WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

वेव्हज बझार: जागतिक सृजनशील सहयोगात एक अभूतपूर्व पदार्पण


भारतापासून जगापर्यंत: वेव्हज बझारने प्रमुख जागतिक मनोरंजन क्षेत्रातल्या सहयोगाला दिली चालना, 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय व्यवहारांची नोंद

 Posted On: 03 MAY 2025 10:14PM |   Location: PIB Mumbai

मुंबई, 3 मे 2025

 

1 ते 3 मे 2025 या कालावधीत मुंबईत आयोजित वेव्हज बझारच्या पहिल्या पर्वाची अतिशय यशस्वी सांगता झाली आणि त्याने सृजनशील उद्योगांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सहयोगासाठी एक प्रमुख मंच म्हणून स्वतःला प्रस्थापित केले. जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हज) छत्राखाली आयोजित केलेल्या या बाजारपेठेत चित्रपट, संगीत, रेडिओ, व्हीएफएक्स आणि अ‍ॅनिमेशन क्षेत्रात 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यावसायिक व्यवहार नोंदवले गेले. करार करण्याचे काम अजूनही सुरू असताना, काही दिवसांत एकूण मूल्यांकन 1000 कोटी रुपयांहून जास्त होण्याचा अंदाज आहे.

ठळक मुद्दे

बझार चे एक प्रमुख आकर्षण म्हणजे खरेदीदार-विक्रेता बाजार, ज्यामध्ये 3,000 हून अधिक बी2बी बैठका झाल्या, ज्यामुळे 500 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले आणि येत्या काळात अतिरिक्त करार पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 80-आसन व्यवस्था असलेल्या स्थानी  झालेल्या  चित्रपटांच्या क्युरेटेड स्क्रीनिंगला उत्साही प्रतिसाद मिळाला आणि निवडक चित्रपटांना दाद मिळाली. बाजाराने उदयोन्मुख निर्मात्यांना त्यांचे आयपी खरेदीदार आणि सहयोगींच्या जागतिक नेटवर्कमध्ये सादर करण्यास मदत केली, ज्यामुळे लक्षणीय औत्सुक्य निर्माण झाले आणि नवीन भागीदारी वाढली.

भारत आणि न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय सहकार्यातील एक मोठी कामगिरी म्हणजे, पेट्रिना डी'रोझारियो यांच्या नेतृत्वाखालील फिल्म इंडिया स्क्रीन कलेक्टिव्ह आणि स्क्रीन कॅंटरबरी एनझेड यांनी वेव्हजपासून प्रेरित होऊन न्यूझीलंडमध्ये पहिला भारतीय चित्रपट महोत्सव सुरू करण्यासाठी एक सहयोगी प्रस्ताव जाहीर केला. उभय देशांमधील पर्यटन, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सह-निर्मिती संबंध अधिक दृढ करणे हा याचा उद्देश आहे.

भारत-रशिया सहयोगाच्या दिशेने वाटचालीच्या पार्श्वभूमीवर, उभय देशांमधील विविध सांस्कृतिक महोत्सवांमध्ये सहयोग करण्यासाठी, तसेच विनोदनिर्मिती आणि संगीत कार्यक्रमांची सह-निर्मिती करण्यासाठी संभाव्य सामंजस्य करारावर, ओन्ली मच लाउडर (ओएमएल) चे सीईओ तुषार कुमार आणि गॅझप्रॉम मीडियाचे सीईओ अलेक्झांडर झारोव्ह यांनी चर्चेची प्राथमिक फेरी सुरू केली आहे.

 

प्रमुख करारविषयक घोषणा

प्राइम व्हिडिओ आणि सीजे ईएनएम बहु-वार्षिक सहयोगाची घोषणा ही वेव्हज  बझार मधील मुख्य आकर्षण होती, कारण जागतिक स्तरावर प्रीमियम कोरियन आशय वितरित करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीचे अनावरण नुकतेच करण्यात आले आहे. ते जून 2025  मध्ये हेड ओव्हर हील्ससह लाँच होणे अपेक्षित असून या करारात 240 हून अधिक देशांमधील स्ट्रीमिंगचा समावेश आहे. यामध्ये 28 सबटायटल भाषा आणि 11 डब केलेल्या आवृत्त्या असतील. हा उपक्रम जागतिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर आशियाच्या वाढत्या सर्जनशील अस्तित्वावर प्रकाश टाकतो.

आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे 'देवी चौधराणी' या चित्रपटाची घोषणा. हा चित्रपट भारतातील पहिला अधिकृत इंडो-यूके अशी सह-निर्मिती असलेला चित्रपट ठरला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एनएफडीसी, एफएफओ आणि इन्व्हेस्ट इंडिया यांच्या पाठिंब्याने, या चित्रपटाचा प्री-टीझर वेव्ज बझार मध्ये प्रदर्शित करण्यात आला. या ऐतिहासिक भव्यदिव्य चित्रपटात प्रोसेनजीत चॅटर्जी आणि श्रवंती चॅटर्जी यांच्या भूमिका आहेत, तर पंडित बिक्रम घोष यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.

'व्हायोलेटेड' या चित्रपटाच्या  लाँचची घोषणा ही वेव्हज बझारचे उद्दिष्ट सिद्ध करणारी आणखी महत्त्वाची घटना होती. धाडसी मानसशास्त्रीय थरारपट,'व्हायोलेटेड' ही डिंपल दुगार यांच्या दिग्दर्शनाखालील पदार्पणाची फिल्म आहे. सशक्त महिला-नेतृत्वाच्या कथेसाठी नावाजलेला हा चित्रपट यूकेमधील फ्यूजन फ्लिक्स आणि जेव्हीडी फिल्म्स यांची सह-निर्मिती आहे. हा चित्रपट दुगार यांच्या व्यावसायिक चित्रपट निर्मिती ते फिचर फिल्म निर्मिती अशा संक्रमणाचे संकेत देतो.

प्रभावी पदार्पणासह वेव्हज बझारने केवळ सर्जनशील सहयोगाचे जागतिक केंद्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली नाही, तर देशाच्या सीमेपलीकडे जाऊन कथाकथन आणि उद्योग जगतातील परिवर्तनाच्या नवयुगाचा पाया रचला आहे.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/Vasanti/Parnika/D.Rane


Release ID: (Release ID: 2126635)   |   Visitor Counter: 24