आयुष मंत्रालय
जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त 10 एप्रिल रोजी गांधीनगर येथे होणाऱ्या होमिओपॅथिक अधिवेशनाचे केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार उद्घाटन
या दोन दिवसीय अधिवेशनात जगभरातील 10,000 प्रतिनिधी सहभागी होणार असून हा होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीच्या इतिहासातील आजवरचा भव्य कार्यक्रम ठरेल
Posted On:
08 APR 2025 9:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2025
जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त गुजरात मधील गांधीनगर येथे दोन दिवसीय भव्य अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत आयोजित हे दोन दिवसांचे अधिवेशन केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद, राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग आणि राष्ट्रीय होमिओपॅथी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 10–11 एप्रिल 2025 रोजी गांधीनगर मधील महात्मा मंदिर अधिवेशन आणि प्रदर्शन केंद्र येथे आयोजित करण्यात आले आहे. अध्ययन, अध्यापन आणि संशोधन ही यावर्षीच्या अधिवेशनाची संकल्पना असून होमिओपॅथीच्या विकासासाठी आवश्यक तीन आधारस्तंभांना अधोरेखित करत आहे.
आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. या दोन दिवसीय अधिवेशनाला जगभरातील 10,000 प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा असून हा होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीच्या इतिहासातील आजवरचा सर्वात भव्य कार्यक्रम ठरेल.
होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीत होणाऱ्या संशोधनातील प्रगती, त्याचे व्यावहारिक उपयोग आणि आरोग्यसेवा तसेच उद्योगांतील होमिओपॅथीच्या वाढत्या परिणामांचा लाभ जागतिक स्तरावर सर्वांना मिळावा, हे जागतिक होमिओपॅथी दिन 2025 चे उद्दिष्ट आहे. या अधिवेशनाचा लाभ शिक्षणतज्ञ आणि संशोधकांना तर होणार आहेच शिवाय यामुळे धोरणकर्ते आणि उद्योगजगतातील तज्ञ एकाच व्यासपीठावर एकत्र येतील.
"लाइव्ह मटेरिया मेडिका" स्पर्धा आणि तिन्ही सहयोगी संस्थांनी विचारमंथनासाठी एकत्रितपणे आयोजित केलेली स्वतंत्र, विचारप्रवर्तक सत्रे हे या कार्यक्रमाचे एक प्रमुख आकर्षण असेल. जामनगरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे पहिले जागतिक पारंपारिक औषध केंद्र असल्याने, मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या कार्यक्रमामुळे गुजरात पारंपारिक आणि पूरक औषध प्रणालींचा प्रसार करण्यात आघाडीवर राहील.
"गांधीनगर येथील महात्मा मंदिर अधिवेशन आणि प्रदर्शन केंद्र येथे जागतिक होमिओपॅथी दिन 2025 आयोजित करण्यात आम्हाला अभिमान असून होमिओपॅथी व्यावसायिकांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मेळावा असेल." असे केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद (सीसीआरएच) चे महासंचालक डॉ. सुभाष कौशिक म्हणाले.
* * *
N.Chitale/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2120239)