पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 7 आणि 8 मार्च रोजी दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांना तसेच गुजरात राज्याला भेट देणार
सिल्वासा येथे या केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2,580 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन तसेच पायाभरणी
पंतप्रधान सिल्वासा येथे उभारण्यात येणाऱ्या नमो रुग्णालय प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार
सुरत येथे पंतप्रधानांच्या हस्ते सुरत अन्न सुरक्षा संपृक्तता अभियानाची सुरुवात तसेच 2.3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभांचे वितरण
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवसारी येथे आयोजित लखपती दीदी कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार
नवसारी येथे पंतप्रधानांच्या हस्ते जी-सफल (उपजीविकेत वाढ करण्याच्या उद्देशाने अंत्योदय योजनेतील कुटुंबांसाठी गुजरातमधील योजना) तसेच जी-मैत्री (ग्रामीण भागातील उत्पन्नातील परिवर्तनासाठीची गुजरात व्यक्तिगत मार्गदर्शन आणि त्वरीकरण योजना) यांची सुरुवात
Posted On:
07 MAR 2025 2:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मार्च 2025
पंतप्रधान 7 आणि 8 मार्च रोजी म्हणजेच आज आणि उद्या दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांना तसेच गुजरात राज्याला भेट देत आहेत. दिनांक 7 मार्च रोजी ते सिल्वासा येथे पोहोचतील आणि दुपारी 2 च्या सुमारास तेथे उभारण्यात येत असलेल्या नमो रुग्णालय प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील. दुपारी पावणेतीन वाजता सिल्वासा येथेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2,580 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते केली जाईल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरतला प्रयाण करतील आणि संध्याकाळी 5 वाजता ते सुरत अन्न सुरक्षा संपृक्तता अभियानाची सुरुवात करतील. उद्या दिनांक 8 मार्च रोजी पंतप्रधान नवसारी येथे पोहोचतील आणि तेथील लखपती दिदींशी संवाद साधतील. यानंतर होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते विविध योजनांचे उद्घाटन होईल.
पंतप्रधानांची दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांना भेट
देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील भागात आरोग्यसुविधांना प्रोत्साहन देण्यावर पंतप्रधानांनी प्राधान्याने लक्ष केंद्रित केले आहे. याच अनुषंगाने, ते सिल्वासा येथे उभारण्यात येणाऱ्या नमो रुग्णालय प्रकल्पाच्या कार्याच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील. सुमारे 460 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करून बांधण्यात येत असलेल्या तसेच 450 खाटांची सुविधा असलेल्या या रुग्णालयामुळे या केंद्रशासित प्रदेशातील आरोग्यसेवा सुविधा लक्षणीयरीत्या मजबूत होतील. या प्रदेशातील रहिवाशांना विशेषतः आदिवासी समुदायांना या रुग्णालयामुळे अत्याधुनिक वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध होतील.
पंतप्रधान सिल्वासा येथे या केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2,580 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांचे हस्ते उद्घाटन तसेच पायाभरणी करतील.
यामध्ये गावातील विविध रस्ते आणि इतर रस्ते-संबंधित पायाभूत सुविधा, शाळा, आरोग्य आणि कल्याण केंद्र, पंचायत आणि प्रशासकीय इमारती, अंगणवाडी केंद्रे, पाणीपुरवठा आणि सांडपाणीसंबंधी पायाभूत सुविधा इत्यादींचा समावेश आहे. या प्रकल्पांचे उद्दिष्ट कनेक्टिव्हिटी सुधारणे, औद्योगिक विकासाला चालना देणे, पर्यटनाला प्रोत्साहन देणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि या भागात सार्वजनिक कल्याणकारी उपक्रमांना चालना देणे हे आहे. पंतप्रधान रोजगार मेळा अंतर्गत नियुक्ती पत्रे वाटप करतील. ते पंतप्रधान आवास योजना - शहरी, गिर आदर्श आजीविका योजना आणि सिल्वन दीदी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभांचे वाटप देखील करतील.
गिर आदर्श आजीविका योजनेचा उद्देश अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC), अल्पसंख्याक आणि दिव्यांगजन आणि या भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. या साठी लहान दुग्धशाळा उभारून त्यांच्या जीवनात सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सिल्वन दीदी योजना ही महिला पथविक्रेत्यांसाठी आहे. या अंतर्गत पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या सह-निधीसह आकर्षकरित्या तयार केलेल्या गाड्या देऊन महिलांचे उत्थान करण्याचा हा एक उपक्रम आहे.
पंतप्रधान गुजरात दौऱ्यावर :
7 मार्च रोजी, पंतप्रधान सुरतमधील लिंबायत येथे सुरत अन्न सुरक्षा संतृप्ति अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ करतील आणि 2.3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत लाभ वितरित करतील.
महिला सक्षमीकरण हा सरकारने केलेल्या कामाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पंतप्रधानांच्या दूरदृष्टीयुक्त मार्गदर्शनाने सरकार त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पावले उचलण्यास वचनबद्ध आहे. याच अनुषंगाने, 8 मार्च रोजी, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, पंतप्रधान नवसारी जिल्ह्यातील वंसी बोरसी गावात लखपती दीदी कार्यक्रमात सहभागी होतील आणि लखपती दीदींशी संवाद साधतील. तसेच ते 5 लखपती दीदींना ‘लखपती दीदी प्रमाणपत्र’ देऊन त्यांचा गौरव करतील.
पंतप्रधान गुजरात सरकारच्या जी-सफल (अंत्योदय कुटुंबांसाठी गुजरात सरकारची योजना) आणि जी-मैत्री (ग्रामीण उत्पन्नात परिवर्तनासाठी व्यक्तींचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणारी गुजरात सरकारची योजना) कार्यक्रमांचा शुभारंभ करतील.
जी-मैत्री योजना ग्रामीण उपजीविकेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी काम करणाऱ्या स्टार्टअप्सना आर्थिक सहाय्य आणि मदत पुरवेल.
जी-सफल गुजरातमधील दोन आकांक्षी जिल्ह्यांमधील आणि तेरा आकांक्षी ब्लॉकमधील अंत्योदय कुटुंबांच्या स्वयंसेवा गटांच्या महिलांना आर्थिक सहाय्य आणि उद्योजकता प्रशिक्षण देईल.
* * *
JPS/S.Tupe/Sanjana/Hemangi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2109061)
Visitor Counter : 34
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam