माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारतात निर्मितीचे आव्हान सत्र 1: भारताच्या सर्जनशील भविष्याला देणे आकार
वेव्ह्ज 2025 मध्ये भारतात निर्मिती करण्याच्या आव्हानांतर्गत 32 सर्जनशील आव्हानांच्या विजेत्यांचा सन्मान; 60 हून अधिक देशांमधील 750 हून अधिक अंतिम स्पर्धक नाविन्य आणि प्रतिभेचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र
“हा प्रवास आता सुरू झाला आहे, आणि आम्ही भारतीय सर्जनशीलतेला भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था सारख्या उपक्रमांद्वारे सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहोत:” केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव
“तरुण मने सर्जनशीलता आणि तंत्रज्ञान यांचे सुंदर संमिश्रण कसे करतात याचे हे व्यासपीठ एक उत्कृष्ट उदाहरण :” राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन
Posted On:
02 MAY 2025 8:59PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 2 मे 2025
जगभरातील सर्जकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या भारतात निर्मिती आव्हानाच्या (सीआयसी) पहिल्या सत्राचा समारोप वेव्हज 2025 मध्ये एका भव्य समारंभात झाला, ज्याने भारताच्या सर्जनशील परिदृश्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा चिन्हांकित केला. या ऐतिहासिक कार्यक्रमात माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या प्रत्येक क्षेत्रातल्या 32 विविध आव्हानांच्या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला, त्यात अॅनिमेशन, गेमिंग, चित्रपट निर्मिती, कृत्रिम प्रज्ञा, संगीत आणि डिजिटल कला यांचा समावेश होता.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तरुण सर्जक आणि दूरदृष्टी असलेल्यांना संबोधित करताना हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले. “प्रथमच, केवळ सर्जनशीलतेसाठी पुरस्कार दिला जात आहे. हा प्रवास आता सुरू झाला आहे. या उपक्रमाद्वारे तुम्ही नवीन संधींच्या विश्वात पाऊल ठेवत आहात. आम्ही भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था (आयआयसीटी) सुरू करत आहोत, ती आयआयटी सारखी आहे, पण त्यात सर्जनशीलतेसंबंधी प्रशिक्षण दिले जाईल, त्यामुळे नाविन्य आणि अभिव्यक्तीसाठी मजबूत पाया तयार होईल.”
माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी सहभागींचे अभिनंदन करताना तरुणांच्या गतिमान ऊर्जा आणि तंत्रज्ञान कौशल्यावर प्रकाश टाकला. “सर्वांना शुभेच्छा. हे व्यासपीठ तरुण मनं सर्जनशीलता आणि तंत्रज्ञान यांचे सुंदर संमिश्रण कसे करतात याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे नारी शक्तीची ताकद आणि भारतीय आशय-सामग्री निर्मितीच्या भविष्याचेही प्रतिबिंब आहे,” असे ते म्हणाले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी सीआयसी च्या उत्क्रांतीवर आपले विचार मांडले. “आम्ही ऑगस्टमध्ये सुरुवात केली तेव्हा माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात 25 आव्हाने होती. सप्टेंबरमध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’ मध्ये सीआयसी बद्दल बोलल्यानंतर सहभाग प्रचंड वाढला. आव्हानांची संख्या 32 पर्यंत वाढली. आम्हाला जवळपास एक लाख नोंदण्या मिळाल्या. आज इथे 750 अंतिम स्पर्धक आहेत आणि त्यापैकी प्रत्येकजण विजेता आहे,” असे जाजू म्हणाले.
उदयोन्मुख प्रतिभेला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रतिभाशाली तरुणांना सर्जनशीलतेचे प्रदर्शन करता यावे यासाठी क्रिएट इन इंडिया चॅलेंज (सीआयसी) सुरू करण्यात आले. या अंतर्गत देण्यात आलेली आव्हाने विविध श्रेणींमध्ये विस्तारलेले होते, ज्यामुळे निर्मात्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांमध्ये सर्जनशीलतेचा शोध घेण्याची आणि सीमा अधिक व्यापक करण्याची संधी मिळाली.
अॅनिमे चॅलेंजपासून ते एआय फिल्म मेकिंग स्पर्धा, एक्सआर क्रिएटर हॅकेथॉनपर्यंत, प्रत्येक श्रेणीने नाविन्यपूर्ण अभिव्यक्तीला प्रोत्साहन दिले आणि जगभरातील निर्माते, तंत्रज्ञ आणि कथाकारांना एकत्र आणले.
सीआयसीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्याप्रमाणात लक्षवेधी ठरले आहे. 60 हून अधिक देशांमधून प्रवेशिका आल्या आहेत, ज्यामध्ये 1,100हून अधिक आंतरराष्ट्रीय सहभागींचा समावेश आहे, त्यामुळे सीआयसीने जागतिक स्तरावर यश मिळविल्याचे दिसून येते. या प्रतिसादातून सर्जनशील तंत्रज्ञानाशी संलग्न होण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण आणि प्रभावशाली अशा नवीन माध्यमांच्या निर्मितीसाठी संधींची वाढती मागणी अधोरेखित झाली आहे.
आमिर खान, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, अक्किनेनी नागार्जुन, विक्रांत मॅसी, प्रसून जोशी आणि अरुण पुरी यांच्यासह इतर मान्यवर आणि अधिकाऱ्यांसह उद्योगातील दिग्गजांनी हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले.
32 आव्हाने आघाडीच्या उद्योग संस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती, ज्यामुळे सीआयसीला विविध सर्जनशील विषय, तंत्रज्ञान-चालित प्रकल्प आणि भविष्यासाठी तयार सामग्री एकत्र आणून त्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचता आले. जागतिक मनोरंजन आणि तंत्रज्ञान परिसंस्थेत भारताचे स्थान पुन्हा परिभाषित करणाऱ्या पुढील पिढीच्या निर्मात्यांसाठी हा उपक्रम एक लाँचपॅड म्हणून काम करत आहे. विविध माध्यम स्वरूपांमध्ये स्थानिक प्रतिभेला चालना देणे आणि नाविन्यपूर्ण सामग्री निर्मितीचा उत्सव साजरा करणे किती महत्त्वाचे आहे याचा हा एक पुरावा आहे.
* * *
PIB Mumbai |S.Bedekar/Nikhilesh/Hemangi/D.Rane
Release ID:
(Release ID: 2126343)
| Visitor Counter:
13