माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत इंडिया : अ बर्ड्स आय व्ह्यू चॅलेंजचे ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड द्वारे यशस्वी आयोजन
इंडिया: अ बर्ड्स आय व्ह्यू चॅलेंज स्पर्धेसाठी अंतिम स्पर्धकांची निवड प्रक्रिया पूर्ण, विजेत्यांना वेव्हज शिखर परिषद 2025 मध्ये सन्मानित केले जाणार
Posted On:
26 APR 2025 6:30PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबईत येत्या 1 ते 4 मे 2025 दरम्यान होणार असलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद अर्थात वेव्हज शिखर परिषदेच्या निमित्ताने इंडिया : अ बर्ड्स आय व्ह्यू चॅलेंज या आव्हानात्मक स्पर्धेचे आयोजन करण्याची आणि त्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अर्थात बीइसीआयएल या संस्थेकडे सोपवण्यात आली होती. बीइसीआयएल ही संस्था माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील मिनी रत्न या वर्गवारीतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून कार्यरत आहे.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना 2-3 मिनिटांचे हवाई दृष्टीकोनातून अर्थात आकाशात उंचावरून चित्रित केलेले (aerial ) व्हिडिओ अर्थात चित्रफिती बनवण्याचे आव्हान दिले गेले होते. याअंतर्गत ड्रोनच्या उपयोगाने छायाचित्रण करत भारताचे सौंदर्य, वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांचे भूभाग, वारसा, संस्कृती, नवोन्मेष, प्रगती आणि परिवर्तनाचे दर्शन त्या चित्रफितींमधून घडावे अशी अपेक्षा होती. या स्पर्धेकरता सर्वसमावेशक सहभागाला चालना देण्यासाठी, ही स्पर्धा प्रामुख्याने दोन श्रेणींमध्ये आयोजित केली गेली होती. या श्रेणी खाली नमूद केल्या आहेत :
खुली श्रेणी : ही श्रेणी सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली होती. यात चित्रपट दिग्दर्शक, विद्यार्थी, हौशी व्यक्ती, या क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञ आणि उत्साही ड्रोन कलाकारांचा समावेश होता.
ड्रोन दीदी श्रेणी : ही श्रेणी विशेषतः नमो ड्रोन दीदी योजनेसारख्या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या महिलांसाठी होती. ग्रामीण आणि निम-शहरी भागातील महिलांना ड्रोनच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने ही श्रेणी आखली गेली होती.
या स्पर्धेबद्दल व्यापक जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच स्पर्धेकरता मोठ्या प्रमाणातील सहभागाला चालना देण्याच्या उद्देशाने प्रचार प्रसार करण्यासाठी बीईसीआयएलने एक राष्ट्रीय स्तरावर एक व्यापक माध्यम मोहीम देखील राबवली. याअंतर्गत पारंपरिक तसेच डिजिटल माध्यमाद्वारे प्रत्येकापर्यंत पोहण्याच्या पद्धतींचा अवलंब केला गेला. या मोहिमे अंतर्गत देशभरातील ड्रोन अकादमी, माध्यम संस्था आणि विद्यापीठांना संस्थात्मक भेटी दिल्या गेल्या तसेच परिसंवादांचे आयोजन केले गेले. याशिवाय विद्यार्थ्यांशी आणि ड्रोन प्रशिक्षणार्थींशी थेट संवाद साधून तळागाळातून सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. या स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया अविरत सुरू राहावी तसेच स्पर्धकांना विनासायास व्हिडिओ अपलोड करता यावेत याकरता एक समर्पित ऑनलाइन पोर्टलही सुरू करण्यात आले होते. याव्यतिरिक्त या स्पर्धेतील सहभागासाठी डिजीटल माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या मोहिमेचा प्रभाव वाढवण्याकरता विशेषतः माध्यम जगताचे शिक्षण देणाऱ्या संस्था, ड्रोन प्रशिक्षण केंद्रे आणि नागरी संघटनांच्या व्यवस्थेवर भर देत नियोजनबद्ध ईमेल मोहिमही राबवली गेली. ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि लिंक्डइन यांसारख्या समाज माध्यम विषयक व्यासपीठांचाही प्रभावी वापर केला गेला. या व्यासपीठांवरून लक्षवेधक आशय सामग्रीच्या माध्यमातून या स्पर्धेविषयी मोठे आकर्षण तयार केले गेले. अशा प्रकारच्या डिजिटल माध्यमांशी संबंधित प्रयत्नांना पूरक प्रयत्न म्हणून, भित्तीपत्रके आणि माहितीपत्रकांसारख्या छापील प्रचार साहित्याच्या वितरणाच्या माध्यमातूनही स्पर्धेविषयी जागरुकता निर्माण केली गेली.
