विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आधुनिक युद्ध पूर्णपणे तंत्रज्ञानाधारित आहे आणि गेल्या चार दिवसांत या बाबतीतले भारताचे वर्चस्व सिद्ध झाले - डॉ. जितेंद्र सिंह


डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनकाळात गेल्या दशकात स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासात भारताने वेगाने केलेली प्रगती आणि आधुनिक युद्धावरील त्याचा प्रभाव अधोरेखित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ घडवून आणणारे स्वदेशी तंत्रज्ञान यशस्वीरित्या विकसित केले तसेच ते प्रत्यक्षात अमलातही आणले - डॉ. जितेंद्र सिंह

डॉ. जितेंद्र सिंह यांनी आधुनिक युद्धातील भारताचे तंत्रज्ञानविषयक वर्चस्व आणि आत्मनिर्भरता अधोरेखित केली, आधुनिक युद्धामधील आपले यश म्हणजे विकसित भारत @2047 च्या दिशेने होत असलेल्या प्रगतीचे डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

Posted On: 11 MAY 2025 6:09PM by PIB Mumbai

 

आधुनिक युद्ध पूर्णपणे तंत्रज्ञानाधारित आहे आणि गेल्या चार दिवसांत या बाबतीतले भारताचे वर्चस्व सिद्ध झाले आहे, असे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित सोहळ्याला संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या संबोधनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनकाळात गेल्या दशकभरात स्वदेशी तंत्रज्ञान विकासात भारताने वेगाने साधलेली प्रगती आणि आधुनिक युद्धावरील त्याचा प्रभाव अधोरेखित केला.

विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग आणि कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आधुनिक युद्ध तंत्रज्ञानाधारित आहे आणि गेल्या चार दिवसांतील घटनांनी भारताची तांत्रिक क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे ही बाब ठळकपणे अधोरेखित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ घडवून आणणारे स्वदेशी तंत्रज्ञान यशस्वीरित्या विकसित केले तसेच ते प्रत्यक्षात अमलातही आणल्याची गौरवास्पद बाबही त्यांनी आपल्या संबोधनातून नमूद केली.

सद्यस्थितीत देशाच्या संरक्षण क्षेत्रात वापरले जाणारे बहुतांश तंत्रज्ञान हे स्वदेशी पातळीवर विकसित झालेले आहे आणि पंतप्रधान मोदी यांनीच आत्मनिर्भर भारत घडवण्याचा आत्मविश्वास आमच्यात निर्माण केला, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

यावेळी डॉ. जितेंद्र सिंह यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन सुरू केला जाण्यामागील घडामोडींचेही स्मरण करून दिले. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संकल्प करून यशस्वीपणे केलेल्या पोखरण अणुचाचण्यांच्या स्मरणार्थ पहिल्यांदा 1998 मध्ये राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 1998 मध्ये ज्या कल्पनेने आम्हाला प्रेरणा दिली, त्याच कल्पनेने आज पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची तंत्रज्ञानाच्या क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करणारा देश म्हणून जडणघडण करत मोठे परिवर्तन घडवून आणले असल्याचे त्यांनी सांगितले.

2014 पासून देशात स्वदेशीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे, पंतप्रधान मोदी यांनी कायमच आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करण्यावर भर दिला आहे. आज भारत बाह्य शक्तींवर अवलंबून नाही. आधुनिक युद्धपद्धतीमधील आपले यश म्हणजे विकसित भारत @2047 च्या दिशेने आपण करत असलेल्या प्रगतीचेच प्रतिबिंब आहे, असे ते म्हणाले.

यावेळी डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारताने वैज्ञानिक पातळीवर केलेल्या प्रगतीबद्दलही समाधान व्यक्त केले. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत तंत्रज्ञान विकास मंडळाने बीटिंग रिट्रीट सोहळ्यादरम्यान 1000 ड्रोनच्या सादरीकरणाच्या माध्यमातून नव्या दिशादर्शक उपक्रमाला पाठबळ दिल्याबद्दल त्यांनी मंडळाचे कौतुक केले. एकेकाळी प्रतिकात्मक असलेले ड्रोन आता भारताच्या विकसित होत असलेल्या संरक्षण परिसंस्थेच्या केंद्रस्थानी आले आहेत ही बाबही त्यांनी नमूद केली.

तंत्रज्ञान विकास मंडळाने वतीने दरवर्षी नवी संकल्पना राबवण्याची परंपरा कायम ठेवली असल्याबद्दलही त्यांनी मंडळाची प्रशंसा केली. त्याअंतर्गतच 'यंत्र' ही संकल्पना राबवली जात असून, त्यातून प्रगत संशोधन आणि तंत्रज्ञानाचा अवलंबाची व्याप्ती वाढत असल्याचे प्रतीत होते, असे ते म्हणाले.

