राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रिझर्व्ह बँकेचा 90 व्या वर्धापनदिनाचा सांगता सोहळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत संपन्न


भारताला जागतिक डिजिटल पेमेंट क्षेत्राचे नेतृत्व करणारा देश बनवण्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे : राष्ट्रपती मुर्मू

Posted On: 01 APR 2025 1:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 एप्रिल 2025

 

भारतीय रिझर्व्ह बँकेचा 90 व्या वर्धापनदिनाचा सांगता सोहळा आज (1 एप्रिल, 2025) मुंबईत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधित केले. देशाची मध्यवर्ती  बँक म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक भारताच्या अविश्वसनीय विकासाच्या गाथेच्या केंद्रस्थानी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातील सर्वदूर पसरलेल्या दारिद्र्यापासून ते आता जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेला देश बनण्यापर्यंतच्यै काळापर्यंतचा देशाचा संपूर्ण प्रवासाची साक्षीदार आहे असे त्या म्हणाल्या.

भारतीय रिझर्व्ह बँक ही देशातील सर्वात महत्त्वाच्या संस्थांपैकी एक संस्था म्हणून उदयाला आली आहे. सामान्य पुरुष किंवा महिलेचा त्यांच्या खिशात असलेल्या नोटांवर छापलेल्या नावाव्यतिरिक्त रिझर्व्ह बँकेशी थेट संबंध येत नाही, मात्र त्यांच्या स्वतःच्या बँकांमार्फत तसेच इतर मार्गांनी त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार अप्रत्यक्षपणे रिझर्व्ह बँकेद्वारे नियंत्रित केले जातात, आणि हे सर्वजण भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या देखरेखीखालील आर्थिक व्यवस्थेवर स्वाभाविकपणे पूर्ण विश्वास ठेवतात असे त्यांनी सांगितले. हा विश्वास हेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे गेल्या नऊ दशकातले सर्वात मोठे यश आहे असे त्या म्हणाल्या. भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थिर किंमती, विकास आणि आर्थिक स्थिरता या आपल्या उद्येशांना अनुसरून दृढ वाटचाल करत हा विश्वास संपादन केला असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेने वेगाने वाढणाऱ्या आपल्या राष्ट्राच्या बदलत्या गरजांनुरूप बदल आत्मसात केले आहेत. आर बी आय ने 1990 च्या दशकातील आर्थिक उदारीकरणापासून ते कोविड 19 महामारीपर्यंत देशावर आलेल्या सर्व प्रमुख आव्हानांना जलद प्रतिसाद देत लवचिकता आणि अनुकूलतेचे दर्शन घडवले आहे. अतिशय वेगाने होत असलेल्या जागतिकीकरणाच्या या विश्वात प्रतिकूल अशा वैश्विक कलांमध्ये देखील भारताची वित्तीय यंत्रणा लवचिक राहू शकते हे आर बी आय ने सिद्ध केले आहे.

डिजिटल देयकांमध्ये भारताला जागतिक नेतृत्व म्हणून सिद्ध करण्यात आर बी आय ने अतिशय महत्वाची भूमिका निभावली आहे. देशाच्या देयकांविषयक पायाभूत सेवासुविधांचे सातत्याने आधुनिकीकरण करून डिजटल व्यवहार सुरळीत आणि कार्यक्षम करण्याबरोबरच ते सुरक्षित असल्याचे आर बी आय ने सुनिश्चित केले आहे. युपीआय सारख्या नाविन्यपूर्ण योजनांमुळे वित्तीय प्रवेशप्रक्रियेत क्रांती घडली असून कमी खर्चिक,  जलद व्यवहार आणि वित्तीय समावेशन खोलवर रुजणे देखील साध्य झाले आहे. देयकांच्याही पलीकडे आर बी आय ने एका चैतन्यशील फिन टेक  अर्थात  आर्थिक व्यवहारांसाठी तंत्रज्ञानाचा करणाऱ्या परिसंस्थेला समृद्ध केले आहे.

भारत स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवाकडे मार्गक्रमण करत असताना आपल्या 'विकसित भारत 2047' या मोहिमेअंतर्गत एका नाविन्यपूर्ण, अनुकूल आणि सर्वांना प्रवेश असेल अशा वित्तीय परिसंस्थेला साद घालत आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. येणाऱ्या मार्गात अनेक आव्हाने आणि जटिल प्रश्न असू शकतात, असे त्यांनी सांगितले. स्थैर्य, नवोन्मेष आणि सर्वसमावेशकतेसाठी दृढ वचनबद्धतेसह,  भारतीय रिझर्व्ह बँक, सामर्थ्याचा आधारस्तंभ म्हणून आपले कार्य अविरत सुरु ठेवेल आणि भारताला अधिक समृद्ध भविष्याकडे तसेच जागतिक नेतृत्व होण्यासाठी मोलाची कामगिरी बजावेल,  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चलनविषयक स्थिरता आणि आर्थिक स्थैर्याची रक्षक या  नात्याने एक मजबूत बँकिंग प्रणाली सुनिश्चित करणे, आर्थिक नवोन्मेषाला चालना देणे आणि आपल्या आर्थिक परिसंस्थेवरील विश्वासाचे रक्षण करणाच्या या प्रवासात आरबीआय एक निर्णायक भूमिका बजावेल, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

 

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

JPS/Tushar/Bhakti/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2117185) Visitor Counter : 46