माहिती आणि प्रसारण मंत्रालय
WAVES हे व्यासपीठ जागतिक आणि भारतीय कथात्मक मांडणीकारांमध्ये अधिक परिणामकारकपणे सर्जनशील समन्वय घडवून आणत आहे — टेड सारंदोस, सह-मुख्य कार्यकारी अधिकारी, नेटफ्लिक्स
Posted On:
03 MAY 2025 5:34PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 3 मे 2025
प्रसारणविषयक व्यासपीठांमुळे (streaming platforms) भारतात चित्रपट निर्मिती प्रक्रियेचे लोकशाहीकरण झाले असल्याचे नेटफ्लिक्सचे (Netflix) सह - मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंदोस यांनी म्हटले आहे. मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर इथे सुरू असलेल्या पहिल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या (World Audio Visual and Entertainment Summit - WAVES) आज तिसऱ्या दिवशी स्ट्रीमिंग द न्यू इंडिया : कल्चर, कनेक्टिव्हिटी, अँड क्रिएटिव्ह कॅपिटल (Streaming the New India: Culture, Connectivity, and Creative Capital) अर्थात नव्या भारतातील प्रसारण व्यवस्था : संस्कृती - परस्पर जोडणी आणि सर्जनशीलतेची राजधानी या संकल्पनेवर अभिनेता सैफ अली खान आणि टेड सारंदोस यांच्या सोबतचे एक विशेष संवादसत्र झाले. त्यात ते बोलत होते.

या संवाद सत्रात आजच्या डिजिटल युगातील कथात्मक मांडणीचे बदलते अवकाश, सर्जनशीलता विषयक स्वातंत्र्यावरील प्रसारण व्यवस्थेचा प्रभाव आणि जागतिक मनोरंजन विश्वातले भारताचे वाढते अस्तित्व या मुद्यांवर चर्चा झाली.
यावेळी सारंदोस यांनी कथात्मक मांडणीच्या भविष्याबद्दलही आपले विचार मांडले. आज कथात्मक मांडणीची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरू आहे याचा अंदाज व्यक्त करणे खूप कठीण आहे, मात्र तरीदेखील या वाटचालीत प्रेक्षकांसोबत जोडून घेण्याचा उद्देश मात्र कायम आहे असे ते म्हणाले. कोविडनंतरच्या काळात नेटफ्लिक्सने भारतात केलेल्या गुंतवणुकीतून इथल्या अर्थव्यवस्थेत 2 अब्ज डॉलर्स इतक्या मूल्याची उलाढाल घडून आल्याचे त्यांनी सांगितले. यातून रोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि पायाभूत सोयी सुविधांच्या उभारणीला मोठे पाठबळ मिळाल्याचे ते म्हणाले. नेटफ्लिक्सने भारतातील 23 राज्यांमधील 100 पेक्षा जास्त नगरं आणि शहरांमध्ये चित्रिकरण केले आहे, 25,000 पेक्षा जास्त स्थानिक कलाकारांसह इतर कर्मचाऱ्यांना कामे दिली आहेत अशी माहितीही नेटफ्लिक्सचे सह - मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंदोस यांनी दिली.

अभिनेता सैफ अली खान यांनी सेक्रेड गेम्स (Sacred Games) या लोकप्रिय मालिकेसाठी नेटफ्लिक्ससोबत (Netflix) केलेल्या सहकार्यपूर्ण भागिदारीचे महत्व उपस्थितांसमोर मांडले. या विषयावर बोलतांना त्यांनी प्रसारण विषयक व्यासपीठांच्या परिवर्तनकारी ताकदीची जाणिव उपस्थितांना करून दिली. पूर्वी प्रसारणासाठी संबंधित कलाकृती (व्हिडिओ किंवा ऑडिओ स्वरूपातील) निश्चित आणि ठरावीक फॉरमॅटमध्येच सादर करण्याची किचकट प्रक्रिया करावी लागत होती. मात्र आधुनिक प्रसारण व्यवस्थेने अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शकांना या बंधनांपासून मुक्त केले असल्याचे ते म्हणाले. आता जगभरातील लोक आपल्या कथा - कलाकृती विनासायास पाहू शकत आहेत, मात्र चित्रगृहांच्या पारंपरिक प्रसारणाच्या काळात ते कदाचित याला मुकले असते अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सैफ अली खान यांनी भारतातील चित्रपट निर्मिती प्रक्रियेच्या लोकशाहीकरणाबद्दलही आपली सविस्तर मतं मांडली. आता प्रेक्षक कोणत्याही वेळी विविधांगी स्वरुपाच्या कथा - कलाकृती पाहू शकतात, आणि त्याचवेळी सर्जनशील कलाकारांना देखील प्रेक्षकांसाठी अशा प्रकारच्या कथा - कलाकृती निर्माण करण्याचं मोठं स्वातंत्र्य असल्याची बाब त्यांनी नमूद केली. हे एका अर्थाने आस्वाद घेत राहण्याचे आणि निर्मिती करत राहण्याचे निरंतर सूरू राहणारे चक्र आहे असे ते म्हणाले.
सिनेमा आणि प्रसारणाच्या सह अस्तित्वाचा विषय मांडताना सरँडॉस यांनी पुन्हा एकदा चित्रपटगृहातील प्रसारणाचे महत्त्व अधोरेखित केले. “सिनेमागृहे कालबाह्य झालेली नाहीत. प्रसारण आणि सिनेमागृह हे एकमेकांचे स्पर्धक नाहीत. समोर असलेला बाजार खूप मोठा आहे आणि दोघेही एकत्र पुढे जाऊ शकतात,” असे त्यांनी सांगितले.

सैफ यांनीही ही भावना व्यक्त केली आणि ते म्हणाले की, त्यांच्या दृष्टीने सर्वात अर्थपूर्ण प्रकल्प हे भारतीय संस्कृतीशी जोडलेले असतात. “जर कोणी परदेशात मला माझ्या चित्रपटांबद्दल विचारले, तर मी 'ओमकारा' किंवा 'परिणीता'बद्दल सांगतो — हे चित्रपट आपल्या संस्कृतीशी खोलवर जोडलेले आहेत. आपल्याच कथा जगाला सांगण्यात एक वेगळीच थरारक भावना असते,” अशी माहिती त्यांनी दिली.
सरँडॉस आणि सैफ दोघांनीही जागतिक आणि भारतीय कथा सांगणाऱ्यांमधील सर्जनशील समन्वयाला चालना देत असलेल्या ‘वेव्हज’ या मंचाचे कौतुक केले. सरँडॉस यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. ते म्हणाले, “येथे मांडलेले विचार जर यशस्वी ठरले, तर ते कल्पनेपलीकडे यश मिळवू शकतात.’ वेव्हज’हे त्या गतीसाठी एक आकर्षक व्यासपीठ आहे.”
संवाद, नवोन्मेष आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीद्वारे मनोरंजन उद्योगाचा भविष्यकाळ घडवत असलेल्या जगभरातील विचारवंत आणि उद्योगतज्ज्ञांना ‘वेव्हज’ परिषद एकत्र आणते.
* * *
PIB Mumbai | JPS/Tushar/Nitin/D.Rane
Release ID:
(Release ID: 2126505)
| Visitor Counter:
18