राष्ट्रपती कार्यालय
भारतीय नौदल सामग्री व्यवस्थापन सेवा आणि भारतीय नौदल आयुध सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
17 MAR 2025 12:32PM by PIB Mumbai
भारतीय नौदल सामग्री व्यवस्थापन सेवा आणि भारतीय नौदल आयुध सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज (17 मार्च 2025) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

जागतिक भू-राजकीय तणाव वाढत असताना, देश सागरी सहकार्य वाढवत आहेत आणि संयुक्त सराव करत आहेत, असे राष्ट्रपती मुर्मू याप्रसंगी बोलताना म्हणाल्या. जागतिक स्तरावर भारत महत्वाची भूमिका बजावत असून , नौदल सामग्री व्यवस्थापन सेवा आणि नौदल आयुध सेवेचे अधिकारी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षम लॉजिस्टिक्स व्यवस्थापनाद्वारे भारतीय नौदलाच्या सेवेत महत्त्वाची भूमिका बजावतील, असेही त्या म्हणाल्या.

जगभरात होत असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान विकासाबद्दल आपले ज्ञान सतत अद्ययावत करण्याचा सल्ला राष्ट्रपतींनी अधिकाऱ्यांना दिला. सामग्री व्यवस्थापन आणि सेवा वितरण प्रणाली अखंड आणि प्रभावी करण्यासाठी अभिनव दृष्टिकोन अवलंबण्याचा सल्लाही त्यांनी दिला. अधिकाऱ्यांनी राष्ट्र आणि भारतीय नौदलाच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करावे असे आवाहनही त्यांनी केले. भारतीय नौदलात सर्वोत्तम सेवा देऊन हे अधिकारी राष्ट्र उभारणीत योगदान देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2111824)
आगंतुक पटल : 81