माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज 2025 मधील ब्रेक आऊट सत्रांमध्ये भारताच्या सर्जनशीलतेचे उदयोन्मुख केंद्र म्हणून मध्यप्रदेश केंद्रस्थानी
Posted On:
03 MAY 2025 4:07PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 3 मे 2025
वेव्हज 2025 मध्ये आज "डिजिटल स्वप्ने आणि सिनेमॅटिक दृष्टिकोन : सर्जनशीलतेचे पुढील केंद्र, मध्य प्रदेश" हे अत्यंत लक्षवेधी ब्रेक आऊट सत्र झाले. या सत्राचे सूत्रसंचालन व्हरायटीचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी नमन रामचंद्रन यांनी केले.
या सत्रात प्रसिद्ध निर्मात्या आणि दिग्दर्शक एकता कपूर यांच्या हस्ते मध्य प्रदेश सरकारच्या चित्रपट पर्यटन धोरण 2025 चे औपचारिक उदघाटन झाले. तसेच मध्य प्रदेश चित्रपट विभाग पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचे आणि AVGC XR धोरण 2025 चे देखील उदघाटन झाले.
चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी स्थळ शोधताना सवलत, परवानग्या मिळण्यातील सुलभता, अनुकूल निसर्गसौंदर्य तसेच चित्रीकरणासाठी सोईसुविधा अशा अनेक गोष्टींना अत्यंत महत्त्व असते, असे एकता कपूर यांनी यावेळी सांगितले.
मध्य प्रदेश हे अतुलनीय भारताचे हृदय असून ते अत्यंत वेगाने चित्रपटनिर्मात्यांचेही केंद्रस्थान बनत आहे, असे मध्य प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाचे प्रधान सचिव शेओ शेखर शुक्ला, आयएएस यांनी सांगितले. मध्य प्रदेशात चित्रीकरणासाठी अनुकूल वातावरण, समृद्ध इतिहास आणि वारसा तसेच प्रतिभासंपन्न कौशल्य असल्याचे ते म्हणाले. याशिवाय मध्य प्रदेश सरकारने चित्रीकरणाच्या दृष्टीने उत्कृष्ट मापदंड ठरतील अशा आर्थिक सवलती, परवानग्यांसाठी सुटसुटीत सोपी पोर्टल प्रणाली विकसित केली आहे, असे त्यांनी सांगितले. सरकारने 2.0 धोरणात वाढीव प्रोत्साहने आणि चित्रीकरण परत करण्यासाठी विशेष तरतुदींसह सुधारणा केली आहे. त्याचप्रमाणे स्थानिक भाषांमध्ये आणि प्रतिभेचा वापर करणाऱ्या चित्रपटांना आणि मध्य प्रदेशात चित्रित होणाऱ्या इतर भारतीय भाषांमधील चित्रपटांना अतिरिक्त प्रोत्साहन दिले जाईल, असे ते म्हणाले. मध्य प्रदेशला चित्रपट निर्मिती क्षेत्रात अव्वल स्थानी आणून मुंबईला स्पर्धा निर्माण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
नवीन एव्हीजीसी (ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) धोरण निर्मितीपूर्व आणि निर्मिती नंतरच्या काळात सहयोग करेल तसेच अॅनिमेशन, गेमिंग आणि व्हीएफएक्स सारख्या संबंधित क्षेत्रांना देखील प्रोत्साहन देईल, असे मध्य प्रदेश सरकारच्या माहिती तंत्रज्ञान तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय दुबे यांनी सांगितले. चित्रपट निर्मात्यांना सहकार्य करण्यासाठी सरकारच्या सक्रिय आणि जोखीम घेण्याच्या दृष्टिकोनावर त्यांनी भर दिला.
क्रिएटिव्हलँड स्टुडिओच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एक अनुभवी निर्मात्या शोभा संत यांनी स्थानिक प्रतिभा आणि तंत्रज्ञांचा वापर करून मध्य प्रदेशमध्ये चित्रित केलेल्या स्त्री 2 चित्रपटाबाबत आपल्या अनुभवांचे कथन केले. मध्यप्रदेश मध्ये चित्रीत करण्यात आलेल्या लायन आणि अ सुटेबल बॉय सारख्या आंतरराष्ट्रीय निर्मितींचाही त्यांनी उल्लेख केला. एका आगामी ऑस्ट्रेलियन सह-निर्मितीच्या चित्रीकरणासाठी मध्य प्रदेशाचीच निवड झाली असल्याची त्यांनी सांगितले. मध्य प्रदेशात चित्रीकरण करणाऱ्या कोणत्याही चित्रपट निर्मिती चमूने कधीही कोणतीही तक्रार नोंदवली नाही हे नमूद करून त्या म्हणाल्या की, "जे लोक एकदा मध्य प्रदेशात येतात, ते पुन्हा पुन्हा त्या ठिकाणाला भेट देऊ इच्छितात".
तज्ञ मंडळींपैकी इतर मान्यवर, ऑगस्ट मीडिया ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योतिर्मय साहा यांनी सांगितले की नवीन धोरणे राज्यभरात सर्जनशील केंद्रांच्या निर्मितीला चालना देतील तर फिक्कीच्या एव्हीजीसी विभागाचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी यांनी मध्य प्रदेशातील पाककृती, आदिवासी संग्रहालय आणि जागतिक कौशल्य पार्क यासारख्या इतर आकर्षणांवर भाष्य केले.
* * *
PIB Mumbai | NM/Bhakti/Shraddha/D.Rane
Release ID:
(Release ID: 2126472)
| Visitor Counter:
25