या आव्हानात्मक स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, एकूण 1,324 स्पर्धकांनी नोंदणी केली. यात 382 नोंदणी या ड्रोन दिदीच्या आहेत. यातून कथात्मक मांडणीसाठी ड्रोनचा उपयोग करून व्हिडिओग्राफी करण्याबद्दलचा वाढता उत्साहच दिसून येतो. या स्पर्धेसाठी हिमाचल प्रदेशच्या हिमालयीन खोऱ्यापासून ते उत्तर प्रदेशातील सांस्कृतिक कॉरिडॉर, बिहारच्या मैदानांपासून ते गुजरात आणि कर्नाटकातील नवोन्मेष केंद्र तसेच तामिळनाडूच्या किनारपट्टी अशा देशाच्या कानाकोपऱ्यातील स्पर्धकांनी नोंदणी केली. त्यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने सर्जनशीलता आणि प्रगतीचा अखिल भारतीय उत्सव ठरली आहे.
या स्पर्धेसाठी नोंदणी केलेल्या सर्व स्पर्धकांच्या प्रवेशिका आणि त्यांच्या चित्रफितींचे एका प्रतिष्ठित परीक्षक मंडळाद्वारे कठोर आणि काळजीपूर्वक परीक्षण केले गेले. या परीक्षक मंडळात खाली नमूद मान्यवरांचा समावेश होता :
- पियुष शाह – छायाचित्रणकार, निर्माता, लेखक आणि ध्वनी रचनाकार
- आर. व्ही. रमणी – राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक आणि माहितीपटांचे छायाचित्रणकार
- अरुण वर्मा – भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध छायाचिणत्रकार
एका कठोर मूल्यमापन प्रक्रियेनंतर, प्रत्येक श्रेणीतून पाच अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय सामाजिक प्रतिनिधित्व म्हणून विशेष श्रेणीअंतर्गत चार स्पर्धकांचीही निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या या स्पर्धकांच्या कलाकृती मुंबईत येत्या 1 ते 4 मे 2025 दरम्यान होणार असलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद अर्थात वेव्हज शिखर परिषदेत प्रदर्शित केल्या जातील, तसेच या शिखर परिषदेच्या निमित्ताने होणाऱ्या महासोहळ्यात विजेत्यांची घोषणा केली जाईल आणि त्यांना सन्मानीत केले जाईल.
अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी भेट द्या : www.becil.com
वेव्हज (WAVES)
भारत सरकारद्वारे 1 ते 4 मे 2025 या कालावधीत मुंबईत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी मोलाचा टप्पा ठरणारी पहिली वेव्हज (WAVES), वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट (डब्ल्यूएडब्ल्यूएस), अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद आयोजित करण्यात आली आहे.
आपण उद्योग व्यावसायिक, गुंतवणूकदार निर्माते, अथवा इनोव्हेटर (नवोन्मेशी) असाल, ही परिषद एकमेकांशी जोडण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी, आणि नवोन्मेषासाठी आणि एम अँड ई परिप्रेक्ष्यात योगदान देण्यासाठी आगळे जागतिक व्यासपीठ मिळवून देईल.
वेव्हज, कंटेंट क्रिएशन (आशय निर्मिती), इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी (बौद्धिक संपदा) आणि टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनचे (तंत्रज्ञान नवोन्मेष) केंद्र म्हणून भारताचे स्थान उंचावून, भारताच्या सृजनशील प्रतिभेला बळ देईल. ब्रॉडकास्टिंग, प्रिंट मीडिया, टेलिव्हिजन, रेडिओ, चित्रपट, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जनेरेटिव्ह एआय, ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर), व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर), आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी (एक्सआर), हे उद्योग आणि क्षेत्र परिषदेच्या केंद्रस्थानी असतील.
काही प्रश्न आहेत का? येथे उत्तरे शोधा
ताज्या घोषणांसाठी पीआयबी टीम वेव्हजच्या संपर्कात रहा
चला, आमच्याबरोबर प्रवासाला! वेव्हसाठी लगेच नोंदणी करा
***
PIB TEAM WAVES 2025 | Nilima/Tushar/Parshuram
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
Release ID:
(Release ID: 2124639)
| Visitor Counter:
17