पंतप्रधान कार्यालय
दिल्लीतील ‘जहां-ए-खुसरो 2025’ कार्यक्रमातील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
Posted On:
28 FEB 2025 10:10PM by PIB Mumbai
कार्यक्रमात उपस्थित डॉ. कर्ण सिंह जी, मुजफ्फर अली जी, मीरा अली जी, अन्य महानुभाव, महिला आणि सज्जनांनो!
आज, जहां-ए-खुसरो येथे आल्यानंतर मन आनंदी होणे खूप स्वाभाविक आहे. हजरत अमीर खुसरो यांना ज्या वसंत ऋतूवर खूप प्रेम होते तो आज दिल्लीतील ऋतूमध्येच नाही तर जहां-ए-खुसरोच्या वातावरणातही आहे. हजरत खुसरो यांच्या शब्दात सांगायचे तर-
सकल बन फूल रही सरसों, सकल बन फूल रही सरसों,
अम्बवा फूटे टेसू फूले, कोयल बोले डार-डार...
येथील वातावरण खरोखरच काहीसे असेच आहे. इथे येण्यापूर्वी मला तेह बाजारला भेट देण्याची संधी मिळाली. त्यानंतर, मी फिरदौसच्या बागेत काही मित्रांसोबत शुभेच्छांची देवाणघेवाण केली. अलिकडेच, नजर-ए-कृष्णा आणि आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये काही गैरसोयी झाल्या. या गैरसोयींमध्ये देखील कलाकारांसाठी माइकची स्वतःची ताकद असते, परंतु त्यानंतरही, निसर्गाच्या मदतीने त्यांनी जे काही सादर करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ते देखील थोडे निराश झाले असतील. जे लोक हा आनंद अनुभवायला आले होते त्यांनाही निराशा झाली असेल. पण कधीकधी असे प्रसंग आपल्याला जीवनात बरेच काही शिकवून जातात. मला विश्वास आहे की आजचा प्रसंग आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवण देईल.
मित्रांनो,
असे प्रसंग केवळ देशाच्या कला आणि संस्कृतीसाठी महत्त्वाचे नसतात, तर ते समाधान देखील देतात. 'जहां-ए-खुसरो'ची ही मालिकाही 25 वर्षे पूर्ण करत आहे. या 25 वर्षांत या कार्यक्रमाने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे हे त्याचे सर्वात मोठे यश आहे. याबद्दल मी डॉ. कर्ण सिंह जी, मित्र मुजफ्फर अलीजी, भगिनी मीरा अलीजी आणि इतर सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. जहां-ए-खुसरोचा हा पुष्पगुच्छ अशाच प्रकारे बहरत राहावा यासाठी मी रुमी फाउंडेशनला आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. रमजानचा पवित्र महिनाही सुरू होणार आहे. मी तुम्हाला आणि माझ्या सर्व देशवासियांना रमजानच्या शुभेच्छा देतो. आज मी सुंदर नर्सरीत आलो आहे, त्यामुळे मला महामहिम प्रिन्स करीम आगा खान यांची आठवण येणे स्वाभाविक आहे. सुंदर नर्सरी सजवण्यात त्यांचे योगदान लाखो कलाप्रेमींसाठी वरदान ठरले आहे.
मित्रांनो,
सरखेज रोजा हे गुजरातमधील सूफी परंपरेचे एक प्रमुख केंद्र राहिले आहे. काळाच्या ओघात एके काळी त्याची परिस्थिति खूपच बिकट झाली होती. मी मुख्यमंत्री असताना, त्याच्या जीर्णोद्धारावर बरेच काम झाले होते आणि फार कमी लोकांना माहिती असेल की, एक काळ असा होता जेव्हा सरखेज रोजामध्ये कृष्ण उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असे आणि आजही आपण सर्वजण येथे कृष्ण भक्तीच्या रंगात बुडून जातो.
