इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
कृत्रिम बुद्धिमत्ता ही नवीन औद्योगिक क्रांती असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे प्रतिपादन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे एकात्मिकरण करण्यासाठीच्या संकल्पना सामायिक करण्याचे संबंधीताना केले आवाहन
आधार सेवा अनेक उपक्रमांचा खरा आधार तसेच डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचाही मुख्य गाभा - केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या वतीने दिल्लीत आधार संवाद मालिकेच्या तिसऱ्या भागाचे आयोजन, स्मार्ट प्रशासन आणि ओळख सुरक्षिततेसाठी एकत्र आलेल्या 750 पेक्षा जास्त अधिकारी आणि तज्ज्ञांकडून नवोन्मेष, समावेशकता आणि एकात्मिकरणावर भर
Posted On:
08 APR 2025 9:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2025
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युआयडीएआय) भागधारकांसोबत आयोजित केलेली आधार संवाद ही एकदिवसीय परिषद आज यशस्वीपणे पार पडली. या दिवसभराच्या परिषदेत केंद्र सरकारचे विभाग आणि राज्ये यांच्यासह आधार परिसंस्थेशी जोडलेले भागधारक सहभागी झाले होते. या परिषदेत सहभागी झालेल्या सर्व भागधारकांनी परस्परांमधील भागीदारांसोबत आधारचा वापर करून सेवा वितरणाची व्याप्ती आणि विस्तार वाढवण्यावर विचार विनिमय केला, यासंबंधीच्या कल्पनाही सामायिक केल्या.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. या आधार संवाद परिषदेच्या निमित्ताने सुमारे 750 वरिष्ठ धोरणकर्ते, तज्ञ, तंत्रज्ञ, विविध क्षेत्रांमधील आघाडीच्या व्यक्ती आणि व्यावसायिक तज्ञ एकत्र आले होते.
अनेक उपक्रमांचा पाया म्हणून कामी येणारी आधार सेवा
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. कृत्रिम बुद्धिमत्ता ही नवीन औद्योगिक क्रांती असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. आधार सेवा अनेक उपक्रमांचा खरा आधार आहे तसेच डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचाही (DPIs) ती मुख्य गाभा असल्याचे त्यांनी सांगितले. आपण विकासाला चालना देण्यासाठी गोपनीयतेचे जतन करत, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे कशा पद्धतीने एकात्मिकरण करू शकतो याबद्दलच्या संकल्पना सामायिक कराव्यात असे आवाहन त्यांनी भागधारकांना केले.
केंद्र सरकारने लोकांचे जीवनमान अधिक सुलभ करण्याला प्राधान्यक्रमावर ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात आधाराच्या मदतीने चेहरा आधारीत ओळख पटवण्याच्या अर्थात फेस ऑथेंटिकेशनच्या सुविधेचे उदाहरण त्यांनी उपस्थितांसमोर मांडले.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. आधारमुळे समावेशनाच्या प्रक्रियेला गती मिळत आहे तसेच आर्थिक विकासाच्या प्रक्रियेतही त्याची मदत होत आहे ही बाब त्यांनी नमूद केली.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे अध्यक्ष नीलकंठ मिश्रा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या विस्तारात आधारची भूमिका त्यांनी उपस्थितांसमोर मांडली. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि आधार सेवेने आजवर लक्षणीय यश मिळवले आहे, मात्र अजूनही बरेच काही साध्य करायचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. चेहरा आधारीत ओळख पटवण्याची अर्थात फेस ऑथेंटिकेशन सुविधा खूपच उपयुक्त असून ती अधिकाधिक अचूक होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आधार संवाद मालिकेबद्दल
आधार संवाद मालिकेचा हा तिसरा भाग होता. दिल्लीत झालेल्या या आवृत्तीत चर्चेत, नवोन्मेष, समावेशन आणि एकात्मिकीकरण तसेच प्रशासनाला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच लोकांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी आधार सेवा कशा रितीने अधिक उपयुक्त ठरू शकते, या मुद्द्यांवर भर दिला गेला होता.
या परिषदेच्या उद्घाटन सत्रांनंतर, झालेल्या सत्रामध्ये आधार नोंदणी आणि प्रमाणीकरणात नवीन तंत्रज्ञान आणि प्रक्रियांचा अवलंब, सुशासनासाठी आधारचा वापर वाढवणे, आधार नोंदणी आणि अद्यतन परिसंस्था मजबूत करणे, डेटा गोपनीयता यांसारख्या क्षेत्रांवर आणि विषयांवर भर असलेली चर्चा झाली.
या परिषदेच्या निमित्ताने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या तंत्रज्ञान केंद्राने आधारच्या नव्या ॲपविषयी सादरीकरण केले. या ॲपच्या माध्यमातून आधार क्रमांक धारकांना त्यांच्या पसंतीच्या सेवांचा लाभ घेत असताना फक्त आवश्यक माहिती सामायिक करण्याची तसेच स्वतःच्या वैयक्तिक माहितीवर पूर्ण नियंत्रण असण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
या ॲपमधील एक महत्वाचे नवोन्मेषी अद्ययावतीकरण म्हणजे यात विविध क्षेत्रांमध्ये झपाट्याने अवलंब केला जात असलेल्या चेहरा आधारीत ओळख पटवण्याची अर्थात फेस ऑथेंटिकेशन सुविधेचे केलेले एकात्मिकरण. या सुविधेचा वापर करून दरमहा 15 कोटी पेक्षा जास्त व्यवहार केले जात आहेत.
* * *
N.Chitale/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2120234)
Visitor Counter : 38