WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

“वेव्हज मध्ये भारताला सर्जनशील आशय सामग्रीमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची संधी गवसेल” असा अभिनेते अल्लू अर्जुन यांनी व्यक्त केला विश्वास

 Posted On: 01 MAY 2025 11:10PM |   Location: PIB Mumbai

मुंबई, 1 मे 2025

 

गुरुवारी उद्घाटन झालेल्या मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथील दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) 2025 मध्ये सुप्रसिद्ध अभिनेते अल्लू अर्जुन मंचावर येताच या स्वप्ननगरीत चैतन्य सळसळले. टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी सूत्रसंचालन केलेले 'टॅलेंट बियॉन्ड बॉर्डर्स' हे बहुप्रतिक्षित 'परस्परसंवादी' सत्र प्रसिद्धीचे वलय, अस्तित्व आणि चैतन्य या विषयातील एक हृदयस्पर्शी मास्टरक्लास बनले.

कथाकथनात भारताच्या वाढत्या जागतिक कथनतंत्रातील दीपस्तंभ म्हणून अल्लू अर्जुन यांनी या शिखर परिषदेचे कौतुक केले. "भारताकडे नेहमीच चैतन्य होते. आता, आपल्याकडे वेव्ह्ज मंच आहे," याकडे त्यांनी लक्ष वेधताना "वेव्हज भारतासाठी सर्जनशील आशय सामग्रीमध्ये जगाचे नेतृत्व करण्यासाठी एक संधी असेल" असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

पुष्पा चित्रपटातील अभिनेत्याने सहा महिन्यांच्या विश्रांती घेण्यास  भाग पडलेल्या आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या अपघाताचा उल्लेख केल्याने हे संभाषण अधिक भावनिक झाले. "तो विराम हा एक आशीर्वाद होता," हे नमूद करताना ते म्हणाले, "यामुळे मी माझी दृष्टी धाडसाकडून मतितार्थाकडे वळवली. मला जाणवले की स्नायू कमजोर होत असताना, प्रभुत्व वाढले पाहिजे. अभिनय ही माझी नवीन सीमा बनली."

अभिनेत्याने दिग्दर्शक अ‍ॅटलीसोबतच्या त्यांच्या आगामी प्रकल्पाची पुष्टी केली आणि त्याला "भारतीय भावनेत रुजलेला दृश्य देखावा" असे संबोधले. "आम्ही आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचा देशी चैतन्याशी मिलाफ करत भारतासाठी आणि भारताकडून जगासाठी एक चित्रपट देत आहोत," असे सांगताना त्यांच्या डोळ्यात उत्कटता दिसत होती. 

या संभाषणात निरंतर विकसित होणाऱ्या उद्योगात तग धरून राहण्याच्या आव्हानांचाही समावेश होता. "प्रत्येक भाषेत प्रतिभावान तरुण कलाकार उदयास येत आहेत. तुम्ही प्रामाणिक राहिले पाहिजे, तुम्हाला आस असली पाहिजे आणि तुम्ही अष्टपैलू असले पाहिजे," असा सल्ला त्यांनी दिला. "हा फक्त एक उद्योग नाही, तर सर्जनशीलता, लवचिकता आणि उत्क्रांतीची युद्धभूमी आहे" असे त्यांनी निदर्शनास आणले. 

पण जेव्हा ते त्यांच्या पार्श्वभूमीविषयी अवगत करत होते तेव्हा उपस्थितांचा श्वास रोखला गेला. अर्जुन यांनी त्यांच्या नामवंत कुटुंबातील आजोबा अल्लू रामलिंगय्या, वडील आणि निर्माता अल्लू अरविंद आणि काका आणि आजीवन प्रेरणास्थान चिरंजीवी यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. "मी स्वतः घडलेला नाही" हे कबूल करताना "मी माझ्या सभोवतालच्या लोकांच्या मार्गदर्शनाने, पाठिंब्याने आणि महानतेने घडलो. मी भाग्यवान आहे" असे त्यांनी आवर्जून सांगितले. 

त्यांच्या ऊर्जेविषयी विचारले असता, ते म्हणाले की हे सर्व चाहत्यांसाठी आहे. "जेव्हा दिवे मंद होतात आणि टाळ्यांचा कडकडाट कमी होतो, तेव्हा तुम्हीच मला उचलता. तुम्हीच मला आठवण करून देता की मी हे का करतो. माझी ऊर्जा... तुम्हीच आहात."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या वेव्हज 2025 ला भारताच्या सर्जनशील प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा म्हणून पाहिले जात आहे.

 

* * *

PIB Mumbai | JPS/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


Release ID: (Release ID: 2126036)   |   Visitor Counter: 22