पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक अंतराळ संशोधन परिषद (GLEX) 2025 ला केले संबोधित
अंतराळ हे केवळ एक गंतव्यस्थान नाही तर कुतूहल, धैर्य आणि सामूहिक प्रगतीची घोषणा आहे: पंतप्रधान
भारतीय रॉकेट केवळ पेलोड घेऊन जात नाहीत - ते 1.4 अब्ज भारतीयांची स्वप्ने सोबत नेतात: पंतप्रधान
भारताची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहीम - गगनयान, अंतराळ तंत्रज्ञानातील देशाच्या वाढत्या आकांक्षा प्रतिबिंबित करते: पंतप्रधान
Posted On:
07 MAY 2025 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जागतिक अंतराळ संशोधन परिषद (GLEX) 2025 ला संबोधित केले. जगभरातील प्रतिष्ठित प्रतिनिधी, वैज्ञानिक आणि अंतराळवीरांचे त्यांनी स्वागत केले. GLEX 2025 मध्ये त्यांनी भारताचा उल्लेखनीय अंतराळ प्रवास अधोरेखित केला. ते म्हणाले की, "अंतराळ हे केवळ एक गंतव्यस्थान नाही तर कुतूहल, धैर्य आणि सामूहिक प्रगतीची घोषणा आहे".
1963 मध्ये एक छोटे रॉकेट प्रक्षेपित करण्यापासून ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश बनण्यापर्यंत भारताची अंतराळातील कामगिरी याच भावनेचे प्रतिबिंब आहे यावर त्यांनी भर दिला. "भारतीय रॉकेट केवळ पेलोड घेऊन जात नाहीत तर ते 1.4 अब्ज भारतीयांची स्वप्ने सोबत नेतात", असे त्यांनी नमूद केले. भारताची अंतराळातील प्रगती ही महत्त्वपूर्ण वैज्ञानिक कामगिरी आहे आणि मानवी भावना गुरुत्वाकर्षणाला आव्हान देऊ शकते याचा पुरावा आहे. 2014 मध्ये पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचण्याच्या भारताच्या ऐतिहासिक कामगिरीची त्यांनी आठवण करून दिली. त्यांनी अधोरेखित केले की चांद्रयान-1 ने चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यात मदत केली, चांद्रयान-2 ने चंद्राच्या पृष्ठभागाची हाय -रिझोल्यूशन छायाचित्रे पाठवली आणि चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबाबत आपले ज्ञान वाढवले.
"भारताने विक्रमी वेळेत क्रायोजेनिक इंजिन विकसित केले, एकाच मोहिमेत 100 उपग्रह प्रक्षेपित केले आणि भारतीय प्रक्षेपण वाहनांचा वापर करून 34 देशांसाठी 400 हून अधिक उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केले" असे त्यांनी नमूद केले. भारताच्या अलिकडच्या कामगिरीकडे लक्ष वेधत या वर्षी अंतराळात सोडलेले दोन उपग्रह अंतराळातच परस्परांशी जोडले (डॉकिंग) हे अंतराळ संशोधनात एक मोठे पाऊल असल्याचे सांगितले.
मोदी यांनी नमूद केले की भारताचा अंतराळ प्रवास म्हणजे इतरांशी स्पर्धा करणे नाही तर एकत्रितपणे नवी उंची गाठण्याचा आहे. मानवतेच्या हितासाठी अंतराळाचा शोध घेण्याच्या सामूहिक ध्येयावर त्यांनी भर दिला. प्रादेशिक सहकार्याप्रति भारताची वचनबद्धता अधोरेखित करत त्यांनी दक्षिण आशियाई राष्ट्रांसाठी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केल्याची आठवण सांगितली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले की, भारताच्या अध्यक्षतेच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेली जी-20 उपग्रह मोहीम जगातील ग्लोबल साऊथ देशांसाठी एक महत्त्वाचे योगदान ठरेल. भारत नव्या आत्मविश्वासासह सातत्याने वैज्ञानिक संशोधनाच्या सीमांचा विस्तार करत असून, प्रगतीच्या मार्गावर गतिमान आहे, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, भारताची पहिली मानवासहित अंतराळ मोहीम ‘गगनयान’ ही देशाच्या अंतराळ तंत्रज्ञानातील वाढत्या आकांक्षांचे प्रतीक आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये इस्रो (आयएसआरओ) आणि नासा (एनएएसए) यांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत एक भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
पुढील दीर्घकालीन दृष्टीकोन स्पष्ट करताना, मोदी यांनी सांगितले की, 2035 पर्यंत ‘भारतीय अंतराळ स्थानक’ अभूतपूर्व संशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या सुविधा प्रदान करेल. तसेच, 2040 पर्यंत एक भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाऊलखुणा सोडेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. मंगळ व शुक्र हे ग्रह देखील भारताच्या आगामी अंतराळ संबंधित महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये महत्त्वाचे लक्ष्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, भारतासाठी अंतराळ केवळ शोधापुरते मर्यादित नाही, तर ते सक्षमीकरणाचे माध्यम आहे. अंतराळ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शासन कार्यप्रणाली अधिक कार्यक्षम होते, जनतेचे जीवनमान उंचावते आणि नव्या पिढ्यांना प्रेरणा मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.
मोदी यांनी उपग्रह प्रणालींचे महत्त्व विशद करताना सांगितले की, या प्रणाली मच्छीमारांना धोक्याची सूचना देण्यासाठी, गतीशक्ती प्लॅटफॉर्म, रेल्वे सुरक्षेबाबत उपाय, तसेच हवामान अंदाज वर्तवण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. त्यांनी नमूद केले की, भारताने अंतराळ क्षेत्र नवउद्यमी, स्टार्टअप्स आणि युवा वर्गाला खुले करून नवोन्मेषाला चालना दिली आहे.
सध्या भारतात 250 हून अधिक अंतराळ स्टार्टअप्स कार्यरत असून, ते उपग्रह तंत्रज्ञान, संचालन प्रणाली, इमेजिंग आणि इतर क्षेत्रांतील अभिनव संशोधनात योगदान देत आहेत. पंतप्रधानांनी अभिमानाने सांगितले की, “भारतातील अनेक अंतराळ मोहिमा महिला वैज्ञानिकांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहेत.”
“भारताची अंतराळविषयक दृष्टी ही ‘वसुधैव कुटुंबकम्’ या प्राचीन तत्त्वज्ञानावर आधारित आहे,” असे मोदी यांनी पुन्हा अधोरेखित केले. भारताचा अंतराळ प्रवास केवळ स्वतःच्या प्रगतीपुरता मर्यादित नसून, वैश्विक ज्ञानवृद्धी, सामूहिक आव्हानांवर उपाय आणि भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देणे यासाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारताचे हे दृष्टीकोन सहकार्य, सामूहिक स्वप्नपूर्ती आणि एकत्रित प्रयत्नांनी नव्या शिखरांवर पोहोचण्याचा संकल्प यावर आधारित आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी विज्ञानाच्या नेतृत्वाखालील आणि उज्ज्वल भविष्याच्या सामूहिक आकांक्षांनी प्रेरित अंतराळ अन्वेषणाच्या नव्या पर्वाची सुरुवात करण्याचे आवाहन केले.
* * *
S.Patil/Sushma/Gajendra/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2127525)
Visitor Counter : 24
Read this release in:
Odia
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada