पंतप्रधान कार्यालय
बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांची राज्य प्रशासन परिषदेचे अध्यक्ष वरिष्ठ जनरल मिन आंग ह्लाईंग यांच्याशी भेट
Posted On:
04 APR 2025 2:55PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बँकॉक येथे झालेल्या बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान राज्य प्रशासन परिषदेचे अध्यक्ष आणि म्यानमारचे पंतप्रधान वरिष्ठ जनरल मिन आंग ह्लाईंग यांची भेट घेतली.
दोन्ही नेत्यांनी म्यानमारमधील विनाशकारी भूकंपानंतरच्या परिस्थितीवर चर्चा केली, ज्यामध्ये म्यानमारला मानवतावादी मदत, आपत्ती निवारण तसेच वैद्यकीय मदत देण्यासाठी "ऑपरेशन ब्रह्मा" अंतर्गत भारताच्या प्रयत्नांचा समावेश आहे. वरिष्ठ जनरल ह्लाईंगयांनी भारताच्या मदत प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधानांनी सांगितले की, पहिला प्रतिसादकर्ता म्हणून भारत या संकटकाळी म्यानमारसोबत उभा आहे तसेच आवश्यकता भासल्यास अधिक भौतिक मदत आणि संसाधने तैनात करण्यास तयार आहे.
समावेशक आणि विश्वासार्ह निवडणुकांद्वारे लोकशाही प्रक्रिया लवकरात लवकर पुनर्स्थापित करण्याचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. विश्वास निर्माण करणाऱ्या तसेच म्यानमारच्या स्वतःच्या आणि म्यानमारप्रणीत नेतृत्वातील शांततापूर्ण, स्थिर आणि लोकशाही भविष्याच्या दिशेने संक्रमण पुढे नेण्याच्या उद्देशाने केलेल्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचे सांगितले. म्यानमारमध्ये सुरू असलेल्या वांशिक हिंसाचाराच्या मानवी मूल्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी अधोरेखित केले की संघर्षावर कोणताही लष्करी उपाय नाही आणि समावेशक संवादाद्वारेच शाश्वत शांतता साध्य करता येईल यावर त्यांनी भर दिला.
म्यानमार-थायलंड सीमेवरील सायबर-घोटाळा केंद्रांमधून भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी आणि परत आणण्यासाठी म्यानमारने केलेल्या सहाय्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले. भारत-म्यानमार सीमेवर बंडखोरांच्या कारवाया, आंतरराष्ट्रीय गुन्हे तसेच मानवी तस्करी रोखण्यासाठी सहकार्य करण्याच्या गरजेवर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली.
दोन्ही नेत्यांनी म्यानमारमध्ये सुरू असलेल्या भारत-समर्थित पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांवरही चर्चा केली. म्यानमारमधील सर्व समुदायांच्या विकासात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी भारत तयार असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
***
S.Kakade/N.Mathure/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2118829)
Visitor Counter : 19
Read this release in:
Odia
,
Gujarati
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam