WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

कृत्रिम प्रज्ञा आणि सर्जनशीलतेचा मेळ: वेव्हज 2025 मध्ये उद्योग धुरिणींद्वारे डिजिटल अभिव्यक्तीच्या भविष्यात भारताची भूमिका विशद


“कृत्रिम प्रज्ञा हे नोकऱ्या गमावण्याचे नाही, तर ध्येय गाठण्याचे साधन”: एनव्हीडियाचे रिचर्ड केरिस यांचे प्रतिपादन

“सर्जनशीलतेने प्रत्येक उद्योगात परिवर्तन घडवून आणले ”: अॅडोबचे शंतनू नारायण यांचे मत

 Posted On: 01 MAY 2025 10:48PM |   Location: PIB Mumbai

मुंबई, 1 मे 2025

 

वेव्हज 2025 मध्ये नवोन्मेष, सर्जनशीलता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संगम झाला, ज्यामध्ये कृत्रिम प्रज्ञा  ही परिसंवादाचा केंद्रबिंदू होती. आज मुंबईत झालेल्या शिखर परिषदेच्या उद्घाटनाच्या दिवशी जागतिक उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तीन सत्रांमध्ये माध्यम, कथाकथन आणि डिजिटल उत्पादनात कृत्रिम प्रज्ञेच्या गतिमान प्रवेशाचा वेध घेण्यात आला - या सर्जनशील-तंत्रज्ञान उत्क्रांतीमध्ये भारताच्या वाढत्या दर्जाला दुजोरा मिळाला.

"सर्जनशीलतेने प्रत्येक उद्योगात परिवर्तन घडवून आणले", अॅडोबचे शंतनू नारायण यांचे मत

"कृत्रिम प्रज्ञेच्या  युगात संरचना, माध्यम आणि सर्जनशीलता" या विषयावरील बीजभाषणात अ‍ॅडोबचे अध्यक्ष आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी  शंतनू नारायण यांनी विकसित होत असलेल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेवर विस्तृत दृष्टिकोन मांडला. इंटरनेटपासून मोबाइल आणि आता कृत्रिम प्रज्ञेपर्यंतच्या डिजिटल प्रवासाचा मागोवा घेत, नारायण यांनी आशय निर्मितीमध्ये भारताच्या वाढत्या भूमिकेकडे लक्ष वेधले, 500 दशलक्षाहून अधिक भारतीय ऑनलाइन आशय वापरत आहेत आणि प्रादेशिक भाषांकडे लक्षणीयरित्या वळत असल्याचे नमूद केले.

कृत्रिम प्रज्ञा  सर्जनशीलतेची जागा घेत नसून ती वृद्धिंगत करत आहे यावर त्यांनी भर दिला. इमेजिंग, व्हिडिओ आणि डिझाइनमध्ये विविध कथाकथनाला कसे समर्थन देते हे नमूद करताना त्यांनी "जनरेटिव्ह एआय भारतीय सर्जकांना पारंपरिक माध्यमांच्या पलीकडे जाण्यास सक्षम करत आहे," असे सांगितले. सिनेमापासून ते रिअल-टाइम मोबाइल स्टोरीटेलिंगपर्यंत, सर्जनशील क्षमता विस्तारत आहे.

एआय मेळ 

एआय-संचालित चौकट तयार करण्यात भारताचे अद्वितीय स्थान अधोरेखित करताना - अनुप्रयोगांपासून डेटा पायाभूत सुविधांपर्यंत - नारायण यांनी चार-स्तरीय धोरणाची रूपरेषा मांडली: सर्जनशीलता आणि उत्पादन सशक्त करणे, व्यवसाय मॉडेल्समध्ये नावीन्य आणणे, एआय-कुशल कार्यबलाचे नेतृत्व करणे आणि उद्योजकता वाढवणे. वेव्हजद्वारे दूरदर्शी मंच तयार केल्याबद्दल त्यांनी भारत सरकार आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे आभार मानून भाषणाचा समारोप केला.

"कृत्रिम प्रज्ञा नोकऱ्या गमावण्यासाठी नसून ते काम पूर्ण करण्याचे साधन आहे." —  एनव्हीडीयाचे उपाध्‍यक्ष रिचर्ड केरिस यांचे प्रतिपादन  

"एआय बियॉन्ड वर्क" या शीर्षकाच्या विचारप्रवर्तक आगळ्यावेगळ्या संभाषणात, एनव्हीआयडीआचे उपाध्यक्ष रिचर्ड केरिस आणि एनव्हीडीआ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल धुपर यांनी एआय वैयक्तिक संगणन आणि सर्जनशील उत्पादकता कशी पुन्हा परिभाषित करत आहे याचा धांडोळा घेतला.

पीसी युगाच्या उत्क्रांतीचा विचार करताना, धुपर यांनी निदर्शनास आणले की, "पीसी कार्यालयीन वेळेनंतर निद्रिस्त व्हायचे पण मानवाचे तसे नाही." एनव्हीआयडीआचा सुरुवातीचा दृष्टिकोन - पीसींना सर्जनशील साथीदार म्हणून कल्पना करणे - आता कृत्रिम प्रज्ञा  समर्थित जगात याचा  प्रतिध्वनी कसा उमटतो, हे त्यांनी स्पष्ट केले.

