भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

सर्व मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी नियमितपणे राजकीय पक्षांच्या बैठका आयोजित करून वैधानिक चौकटीच्या अधीन राहून समस्यांचे निराकरण करण्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश

Posted On: 04 MAR 2025 7:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 04 मार्च 2025

भारतीय निवडणूक आयोगाने आज नवी दिल्लीत आयआयआयडीईएम येथे सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांतील सीईओ अर्थात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची दोन दिवसीय परिषद घेतली.ग्यानेश कुमार यांनी  मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतरच्या काळात आयोजित करण्यात आलेली ही अशा प्रकारची पहिलीच बैठक आहे.सीईसी ग्यानेश कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू तसेच डॉ.विवेक जोशी यांनी या परिषदेत उपस्थित सीईओंशी विविध विषयांवर  चर्चा केली. प्रस्थापित कायदेशीर चौकटीच्या अधीन राहून निवडणूक व्यवस्थापनात सुधारणा घडवून आणण्याचा मार्ग  प्रशस्त करणाऱ्या मुद्द्यांचा या चर्चेत उहापोह करण्यात आला.

यावेळी केलेल्या भाषणात सीईसी ग्यानेश कुमार यांनी देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ), जिल्हा निवडणूक अधिकारी(डीईओ), निवडणूक नोंदणी अधिकारी (ईआरओ), मतदान केंद्र पातळीवरील अधिकारी (बीएलओ) यांना संपूर्ण पारदर्शकतेसह काम करण्याचे निर्देश दिले. या सर्वांनी विद्यमान कायदेशीर चौकटीनुसार तसेच भारतीय निवडणूक आयोगाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे असे निर्देश देखील त्यांनी दिले.

राजकीय पक्षांसाठी सुलभतेने संपर्क करण्यायोग्य तसेच त्यांच्याप्रती प्रतिसादक्षम राहण्याचे आदेश त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले. ईआरओ किंवा डीईओ किंवा सीईओ यांसारख्या संबंधित सक्षम अधिकाऱ्यांतर्फे विद्यमान वैधानिक चौकटीच्या अधीन राहून कोणतीही समस्या सोडवण्यासाठी वैधानिक स्तरावर नियमितपणे सर्वपक्षीय बैठका घेण्यात याव्यात असे ते पुढे म्हणाले. प्रत्येक सीईओने 31 मार्च 2025 पर्यंत संबंधित डीईसी कडे विषयवार कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संबंधित कायदा तसेच निवडणूक आयोगाच्या सूचना यांमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे सर्व सीईओज,डीईओज, आरओज, ईआरओज यांना आपापल्या भूमिका तसेच जबाबदाऱ्या यांची संपूर्ण माहिती असली पाहिजे यावर त्यांनी अधिक भर दिला. संविधानाच्या कलम 325 आणि कलम 326 नुसार देशातील वय वर्ष 18 आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांची मतदार नोंदणी झाली आहे याची सुनिश्चिती या  अधिकाऱ्यांनी करून घेणे अपेक्षित आहे. मतदारांशी सौजन्याने वागण्यासोबतच एखाद्याच्या चुकीच्या दाव्यांमुळे निवडणूक कर्मचारी अथवा अधिकारी घाबरून जाणार नाही याची सुनिश्चिती करून घेण्यासंदर्भातील प्रशिक्षण सर्व मतदार केंद्र अधिकाऱ्यांना देण्याचे निर्देश मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले.

प्रत्येक मतदान केंद्रात 800 ते 1200 मतदारांच्या मतदानाची सोय होईल आणि हे मतदान केंद्र प्रत्येक मतदाराच्या निवासस्थानापासून 2 किलोमीटरच्या परिघात असेल यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ग्रामीण भागांमध्ये मतदान सुलभतेने पार पडण्याच्या दृष्टीने खात्रीलायक किमान सुविधांसह योग्य पद्धतीची मतदान केंद्रे स्थापन करावीत. शहरी भागातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अतिउंच इमारतींसोबतच झोपडपट्टी समूहात देखील मतदान केंद्रे स्थापन करावीत अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

संवैधानिक ढाचा आणि कायदेविषयक तरतुदी यांचा अभ्यास केल्यानंतर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत 28 संबंधित लक्षात घेण्यात आले असून यामध्ये सीईओ, डीईओ, ईआरओ, राजकीय पक्ष,उमेदवार यांचा समावेश आहे.

या 28 भागधारकांची क्षमता निर्मिती अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

उद्या परिषदेचा समारोप झाल्यानंतर याबद्दलचे अधिक तपशील जाहीर करण्यात येतील.

पहिल्यांदाच, देशातील प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशातून प्रत्येकी एक डीईओ आणि एक ईआरओ या परिषदेत सहभागी झाले आहेत.


N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2108183) Visitor Counter : 13