दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते भारत टेलिकॉम 2025 चे उद्घाटन ; भारताची  निर्यात क्षमता केली अधोरेखित


भारत टेलिकॉम 2025 मध्ये भारताने जागतिक दूरसंचार महत्त्वाकांक्षा  केल्या प्रदर्शित

प्रविष्टि तिथि: 06 MAY 2025 1:41PM by PIB Mumbai

 

भारत टेलिकॉम ही केवळ एक परिषद नाही - नवोन्मेष , सहकार्य आणि समावेशक वाढीद्वारे जागतिक संपर्क व्यवस्थेचे  भविष्य घडवण्याच्या भारताच्या उद्दिष्टाची  घोषणा आहे,” असे दूरसंचार मंत्री  ज्योतिरादित्य  सिंधिया म्हणाले. त्यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे भारत टेलिकॉम 2025 चे उद्घाटन झाले.  त्यावेळी ते बोलत होते.   ते म्हणाले, “जेव्हा कल्पना, नवोन्मेष  आणि ध्येय  सुसंवाद राखत  एकत्र येतात तेव्हा त्यातून गोंधळ निर्माण होत  नाही तर एक लयबद्ध मेळ ते निर्माण करतात — आणि भारत टेलिकॉम ही जागतिक सहकार्य आणि संधीचा मेळ  आहे.”

टेलिकॉम इक्विपमेंट अँड सर्व्हिसेस एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (टीईपीसी ) ने  दूरसंचार विभागाच्या सहकार्याने आयोजित केलेली  भारत टेलिकॉम 2025 परिषद, ही   दूरसंचार  उत्पादन, सेवा आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनण्याचे भारताचे स्वप्न साकारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी दळणवळण राज्यमंत्री डॉ. पेम्मासानी चंद्र शेखर , उद्योजक , परदेशी प्रतिनिधी आणि दूरसंचार मूल्य साखळीतील नवोन्मेषक उपस्थित होते. दोन दिवस चालणारा  भारत टेलिकॉम 2025  हा कार्यक्रमहितधारकांसाठी एक परस्परसंवादी व्यासपीठ तर प्रदान करतोच, त्याचबरोबर एक विशेष आंतरराष्ट्रीय व्यवसाय प्रदर्शन देखील आयोजित करतो.

आपल्या उद्घाटनपर भाषणात केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी प्रगतीशील सुधारणा आणि उत्पादन-संलग्न  प्रोत्साहनांच्या मदतीने दूरसंचार निर्यातदार आणि नवोन्मेष केंद्र म्हणून भारताची वाढती भूमिका अधोरेखित केली. "आम्ही केवळ गावे जोडत नाही आहोत; आम्ही भविष्य जोडत आहोत. आम्ही उभारलेला प्रत्येक टॉवर, आम्ही प्रसारित केलेला प्रत्येक बाइट  1.4 अब्ज लोकांना संधीच्या जवळ नेतो ", असे मंत्री सिंधिया यांनी नमूद केले.  "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धाडसी दृष्टिकोन आणि अतूट  दृढनिश्चय यामुळे भारत डिजिटल फॉलोअर वरून  जागतिक डिजिटल नेता बनला आहे - आकांक्षाचे रूपांतर  पायाभूत सुविधांमध्ये आणि धोरणाचे रूपांतर  प्रगतीमध्ये केले आहे."

"फक्त 22 महिन्यांत, आम्ही आमच्या 99% गावांना 5G ने जोडले आणि आमची  82% लोकसंख्या नेटवर्क अंतर्गत आणली, 470,000 टॉवर उभारले—ही उत्क्रांती नाही; ही दूरसंचार क्रांती आहे," असे ज्योतिरादित्य  सिंधिया   यांनी अधोरेखित केले.  त्यांनी पुढे सांगितले, "भारतात आपण बांधलेला हा डिजिटल महामार्ग केवळ दळणवळणाबद्दल नाही—ही पायाभूत सुविधांची पायाभूत सुविधा आहे, जी 1.4 अब्ज नागरिकांना आरोग्यसेवा, शिक्षण, प्रशासन आणि आर्थिक संधींमध्ये प्रवेश देऊन सक्षम करते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वामुळे भारत एक जागतिक डिजिटल महासत्ता म्हणून कशा प्रकारे असाधारण उंचीवर पोहोचला आहे यावर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला. भारताने केवळ 4G आणि 5G सारख्या क्षेत्रांमध्ये जगाची बरोबरी केली नाही, तर आता व्यापक सुधारणा आणि तांत्रिक नवोन्मेषांच्या माध्यमातून देशाच्या विकासाला दिशा देत आघाडी घेतली आहे . सिंधिया यांनी भारताच्या दूरसंचार क्षेत्राची परिवर्तनकारी शक्ती म्हणून भूमिका अधोरेखित केली आणि 1990 च्या दशकात महागड्या आणि मर्यादित मोबाईल सुविधेपासून ते आता जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी दूरसंचार बाजारपेठ आणि सर्वात स्वस्त डेटा प्रदानकर्ता बनण्यापर्यंतच्या देशाच्या उत्क्रांतीचे वर्णन केले.

भारताची विश्वासार्ह आणि भरवशाच्या उत्पादनांच्या निर्मितीचे स्थान आणि निर्यातीचे गंतव्य स्थान म्हणून ओळख अधिक मजबूत करण्यासाठी भारत टेलिकॉम 2025 ची संकल्पना राबवण्यात आली आहे. याद्वारे देशाची दूरसंचार उपकरणे, माहिती आणि  दळणवळण तंत्रज्ञान (ICT) सेवा आणि पुढील पिढीतील डिजिटल तंत्रज्ञानातील वाढती क्षमता दर्शविली जाईल. 80 हून अधिक प्रमुख भारतीय दूरसंचार आणि माहिती व दळणवळण तंत्रज्ञान कंपन्यांनी विविध क्षेत्रांतील नवोन्मेषी उत्पादने आणि उपाय सादर केले.

या कार्यक्रमात 35 हून अधिक देशांतील सरकारी संस्था, खाजगी उद्योग इत्यादींचे 130 पेक्षा जास्त परदेशी प्रतिनिधींच्या सहभागी झाल्याने उत्साही आंतरराष्ट्रीय सहभाग दिसून आला. यात विषय आधारित प्रदर्शने, परिषदा, उच्च-परिणामकारक बीटूबी बैठका,  5G, ऑप्टिकल फायबर, ब्रॉडबैंड इन्फ्रास्ट्रक्चर, उपग्रह संचार, IoT, AI-आधारित नेटवर्क आणि अशाच प्रकारच्या विविध सामग्रीसह अत्याधुनिक संचार तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणाऱ्या ज्ञानाचे आदानप्रदान  करणाऱ्या मंचाचे देखील आयोजन करण्यात आले.

***

S.Kakade/S.Kane/S.Patil/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2127244) आगंतुक पटल : 46
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam