कृषी मंत्रालय
काठमांडू येथे झालेल्या कृषीविषयक तृतीय बिमस्टेक मंत्रीस्तरीय परिषदेत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले भारताचे नेतृत्व
शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी भारत डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लक्ष्यित उपाययोजना लागू करत आहे : शिवराज सिंह चौहान
शिवराज सिंह चौहान यांनी बिमस्टेक सदस्य देशांना वेव्हज 2025 मध्ये सहभागी होण्याचे केले आवाहन
Posted On:
09 APR 2025 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 एप्रिल 2025
नेपाळ मध्ये काठमांडू येथे आज झालेल्या तृतीय बिमस्टेक कृषीविषयक मंत्रीस्तरीय परिषदेत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भारताचे नेतृत्व केले. या एक दिवसीय कार्यक्रमाला भारतासह बांगलादेश, भूतान, नेपाळ, म्यानमार, थायलंड आणि श्रीलंका या बिमस्टेक देशांचे कृषीमंत्री आणि वरिष्ठ कृषी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमुळे कृषी विकास क्षेत्रात अधिक व्यापक प्रादेशिक सहकार्यासाठी संधी उपलब्ध झाली.

भारताच्या शेजारी प्रथम आणि ऍक्ट ईस्ट या प्रमुख परराष्ट्र धोरणांच्या ध्येयपूर्तीसाठी बिमस्टेक ही भारताची स्वाभाविक निवड असल्याचे चौहान यांनी सांगितले. बिमस्टेक मध्ये दक्षिण आणि आग्नेय आशियाला जोडण्याची क्षमता आहे. आपल्याला सामायिक इतिहास आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे आणि त्या ऋणानुबंधांमुळेच आपण नैसर्गिकरित्या भागीदार आहोत, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत, शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण, संस्थात्मक पतपुरवठ्याची उपलब्धता सुधारणे, मृदा आरोग्य पत्रिका, राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम, पीक विमा, महिलांना ड्रोन पुरवण्यासाठी नमो ड्रोन दीदी योजना यांसारख्या लक्ष्यित उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. याव्यतिरिक्त पर्यावरणीय संवर्धन आणि मृदा आरोग्य या घटकांना प्राधान्य देत असतानाच नैसर्गिक आणि सेंद्रीय शेतीला चालना दिली जात आहे.

बिमस्टेक समवेत कृषी सहकार्य मजबूत करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला आणि बीज विकास, पशुआरोग्य आणि कीटक व्यवस्थापन या क्षेत्रात प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करून भारताने बिमस्टेक कृषी सहकार्य (2023-2027) उपक्रमात पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. बिमस्टेक सदस्य देशांमधील विद्यार्थ्यांना भारतात एम.एस्सी. आणि पीएच.डी. करण्यासाठी भारत पूर्णपणे निधी प्राप्त बिमस्टेक शिष्यवृत्ती देखील प्रदान करतो. हे या प्रदेशातील कृषी क्षेत्रात क्षमता निर्मितीच्या दिशेने आमचे सामूहिक प्रयत्न प्रतिबिंबित करते.

बिमस्टेक देशांसमवेतचे सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने भारताने "भारतात कृषी सहकार्य क्षेत्रात बिमस्टेक उत्कृष्टता केंद्र" स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हे केंद्र बिमस्टेक देशांच्या कृषी क्षेत्रातील आणि त्याच्याशी निगडित क्षेत्रातील विविध वचनबद्धता विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण करण्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. हे केंद्र अचूक कृषीतंत्र, हवामान बदलाची जोखीम कमी करणे, नैसर्गिक शेती, लिंगभाव समानता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या घटकांवर लक्ष केंद्रित करेल. तसेच या क्षेत्रात अन्न सुरक्षा, पोषण आहार आणि उपजीविका यांच्या सुरक्षेसाठी हे केंद्र ड्रोन, डिजिटल तंत्रज्ञान यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानविषयक ज्ञानाची आणि कौशल्याची देवाणघेवाण करणारे व्यासपीठ म्हणून कार्य करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2024 मध्ये जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद- अर्थात वेव्हज 2025 ची घोषणा केली असून मनोरंजन विश्व, सर्जनशीलता आणि संस्कृती यांची सांगड घालणे हा याचा उद्देश आहे, असे चौहान यांनी सांगितले. ही परिषद आशय निर्मात्यांसाठी सर्जनशील आणि तांत्रिक नवोन्मेषातील सर्वोत्कृष्ट व्यासपीठ असेल, यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण होईल, जगभरातील माध्यम आणि मनोरंजन उद्योगातील अग्रणींसह विविध मुद्द्यांवर अर्थपूर्ण सहकार्य करण्याची संधी प्रदान करेल, असे सांगून येत्या 1 ते 4 मे, 2025 दरम्यान मुबंईत होणाऱ्या या भव्य कार्यक्रमात बिमस्टेक सदस्य देशांनी जरूर सहभागी व्हावे, असे आवाहन चौहान यांनी केले.
* * *
S.Patil/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2120550)
Visitor Counter : 20