला करणे आणि तो समूळ नष्ट करणे, ही ‘न्यू इंडियाची’ ‘न्यू नॉर्मल’ गोष्ट आहे, असे ते म्हणाले.

पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताने उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी सुरू केली आहे, असे सांगून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) इस्लामाबादला दिलेल्या एक अब्ज डॉलरच्या मदतीचा पुनर्विचार करावा आणि भविष्यात देखील कोणतीही मदत देऊ नये, असे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले.
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर, याला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केले आहे, तरीही पाकिस्तान, आपल्या नागरिकांकडून गोळा केलेला कर, मसूद अझर याला सुमारे 14 कोटी रुपये देण्यासाठी खर्च करणार आहे. पाकिस्तान सरकारने मुरीदके आणि बहावलपूर येथील लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी आर्थिक मदतीची घोषणाही केली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे, आयएमएफ ने दिलेल्या एक अब्ज डॉलरच्या मदतीचा मोठा भाग दहशतवादी पायाभूत सुविधांना निधी पुरवण्यासाठी वापरला जाईल. आयएमएफ या आंतरराष्ट्रीय संघटनेने अप्रत्यक्षपणे केलेली ही मदतच नव्हे का? पाकिस्तानला मिळणारी कोणतीही आर्थिक मदत टेरर फंडिंगपेक्षा (दहशतवादाला वित्त पुरवठा) कमी नाही. भारत आयएमएफला जो निधी देतो, त्याचा वापर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे पाकिस्तान किंवा अन्य कोणत्याही देशात दहशतवादी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी करू नये, असे ते म्हणाले.

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाने बजावलेल्या प्रभावी भूमिकेचा संरक्षण मंत्र्यांनी विशेष उल्लेख केला, ज्याची जगभरात प्रशंसा होत आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ अवघ्या 23 मिनिटांत उद्ध्वस्त केल्याबद्दल हवाई योद्ध्यांची प्रशंसा करताना ते म्हणाले की, जेव्हा शत्रूच्या हद्दीत क्षेपणास्त्रे डागण्यात आली, तेव्हा जगाला भारताचे शौर्य आणि पराक्रमाचा प्रतिध्वनी ऐकू आला. ते पुढे म्हणाले की, भारतीय हवाई दलाने दहशतवादाविरोधातील या मोहिमेचे नेतृत्व केले, आणि या मोहिमेदरम्यान त्यांनी केवळ शत्रूवर वर्चस्व गाजवले नाही, तर त्यांचा नाश केला.
राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले की भारताची लढाऊ विमाने सीमा न ओलांडताच पाकिस्तानच्या प्रत्येक कोपऱ्यावर हल्ला करण्यास सक्षम आहेत. "जगाने पाहिले आहे की भारतीय हवाई दलाने दहशतवादी तळ आणि नंतर पाकिस्तानचे हवाई तळ कसे उद्ध्वस्त केले! भारताचे युद्ध धोरण आणि तंत्रज्ञान बदलल्याचे पुरावे भारतीय हवाई दलाने दिले आहेत. त्यांनी नवीन भारताचा संदेश दिला की आपण केवळ परदेशातून आयात केलेल्या शस्त्रास्त्रांवर आणि उपकरणांवर अवलंबून नाही, तर भारतात बनलेली उपकरणे आपल्या लष्करी शक्तीचा भाग बनली आहेत. भारतात बनलेली शस्त्रे देखील अभेद्य आहेत," असे ते म्हणाले.

संरक्षणमंत्री पुढे म्हणाले की, पाकिस्तानने स्वतः 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राचे सामर्थ्य मान्य केले आहे. या मेड इन इंडिया क्षेपणास्त्राने पाकिस्तानला रात्रीच्या अंधारात दिवसाचा प्रकाश दाखवला, असे ते म्हणाले. त्यांनी भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे कौतुक केले, ज्यामध्ये डीआरडीओने बनवलेल्या आकाश आणि इतर रडार प्रणालींनी अलौकिक भूमिका बजावली आहे.
श्रीनगरमधील बदामी बाग छावणी येथे काल भारतीय लष्कराच्या शूर सैनिकांशी आणि आज भूज येथे हवाई योद्धे आणि सैनिकांशी झालेल्या संवादाबद्दल संरक्षण मंत्री म्हणाले की, त्यांना पुन्हा एकदा खात्री पटली आहे की भारताच्या सीमा पूर्णपणे सुरक्षित आहेत. "दोन्ही आघाड्यांवरील सैनिकांमध्ये मी अपार उत्साह आणि देशभक्ती पाहिली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपल्या सैन्याने जे केले त्यामुळे देश अभिमानाने भरून गेला आहे," असे ते म्हणाले.
राजनाथ सिंह म्हणाले की, दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत भारतातील जनता, सरकार, सशस्त्र दले आणि इतर सुरक्षा संस्थांनी एकता आणि समजूतदारपणा दाखवला तसेच प्रत्येक नागरिकाने सैनिकाप्रमाणे सहभाग नोंदवला. त्यांनी सांगितले की सरकार आणि जनता प्रत्येक पावलावर आपल्या सैन्यासोबत खांद्याला खांदा लावून उभी आहे, "एकत्रितपणे, आपण या प्रदेशातून दहशतवाद पूर्णपणे नष्ट करू आणि कोणीही राष्ट्राच्या सार्वभौमत्वावर वाईट नजर टाकण्याचे धाडस करणार नाही" असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संरक्षणमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप जीवांना आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करून केली. जखमी सैनिक लवकर बरे होण्यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग आणि हवाई दलाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
***
S.Kane/R.Agashe/N.Mathure/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2129068)