वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
प्रसिद्धी पत्रक
Posted On:
03 APR 2025 3:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 एप्रिल 2025
अमेरिकेच्या अध्यक्षांनी सर्व व्यापारी भागीदारांकडून होणाऱ्या आयातीवर 10 टक्के ते 50 टक्के अतिरिक्त शुल्काची आकारणी करणारे रेसिप्रोकल म्हणजे त्यांच्याकडून अमेरिकेच्या मालावर आकारल्या जाणाऱ्या शुल्कानुसार अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावर आयातशुल्क लागू करण्याचा कार्यकारी आदेश जारी केला. यामधील पायाभूत 10% शुल्क 5 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे आणि उर्वरित राष्ट्रनिहाय विशिष्ट अतिरिक्त शुल्क 9 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे.या कार्यकारी आदेशातील परिशिष्ट I नुसार भारतावर 27% अतिरिक्त शुल्क लागू होईल.
अमेरिकेच्या अध्यक्षांनी केलेल्या विविध उपाययोजना/ घोषणांच्या संभाव्य परिणामांचे वाणिज्य विभाग अतिशय काळजीपूर्वक मूल्यमापन करत आहे. विकसित भारताचा दृष्टीकोन विचारात घेऊन हा विभाग भारतीय उद्योग आणि निर्यातदारांसह सर्व हितधारकांच्या संपर्कात असून या शुल्काचे त्यांनी केलेले मूल्यमापन आणि परिस्थितीचा आढावा याबाबत अभिप्राय जाणून घेत आहे. अमेरिकेच्या व्यापार धोरणामधील नवीन घडामोडीमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य संधींचे देखील हा विभाग अध्ययन करत आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी 13 फेब्रुवारी 2025 रोजी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 500 अब्ज डॉलरच्या वर नेण्याचे लक्ष्य असलेल्या ‘मिशन 500’ ची घोषणा केली होती. त्यानुसार भारत आणि अमेरिकेच्या वाणिज्य पथकांमध्ये परस्परांना फायदेशीर, बहु-क्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार करार वेगाने पूर्णत्वाला यावा म्हणून चर्चा सुरू आहेत. पुरवठा साखळी अधिक सखोल करण्यासह परस्पर हिताच्या विविध मुद्यांवर यामध्ये भर दिला जात आहे. दोन्ही देशांच्या व्यापारात वाढ, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान हस्तांतरण करणे दोन्ही देशांना सुलभ जावे यावर या चर्चेमध्ये लक्ष केंद्रित करण्यात येत आहेत.
या मुद्यांवर आम्ही ट्रंप प्रशासनाच्या संपर्कात आहोत आणि त्यावर अधिक सखोल चर्चा होण्याची आमची अपेक्ष आहे. अमेरिकेसोबतच्या सर्व समावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारीचे महत्त्व भारत जाणून आहे आणि आपले व्यापारी संबंध परस्पर समृद्धीचा एक स्तंभ बनतील आणि भारत आणि अमेरिकेच्या जनतेला फायदेशीर ठरणारे परिवर्तनकारक बदल घडवतील हे सुनिश्चित करण्यासाठी, भारत आणि अमेरिका यांच्यात लष्करी भागीदारीला चालना देणाऱ्या, 21 व्या शतकानुरुप व्यापार आणि तंत्रज्ञान गतिमान करणाऱ्या संधीचा पुरेपूर वापर करण्यासाठी अमेरिकेसोबत अतिशय काळजीपूर्वक काम करत आहे.
* * *
JPS/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2118230)