केरिस यांनी भूतकाळातील त्रिमिती  अॅनिमेशनमध्ये प्रभुत्व मिळविण्याच्या जटिलतेची आठवण सांगताना एक ऐतिहासिक दृष्टिकोन दिला. "आता, जनरेटिव्ह एआय सह, आपण संकल्पनेपासून निर्मितीकडे खूप वेगाने प्रगती करू शकतो," असे सांगताना त्यांनी मूलभूत गोष्टींशी संपर्क गमावण्याविरोधात सजग केले: "आपल्या सर्वांच्या फोनवर कॅमेरा असल्याने आपण सर्वजण उत्तम छायाचित्रकार बनत नाही.” 

वक्त्यांनी मान्य केले, की एआय हे मानवी सर्जनशीलता बदलण्याऐवजी त्यात वाढ करते. "एआय तुमच्या हातात विविध साधने देते - परंतु कला, मूलभूत गोष्टी जाणून घेणे आजही तितकेच आवश्यक आहे," याला केरिस यांनी दुजोरा दिला. "सर्जनशील लोक त्यांचे काम अक्षरशः जगतात. कृत्रिम प्रज्ञा  त्याची जागा घेत नाही - तर ते लोकांना अधिक सक्षम करते."

“जनरेटिव्ह एआय सह गोष्टी सत्यात आणणे” — अनिश मुखर्जी, एनव्हीडीआ

तिसऱ्या सत्रात, एनव्हीडीआचे सोल्युशन्स आर्किटेक्ट अनिश मुखर्जी यांनी एक मास्टरक्लास घेतला, ज्यामध्ये मीडियात जनरेटिव्ह एआयच्या व्यावहारिक उपयोजनांवर लक्ष केंद्रित केले गेले. "जनरेटिव्ह एआय सह गोष्टी सत्यात आणणे" हे सत्र हार्डवेअरच्या पलीकडे जाऊन परिवर्तनात्मक साधनांकडे वळण्याच्या एनव्हीडीआच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकते.

मुखर्जी यांनी एआय-द्वारे सक्षम उपायांचे प्रात्यक्षिक सादर केले, ज्यामध्ये स्थिर प्रतिमा डिजिटल मानवांमध्ये रूपांतरित करणे, बहुभाषिक व्हॉइस-ओव्हर आणि ऑडिओवर आधारित कॅरेक्टर अ‍ॅनिमेशन यांचा समावेश होता. एनव्हीआयडीआयएच्या फुगाटो मॉडेलचा वापर करून, त्यांनी एआय द्वारे जनरेट केलेले संगीत आणि डबिंगसाठी वास्तववादी लिप-सिंकिंग दाखवले. त्यांनी ओम्निव्हर्स प्लॅटफॉर्मद्वारे व्हिडिओ जनरेशन आणि सिम्युलेशनवर आधारित प्रशिक्षणासाठी मूलभूत मॉडेल्सचा संच 'कॉसमॉस' देखील सादर केला.

लार्ज लँग्वेज मॉडेल्सचे एआय अ‍ॅनिमेशन आणि डीएलएसएससोबतचे एकत्रीकरण स्पष्ट करत, त्यांनी विशेषतः गेम विकसित करताना भासमान कथाकथनाचा अनुभव तयार करण्यातील त्यांची भूमिका नमूद केली. "खेळाडूंना हुशारीने प्रतिसाद देणारी, एआय द्वारे सक्षम केलेली पात्रे कथात्मक सहभाग नव्याने परिभाषित करत आहेत," असेही ते म्हणाले.

जनरेटिव्ह एआयची पूर्ण क्षमता अनुभवण्यासाठी संगणकीय शक्ती, समृद्ध डेटासेट्स आणि अल्गोरिदमिक सामर्थ्याचा वापर करण्याचे आवाहन करून मुखर्जी यांनी सत्राचा समारोप केला. नेमोस्टॅकसह एनव्हीडीआची ओपन-सोर्स परिसंस्था, सर्जनशील कलाकारांना कस्टम मॉडेल्स विकसित करण्यास सक्षम करते, ज्यामुळे संपूर्ण उद्योगजगतात नावीन्य वाढीस लागते.

वेव्हज 2025: एआयच्या नेतृत्वाखाली सर्जनशील परिवर्तनासाठी भक्कम पाया

सत्रांमधील चर्चेदरम्यान, एआय हे सक्षमीकरणाचे साधन आहे, ते कोणाची जागा घेणार नाही, असा एकंदर सूर उमटला. डिझाइन, चित्रपट, अ‍ॅनिमेशन किंवा कथाकथन असो, जे मूलभूत गोष्टी समजून घेतील, नवीन साधनांचा जबाबदारीने वापर करतील आणि नीतिमत्ता, सर्जनशीलता आणि सर्वसमावेशकतेवर आधारित प्रणाली तयार करतील अशांचे भविष्य निश्चितच उज्ज्वल असेल. अशाप्रकारे वेव्हज 2025 हे जागतिक स्तरावर सर्जनशील आणि तंत्रज्ञानाधारित परिसंस्थेमध्ये भारताच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सबळ पुरावा आहे.

 

* * *

PIB Mumbai |S.Bedekar/Vasanti/Parnika/D.Rane


Release ID: (Release ID: 2125992)   |   Visitor Counter: 21