इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नोएडा आणि बंगळुरू येथे भारतातील पहिल्या 3 एनएम चिप डिझाइन सेंटरचे उद्घाटन केले
3 एनएम चिप डिझाइन सेमीकंडक्टर नवोन्मेषाच्या जागतिक गटात भारताचे स्थान बळकट करणारा महत्वाचा टप्पा ठरेल: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव
Posted On:
13 MAY 2025 9:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मे 2025
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेनेसास इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या नोएडा आणि बंगळूरू येथील दोन नवीन अत्याधुनिक डिझाइन सुविधांचे उद्घाटन केले. नवीन सुविधेचे वेगळेपण अधोरेखित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, अत्याधुनिक 3 नॅनोमीटर चिप डिझाइनवर काम करणारे हे भारताचे पहिले डिझाइन सेंटर आहे, जे सेमीकंडक्टर नवोन्मेषाच्या जागतिक गटात भारताचे स्थान बळकट करणारा महत्वाचा टप्पा ठरेल. 3 एनएमवर डिझाइन करणे, हे खऱ्या अर्थाने पुढल्या पिढीतील आहे. आपण यापूर्वी 7 एनएम आणि 5 एनएम वर काम केले आहे, मात्र हा यापुढील नवा टप्पा ठरेल, असे ते म्हणाले.

डिझाइन, फॅब्रिकेशन, एटीएमपी (असेंब्ली, टेस्टिंग, मार्किंग आणि पॅकेजिंग), उपकरणे, रसायने आणि गॅस पुरवठा साखळी यांचा समावेश असलेल्या भारताच्या समग्र सेमीकंडक्टर धोरणाची माहिती देखील त्यांनी दिली. दावोससारख्या जागतिक व्यासपीठावर या उद्योगाने मिळवलेल्या विश्वासाचा दाखला देत, अप्लाइड मटेरियल्स आणि लॅम रिसर्च सारख्या कंपन्यांनी यापूर्वीच केलेल्या महत्वाच्या गुंतवणुकीचा त्यांनी उल्लेख केला. भारताच्या सेमीकंडक्टर परीसंस्थेच्या वाढत्या गतीवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, उत्तर प्रदेशातील या प्रमुख सेमीकंडक्टर डिझाइन सेंटरचे उद्घाटन, हे देशभरात उपलब्ध असलेल्या समृद्ध प्रतिभेचा वापर करणारी अखिल भारतीय परिसंस्था विकसित करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे.

सेमीकंडक्टर परिसंस्था अधिक मजबूत करण्यासाठी, भारत सरकार, भारतात सेमीकंडक्टर डिझाइन सेंटरच्या विकासाला सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक हार्डवेअर कौशल्य वाढवण्याच्या उद्देशाने नवीन सेमीकंडक्टर लर्निंग किट सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत प्रगत ईडीए (इलेक्ट्रॉनिक, डिझाइन, ऑटोमेशन) सॉफ्टवेअर टूल्स प्राप्त झालेल्या 270 हून अधिक शैक्षणिक संस्थांनाही हे सहज हाताळण्याजोगे हार्डवेअर किट दिले जाईल अशी माहिती त्यांनी दिली. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर लर्निंगच्या (प्रशिक्षण) या एकत्रीकरणामुळे खऱ्या अर्थाने उद्योगासाठी तयार अभियंते तयार होतील. आम्ही केवळ पायाभूत सुविधांची उभारणी करत नसून, दीर्घकालीन प्रतिभा विकसित करण्यामध्ये गुंतवणूक करत आहोत, असे ते म्हणाले.

आत्मनिर्भर भारताच्या आपल्या व्यापक दृष्टीकोना अंतर्गत सेमीकंडक्टर्सचा धोरणात्मक दृष्ट्या विशेष लक्ष केंद्रित करण्याचे क्षेत्र म्हणून समावेश केल्याबद्दल वैष्णव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. अवघ्या तीन वर्षांत भारताचा सेमीकंडक्टर उद्योग सुरुवातीच्या टप्प्यातून उदयोन्मुख जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेने पुढे सरकला आहे आणि आता दीर्घकालीन, शाश्वत विकासासाठी सज्ज झाला आहे, असे ते म्हणाले. स्मार्ट फोन, लॅपटॉप, सर्व्हर, वैद्यकीय उपकरणे, संरक्षण उपकरणे, ऑटोमोबाइल आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्मिती होत असल्यामुळे सेमीकंडक्टरची मागणी झपाट्याने वाढणार आहे, त्यामुळे सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासाने योग्य वेळी वेग घेतला आहे, असे ते म्हणाले.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2128533)