कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांच्या हस्ते कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या (डीओपीटी) वतीने स्वैच्छिक रक्तदान शिबिराचे आयोजन


"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सेवा आणि समर्पणाची भावना,रक्तदानासारख्या मानवतावादी उपक्रमातून आपण सामूहिकपणे व्यक्त करत आहोत"- डॉ.जितेंद्र सिंह

Posted On: 14 MAY 2025 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 मे 2025

देशाच्या संरक्षण दलांविषयी आदरभावना आणि राष्ट्रीय सेवेसाठी समर्पण व्यक्त करत,केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज एक स्वैच्छिक रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.

हे शिबिर कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (डीओपीटी) यांच्यातर्फे नॉर्थ ब्लॉक येथे आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये 150 हून अधिक कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

याआधी, डॉ. जितेंद्र सिंह यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथेही असेच रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

कार्मिक, सार्वजनिक तक्रार व निवृत्तीवेतन मंत्रालय आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वैच्छिक रक्तदान शिबिरात उपस्थितांना संबोधित करताना, डॉ. जितेंद्र सिंह यांनी मंत्रालयाच्या राष्ट्रीय कल्याणासाठी असलेल्या कटिबद्धतेचा उल्लेख केला. केवळ कार्मिक व्यवस्थापनापुरते मर्यादित न राहता, प्रशिक्षण, क्षमतेचा विकास आणि सहृदयतेची भावना बाळगणाऱ्या नागरिकांचे निर्माण हेही मंत्रालयाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. सिंह यांनी वैयक्तिकरित्या रक्तदात्यांशी संवाद साधला आणि रक्तदानासंदर्भातील सामान्य गैरसमज दूर केले. ते स्वतः एक ख्यातनाम एंडोक्रिनॉलॉजिस्ट असल्याने त्यांनी वैद्यकीय माहिती देऊन उपस्थितांच्या ज्ञानात भर घातली.

डॉ. सिंह यांनी जाहीर केले की, पुढील काही आठवड्यात मंत्रालयाच्या अखत्यारितील सर्व विभाग आणि संस्थांमध्ये अशाच प्रकारची रक्तदान शिबिरे आयोजित केली जातील. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वापरता येईल असा एक मजबूत आणि विविधतेने समृद्ध राष्ट्रीय रक्तसाठा निर्माण करणे.

"हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय सेवेसाठी असलेल्या दृढ निश्चयाचे प्रतिबिंब आहे. हे एक लहान पण अर्थपूर्ण योगदान आहे," असे डॉ.सिंह यांनी नमूद केले.

S.Patil/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2128764)