सहकार मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते 3 मार्च रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे “दुग्धव्यवसाय क्षेत्रातील शाश्वतता आणि चक्रीयता यावरील कार्यशाळेचे” उद्घाटन होणार
कार्यशाळेत अनेक राज्यांमध्ये बायोगॅस संयंत्रे उभारण्यासाठीच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होईल
दुग्धव्यवसाय क्षेत्रातील शाश्वतता, कार्यक्षमता आणि चक्रीकरणक्षमता यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सहकार से समृद्धी’ हे स्वप्न साकार होऊ शकेल
या कार्यशाळेत दुग्धव्यवसाय पद्धतींच्या चक्रीकरणक्षमतेचा विस्तार करण्यासाठी चर्चा होईल तसेच दुग्धव्यवसाय अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाची भूमिका अधोरेखित केली जाईल
Posted On:
02 MAR 2025 7:29PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते 3 मार्च 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे "दुग्धजन्य क्षेत्रातील शाश्वतता आणि चक्रीकरणक्षमता यावरील कार्यशाळेचे" उद्घाटन होईल. या कार्यशाळेत सहकार मंत्रालय तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाची धोरणे आणि उपक्रम यावर भर असेल, ज्याचा उद्देश पर्यावरणीय जबाबदारीसह आर्थिक विकास सुनिश्चित करून शाश्वत दुग्धव्यवसायाला प्रोत्साहन देणे हा आहे.
चक्रीकरणक्षमता ही एक आर्थिक संकल्पना आहे जी उपलब्ध संसाधनांचा पर्यावरणपूरक वापर करण्याच्या दृष्टीने संसाधने, उत्पादने आणि साहित्यांचा पुनर्वापर, पुनर्निर्मिती आणि पुनर्प्रक्रिया यावर लक्ष केंद्रित करते.
या कार्यशाळेत विविध राज्यांमध्ये बायोगॅस संयंत्र उभारणीसाठीच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी, दुग्धव्यवसायात पर्यावरणपूरक पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी व्यापक मार्गदर्शक तत्त्वे जारी करणे आणि एनडीडीबी आणि नाबार्डच्या मोठ्या प्रमाणातील बायोगॅस/सीबीजी प्रकल्प आणि सस्टेन प्लस प्रकल्पांतर्गत नवीन वित्तपुरवठा उपक्रम राबविणे हे कार्यक्रम असतील. दुग्धजन्य कचऱ्याचे बायोगॅस, कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) आणि सेंद्रीय खतांमध्ये रूपांतर करणाऱ्या शाश्वत खत व्यवस्थापन मॉडेल्सवर कार्यशाळेत तांत्रिक सत्रे होतील.
एनडीडीबी, उद्योगसमूह आणि जागतिक संघटनांमधील तज्ञ चक्रीय दुग्ध व्यवसाय पद्धतींचा विस्तार, वित्तपुरवठा पर्यायांचा शोध, कार्बन क्रेडिट संधी आणि कचऱ्यापासून ऊर्जा मिळवण्याचे उपाय यावर चर्चा करतील तसेच दुग्ध व्यवसाय अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाची भूमिका अधोरेखित करतील. दुग्ध व्यवसायात शाश्वतता आणि चक्रीकरणक्षमता आल्याने तसेच वाढीव कार्यक्षमतेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'सहकार से समृद्धी' हे स्वप्न साकार होऊ शकेल.
ही कार्यशाळा भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग (डीएएचडी) द्वारे राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (एन डी डी बी) यांच्या समन्वयाने आयोजित केली जात आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल आणि जॉर्ज कुरियन, डीएएचडीच्या सचिव अलका उपाध्याय तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा, वन आणि हवामान बदल, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, रसायने आणि खते, जलशक्ती यासारख्या मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी इत्यादी प्रमुख मान्यवरांचा एकत्रित सहभाग असेल.
***
S.Patil/N.Mathure/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2107619)
Visitor Counter : 27