गेल्या दशकात भारताने आपली संरक्षण क्षमता लक्षणीयरीत्या वाढवली आहे, ही गौरवास्पद बाबही त्यांनी अधोरेखित केली. यादृष्टीने वैज्ञानिक विकासासाठी सक्षम परिसंस्था उपलब्ध करून देण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असल्याचे ते म्हणाले. भारतात कधीही प्रतिभेची कमतरता नव्हती, परंतु आता आपल्याला नवोन्मेषाला प्रोत्साहन देणारे नेतृत्व लाभले आहे, असे ते म्हणाले.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषात भारताने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचाही उल्लेख डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी केला. यानिमित्ताने त्यांनी जगभरात देशाची प्रतिष्ठा वाढवणाऱ्या अनेक महत्त्वाच्या यशांविषयी उपस्थितांना माहिती दिली. जागतिक नवोन्मेष निर्देशांकात भारताने मोठी उसळी घेतली असून, 81 व्या स्थानावरून थेट 39 व्या स्थानावर झेप घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत जवळपास 56% पेटंटचे अर्ज निवासी भारतीयांद्वारे दाखल केले जात आहेत, यातून देशांतर्गत नवोन्मेषाच्या क्षेत्रातली वाढ दिसून येते, असे ते म्हणाले. आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था म्हणून उदयाला आला आहे, यामुळे उद्योजकता आणि तंत्रज्ञानविषयक प्रगतीलाही मोठी चालना मिळाली आहे, असे ते म्हणाले. संरक्षण क्षेत्रातील देशाच्या निर्यातीत लक्षणीय वाढ होऊन ती 2,000 कोटी रुपयांवरून 16,000 कोटींपर्यंत पोहोचली आहे, यातून स्वदेशी क्षमतांची ताकद दिसून येते, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी संशोधन आणि विकासावरील ढोबळ खर्चासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींविषयीदेखील माहिती दिली. यासाठीची तरतूद दुप्पटीने वाढली असून, 60,000 कोटी रुपयांवरून 1,27,000 कोटींवर पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग तसेच तंत्रज्ञान विकास मंडळासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतही 100% पेक्षा जास्त वाढ झाली असल्याची बाब त्यांनी नमूद केली. अंतराळ क्षेत्रासाठीची अर्थसंकल्पीय तरतूद तिपटीने वाढली असल्याची बाबही त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली. हे क्षेत्र खासगी क्षेत्राच्या सहभागासाठी खुले केल्यामुळे अर्थसंकल्पीय तरतुदीत वाढ झाल्याचे ते म्हणाले. यामुळे भविष्यातील तंत्रज्ञान शक्तीने सज्ज असलेला देश म्हणून भारताचे स्थान अधिक भक्कम झाले असल्याचे ते म्हणाले.

यावेळी डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारतात संशोधनाच्या क्षेत्रात सुलभता आणणाऱ्या 'एक देश, एक सदस्यता' आणि माहिती तंत्रज्ञान विभागांतर्गत शिष्यवृत्तींसाठी एकच पोर्टल सुरू करण्यासारख्या महत्त्वाच्या उपक्रमांची माहितीही उपस्थितांना दिली.

या कार्यक्रमादरम्यान, डॉ. जितेंद्र सिंह यांनी गेल्या पाच वर्षांत तंत्रज्ञान विकास मंडळाच्या वतीने अर्थसहाय्य प्राप्त झालेल्या सुपर 30 स्टार्टअप्सच्या संकलनाचेही प्रकाशन केले. यासोबतच त्यांनी राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत प्रस्तावांसाठीच्या दोन मागणी सूचनाही जारी केल्या. याशिवाय त्यांनी कार्बन संकलन - वापर आणि साठवण अर्थात कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज (CCUS) या संकल्पनेवर आधारित प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पांवर काम करत असलेल्या उद्योग क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थांच्या संयुक्त संघटनांना प्रकल्प अनुदानही वितरित केले.

27 व्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाने भारत @2047 साठीची दिशा निश्चित करून विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या नेतृत्वाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली असल्याचे म्हणत डॉ. जितेंद्र सिंह यांनी आपल्या संबोधनाचा समारोप केला.

पद्मभूषण अजय चौधरी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. परदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी संपूर्ण राष्ट्र या दृष्टिकोनाची गरज त्यांनी व्यक्त केली आणि खरी आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थेसारख्या (Anusandhan National Research Foundation - Anusandhan NRF) उपक्रमांची आवश्यकताही त्यांनी अधोरेखित केली.

माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. अभय करंदीकर, जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले, तंत्रज्ञान विकास मंडळाचे सचिव डॉ. राजेश पाठक, वरिष्ठ अधिकारी, शास्त्रज्ञ आणि विज्ञान तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

***

M.Jaybhaye/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2128190) Visitor Counter : 2