आयुष मंत्रालय
केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी समग्र आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी साप्ताहिक योग पॉडकास्ट केला लाँच
Posted On:
11 MAY 2025 5:51PM by PIB Mumbai
आयुष मंत्रालयाने आपला साप्ताहिक योग पॉडकास्ट लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा पॉडकास्ट मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेद्वारे (MDNIY) निर्मित एक नवोन्मेषी डिजिटल उपक्रम असेल. हा साप्ताहिक पॉडकास्ट केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या समाज माध्यम व्यासपीठावर लाँच केला आहे. प्रत्येक घरात योगाचे कालातीत ज्ञान पोहोचवणे तसेच प्राचीन जीवन पद्धतींची आधुनिक जीवनशैली बरोबर सांगड घालणे, हे या पॉडकास्टचे उद्दिष्ट आहे.
पॉडकास्टचा पहिला भाग, योगाच्या जगात घडलेल्या परिवर्तनकारी प्रवासावर आधारित आहे. ही पॉडकास्ट मालिका श्रोत्यांना अंतर्दृष्टीपूर्ण चर्चा, मार्गदर्शित पद्धती आणि तज्ञांच्या मुलाखतीद्वारे माहिती देण्यासाठी आरेखित करण्यात आली आहे. यामुळे योग सर्व वयोगटातील लोकांच्या आणि विविध पार्श्वभूमीच्या लोकांसाठी सुलभ आणि समर्पक बनेल.
30 मार्च 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 120 व्या भागात केलेल्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर हा पॉडकास्ट लाँच करण्यात आला आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व आणि "एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग" या 2025 च्या योग दिनाच्या मुख्य संकल्पनेवर भर दिला होता. ही संकल्पना भारताच्या एकता आणि शाश्वततेच्या जागतिक दृष्टिकोनाशी सुसंगत असून शारीरिक, मानसिक आणि पर्यावरणीय हित वृद्धिंगत करण्यात योगाची भूमिका अधोरेखित करणारी आहे.
पॉडकास्ट मालिकेच्या पहिल्या भागात, योगाचे सार आणि योगाचा जागतिक प्रभाव याबद्दलच्या उत्साही संभाषणात श्रोत्यांचे स्वागत केले गेले. एकेकाळी पवित्र भारतीय परंपरा असलेला योग आरोग्य आणि सौहार्दासाठी जागतिक चळवळ कसा बनला आहे यावर पॉडकास्टचा हा भाग प्रकाश टाकतो. हा भाग, भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या आणि "वसुधैव कुटुंबकम" - जग एक कुटुंब आहे या नीतिमत्तेपासून प्रेरित असलेल्या या वर्षीच्या संकल्पनेच्या तात्विक मुळांचा देखील शोध घेतो.
हा भाग या वर्षीच्या योग दिनाच्या विशेष स्वरूपावर देखील प्रकाश टाकतो. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त सरकारने हा अनोखा दिनविशेष साजरा करण्यासाठी दहा विशेष आयोजनांसह इतर अनेक उपक्रम सुरू केले आहेत. हे सर्व उपक्रम एकत्रितपणे 'एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग' या संकल्पनेचा व्यावहारिक अर्थ कथन करत आहेत.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दशकपूर्तीनिमित्त, आयुष मंत्रालयाने योगाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि योगाचा विस्तार वाढवण्यासाठी 10 मुख्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे:
योग संगम - जागतिक विक्रम घडवण्याच्या उद्देशाने 1,00,000 ठिकाणी समन्वित योग.
योग बंधन - प्रतिष्ठित योग सत्रांसाठी 10 देशांसह जागतिक भागीदारी.
योग पार्क - सामुदायिक योग पार्कचा विकास.
योग सामवेश - दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी समावेशक कार्यक्रम.
योग प्रभाव - योग आणि सार्वजनिक आरोग्यावर दशकभर चालणारा प्रभावी अभ्यास.
योग कनेक्ट - योग तज्ञ आणि आरोग्य व्यावसायिकांच्या जागतिक शिखर परिषदेचे आयोजन.
हरित योग - योगाला पर्यावरणीय कृतीशी जोडणारे शाश्वतता उपक्रम.
योग अनप्लग्ड - युवा-केंद्रित योग महोत्सव.
योग महाकुंभ - 21 जून रोजी 10 शहरांमध्ये आठवडाभर चालणाऱ्या योग उत्सवाचे आयोजन.
संयोग - आधुनिक आरोग्य सेवा प्रणाली बरोबर योगाचे एकत्रीकरण.
साप्ताहिक योग पॉडकास्ट प्रतापराव जाधव, आयुष मंत्रालय आणि मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था यांच्या सर्व प्रमुख स्ट्रीमिंग व्यासपीठावर उपलब्ध असेल. पॉडकास्टच्या प्रत्येक भागात परंपरा, विज्ञान आणि कथाकथनाचे एक अद्वितीय मिश्रण सादर केले जाईल जे योगाला जीवनाचा मार्ग म्हणून स्वीकारण्यासाठी श्रोत्यांना प्रेरित करेल.
अधिक माहितीसाठी आणि हा पॉडकास्ट ऐकण्यासाठी, www.yogamdniy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या.
***
M.Jaybhaye/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2128166)
Visitor Counter : 2