दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
दूरसंचार विभागाने 5जी इनोव्हेशन हॅकेथॉन 2025 ची केली घोषणा
Posted On:
17 MAR 2025 9:04AM by PIB Mumbai
दूरसंचार विभागाने 5जी इनोव्हेशन हॅकेथॉन 2025 ची घोषणा केली आहे. सामाजिक आणि औद्योगिक आव्हानांना तोंड देण्यासाठी नाविन्यपूर्ण 5जी-संचालित उपायांच्या विकासाला गती देणे, हा या सहा महिने चालणाऱ्या उपक्रमाचा उद्देश आहे. विद्यार्थी, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी खुला असलेला हा कार्यक्रम मार्गदर्शन, निधी पुरवठा आणि 100 हून अधिक 5जी युज केस लॅब्सपर्यंत पोहोच प्रदान करत आहे, ज्यामुळे सहभागींना दूरदर्शी कल्पनांचे तंत्रज्ञानात रूपांतर करण्यास मदत मिळते.
हॅकेथॉनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारीत नेटवर्क देखभाल, माहिती तंत्रज्ञान-सक्षम उपाय, 5जी प्रसारण, स्मार्ट आरोग्य, शेती, औद्योगिक ऑटोमेशन, नॉन-टेरेस्ट्रियल नेटवर्क्स (एनटीएन), डी2एम, व्ही2एक्स आणि क्वांटम कम्युनिकेशन यासारख्या प्रमुख 5जी अनुप्रयोगांवर लक्ष केंद्रित करणारे प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहेत. सहभागींना वास्तविक जगातील समस्या सोडवण्यासाठी नेटवर्क स्लाइसिंग, सेवेची गुणवत्ता आणि कॉल-फ्लो परिस्थिती यासारख्या 5G वैशिष्ट्यांचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जाते. हॅकेथॉन सहभागींना त्यांचे नवोन्मेष पुढील स्तरावर नेण्यास मदत करण्यासाठी अनेक प्रकारची मदत करत आहे. सहभागींना त्यांच्या बौद्धिक संपदा व्यावसायिकीकरणासाठी बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर) फाइलिंगमध्येही मदत केली जाणार आहे.
कार्यक्रम रचना आणि अंतिम मुदत
हॅकेथॉन अनेक टप्प्यात आयोजित केली जाणार असून प्रत्येक टप्पा, प्रस्ताव सादर करण्यापासून अंतिम मूल्यांकनापर्यंत कल्पनांचा पाठपुरावा आणि विकास करण्यासाठी काळजीपूर्वक डिझाइन केले आहे. पहिल्या टप्प्यात, सहभागींना त्यांच्या व्यापक कल्पना सादर करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. या प्रस्तावात ते त्यांच्या समस्या , प्रस्तावित उपाय आणि अपेक्षित परिणाम यांची रूपरेषा दाखल करणे आवश्यक आहे. प्रत्येक संस्थेला दूरसंचार विभागाच्या तपासणीसाठी पाच प्रस्ताव पाठवण्याची संधी असेल आणि प्रादेशिक समित्या पुढील मूल्यांकनासाठी सर्वोत्तम प्रस्तावांची निवड करतील.
प्रस्तावांची निवड झाल्यानंतर, प्रादेशिक शॉर्टलिस्टिंग टप्प्यात निवडलेल्या संघांना (150-200 प्रस्ताव) त्यांच्या कल्पनांवर काम करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल. अव्वल 25-50 संघ ‘प्रगती’ टप्प्यात जातील. तिथे त्यांना तीन महिन्यांच्या कालावधीत (15 जून - 15 सप्टेंबर 2025) त्यांच्या मूळ कल्पना विकसित करण्यासाठी प्रत्येकी 1,00,000 रुपये निधी दिला जाईल.
या टप्प्यात सहभागी असलेल्या सदस्यांना मार्गदर्शन केले जाईल.तसेच 5G युज केस प्रयोगशाळा आणि चाचणी पायाभूत सुविधा प्रदान केल्या जातील, जेणेकरून त्यांना त्यांच्या संकल्पना अधिक परिपूर्ण करता येतील. तसेच, जर कोणतीही उपाय योजना बौद्धिक स्वामित्व हक्क (आयपीआर) या मध्ये रूपांतरित होण्यास योग्य असेल, तर त्यासाठी आवश्यक सहकार्य आणि मदत दिली जाईल.
यातील शेवटचा टप्पा म्हणजेच मूल्यांकन आणि सादरीकरण.हा टप्पा सप्टेंबर 2025 च्या अखेरीस पार पडेल. यामध्ये विविध संघ त्यांचे प्रोटोटाइप 'तांत्रिक तज्ज्ञ मूल्यांकन समिती' (टीईईसी) समोर सादर करतील. या समितीत सरकारी, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील 5-7 तज्ञांचा समावेश असेल. मूल्यांकन खालील चार प्रमुख निकषांवर आधारित असेल: तांत्रिक अंमलबजावणी (40%), प्रसारयोग्यता व बाजारातील तयारी (40%), सामाजिक व औद्योगिक प्रभाव (10%) आणि नावीन्य (10%).
विजेत्यांची घोषणा ऑक्टोबर 2025 मध्ये केली जाईल. निवड झालेल्या उत्कृष्ट संघांना त्यांचे नवोपक्रम इंडिया मोबाईल काँग्रेस (आयएमसी) 2025 मध्ये सादर करण्याची संधी दिली जाईल, जो देशातील सर्वात प्रतिष्ठित तंत्रज्ञान उपक्रमांपैकी एक आहे.
पुरस्कार आणि मान्यता
विजेत्यांना आकर्षक पारितोषिके प्रदान केली जातील. यामध्ये 5,00,000 रुपये प्रथम क्रमांकासाठी, 3,00,000 रुपये उपविजेत्यासाठी 1,50,000 रुपये द्वितीय उपविजेत्यासाठी दिले जातील. तसेच, सर्वोत्कृष्ट संकल्पना आणि सर्वाधिक नाविन्यपूर्ण प्रोटोटाइप या विशेष पुरस्कारांसाठी प्रत्येकी 50,000 रुपये दिले जाईल. याशिवाय, 10 प्रयोगशाळांना उत्कृष्ट 5G युज केससाठी प्रशस्तिपत्रे, तसेच एक प्रशस्तिपत्र उदयोन्मुख संस्थेकडून सर्वोत्कृष्ट संकल्पनेसाठी प्रदान केले जाईल.
या उपक्रमासाठी 1.5 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ज्यामध्ये बीज भांडवल, आयपीआर सहाय्य, मार्गदर्शन आणि परिचालन खर्चाचा समावेश आहे. याचा उद्देश 50 पेक्षा अधिक प्रसारयोग्य 5G प्रोटोटाइप्स विकसित करणे, 25+ पेटंट्स निर्माण करणे, शैक्षणिक-सांस्थिक-सरकारी सहकार्य बळकट करणे आणि स्टार्टअप निर्मितीस पाठबळ देणे हा आहे.
यातील महत्त्वाच्या तारखांमध्ये 15 मार्च - 15 एप्रिल 2025 दरम्यान प्रस्ताव सादर करणे तसेच 1 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम विजेत्यांची घोषणा केली जाईल, तसेच प्रत्येकी दोन आठवड्यांनी प्रगती अहवाल तसेच केंद्रीकृत ट्रॅकिंग डॅशबोर्डच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या उद्दिष्टांची पूर्तता केली जाईल.
***
S.Kane/S.Mukhedkar/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2111787)
Visitor Counter : 27