युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
सायकलिंगमुळे केवळ आरोग्यच नाही तर चारित्र्यही घडते : लखनौ येथील 'फिट इंडिया संडेज ऑन सायकल' कार्यक्रमात डॉ. मनसुख मांडविया यांचे प्रतिपादन.
Posted On:
23 MAR 2025 3:52PM by PIB Mumbai
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी लखनौ येथे 'फिट इंडिया संडेज ऑन सायकल' कार्यक्रमात आज 500 हून अधिक सायकलस्वारांचे नेतृत्व केले. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेश सरकारचे क्रीडा आणि युवा कल्याण राज्यमंत्री गिरीश चंद्र यादव, प्रधान सचिव (क्रीडा) मनिष चौहान आणि उत्तर प्रदेश सचिव (क्रीडा) सुहास यतीराज हे देखील उपस्थित होते.

लठ्ठपणाशी लढण्याचा तसेच निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवताना "सायकलिंगमुळे केवळ आरोग्यच सुधारत नाही तर चारित्र्यही घडते" असे मत डॉ. मांडविया यांनी व्यक्त केले.
केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी मरीन ड्राइव्ह (सामाजिक परिवर्तन स्थळ) ते समता मुलख चौराहा ते 1090 चौराहा पर्यंत 3 किलोमीटरची सायकल सफर पूर्ण केली. परतीच्या प्रवासात भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) चे वरिष्ठ अधिकारी तसेच मायभारत इनिशिएटिव्ह आणि फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया (PEFI) चे सदस्य त्यांच्याबरोबर होते.

लखनौ येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या नेताजी सुभाष प्रादेशिक केंद्राने आयोजित केलेल्या या सायकलिंग मोहिमेत तरुण मुले आणि मुली आणि स्थानिक नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स (NCOE) मधील 100 हून अधिक खेळाडूंनी प्रचंड उत्साहाने सहभाग घेतला. सायकलिंग मोहिमेपूर्वी झुम्बा सादरीकरणाचा आनंदही त्यांनी घेतला.
सायकल रॅलीनंतर माध्यमांना संबोधित करताना डॉ. मांडविया यांनी नागरिकांना लठ्ठपणाशी लढण्यासाठी आणि देशभरातील वायू प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी आपल्या दैनंदिन दिनचर्येत सायकलिंगचा समावेश करण्याचे आवाहन केले.
दिल्लीत, 'फिट इंडिया संडेज ऑन सायकल' मध्ये पॅरिस पॅरालिम्पिक पॅरा बॅडमिंटन पदक विजेते नितेश कुमार आणि मनीषा रामदास यांनी हजेरी लावली. दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी हे खेळाडू दिल्लीत दाखल झाले आहेत. खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धा 2025 च्या अधिकृत अॅझक्सेसिबिलिटी पार्टनर तसेच स्वयंमच्या संस्थापक स्मिनू जिंदाल या देखील या कार्यक्रमात सहभागींना प्रेरित करण्यासाठी उपस्थित होत्या. नितेश, मनीषा आणि जिंदाल यांनी फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया (PEFI) च्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या सायकल राईडला हिरवा झेंडा दाखवला. या राईडमध्ये 600 हून अधिक लोक सहभागी झाले होते.
मुंबईत नयनरम्य अक्सा समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या सायकल राईडमध्ये आशियाई क्रीडा पदक विजेता भालाफेकपटू किशोर जेना यांनी भाग घेतला.

आतापर्यंत, 5000 ठिकाणी देशव्यापी सायकलिंग मोहीम आयोजित करण्यात आली असून त्यात सुमारे 2 लाखांहून अधिक व्यक्तींनी सहभाग नोंदवला.

‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’ ही सायकल राईड, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (CFI), माय बाईक्स आणि माय भारत यांच्या सहकार्याने युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय (MYAS) द्वारे आयोजित केले जाते. हा कार्यक्रम देशभरात एकाच वेळी भारतीय क्रीडा प्राधिकरणाची प्रादेशिक केंद्रे, राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे (NCOEs) आणि खेलो इंडिया केंद्रे (KICs) येथे आयोजित केला जातो.
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2114186)