मी सरखेज रोजा येथे होणाऱ्या वार्षिक सुफी संगीत मैफिलीला सरासरी एकदा तरी उपस्थित राहायचो. सुफी संगीत हा एक सामायिक वारसा आहे जो आपण सर्वजण एकत्र जगत आलो आहोत. आपण सर्वजण असेच वाढलो आहोत. आता येथे नजर-ए-कृष्णाचे झालेले सादरीकरण देखील आपल्या सामायिक वारशाचे प्रतिबिंब दर्शवते.
मित्रांनो,
जहां-ए-खुसरोच्या या कार्यक्रमात एक वेगळाच सुगंध आहे. हा सुगंध भारताच्या मातीचा आहे. तो भारत ज्याची तुलना हजरत अमीर खुसरो यांनी स्वर्गाशी केली होती. आपला भारत हा स्वर्गाची ती बाग आहे, जिथे संस्कृतीचे सर्व रंग फुलले आहेत. इथल्या मातीत काहीतरी खास आहे. कदाचित म्हणूनच जेव्हा सूफी परंपरा भारतात आली तेव्हा तीला आपल्याच भूमीशी जोडल्या गेल्यासारखे वाटले. येथे बाबा फरीद यांच्या आध्यात्मिक प्रवचनांनी मनाला समाधान दिले. हजरत निजामुद्दीनच्या मेळाव्यांनी प्रेमाचे दिवे पेटवले. हजरत अमीर खुसरो यांच्या शब्दांनी नवीन मोती पेरले आणि त्याचा परिणाम हजरत खुसरो यांच्या या प्रसिद्ध ओळींमध्ये व्यक्त झाला.
बन के पंछी भए बावरे, बन के पंछी भए बावरे,
ऐसी बीन बजाई सँवारे, तार तार की तान निराली,
झूम रही सब वन की डारी।
सूफी परंपरेने भारतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सूफी संतांनी स्वतःला फक्त मशिदी किंवा खानकांपुरते मर्यादित ठेवले नाही, तर ते पवित्र कुराणातील शब्दांचे पठण करत आणि वेदांचे आवाज देखील ऐकले. त्यांनी अजानच्या आवाजात भक्तीगीतांचा गोडवा जोडला आणि म्हणूनच उपनिषदांमध्ये ज्याला संस्कृतमध्ये एकम सत् विप्र बहुधा वदंती म्हटले जाते, हजरत निजामुद्दीन औलिया यांनी हर कौम रास्त रहे, दीन-ए-वा किब्ला गाहे सारखी सूफी गाणी गाऊन तेच सांगितले. भाषा, शैली आणि शब्द वेगळे पण संदेश एकच आहे, मला आनंद आहे की आज जहां-ए-खुसरो त्याच परंपरेची आधुनिक ओळख बनली आहे.
मित्रांनो,
कोणत्याही देशाची सभ्यता आणि संस्कृती त्याच्या गाण्यांमधून आणि संगीतातून व्यक्त होते. तिथल्या कलाकृतींद्वारे व्यक्त होते. हजरत खुसरो म्हणायचे की, भारतातील या संगीतात एक संमोहन आहे, जंगलातील हरीण त्यांच्या जीवाची भीती विसरून शांत होतील अशी संमोहनशक्ती आहे.
भारतीय संगीताच्या महासागरात एका वेगळ्या प्रवाहाच्या रूपात सूफी संगीताचा समावेश झाला आणि त्याचे एका सुंदर लाटेत रुपांतरत झाले. सूफी संगीत आणि शास्त्रीय संगीत हे प्राचीन प्रवाह जेव्हा एकमेकांशी जोडले गेले तेव्हा आम्हाला प्रेम आणि भक्ती यांचा एक नवा आवाज ऐकायला मिळाला. तोच आम्ही हजरत खुसरो यांच्या कव्वालीमध्येही ऐकला. तोच आम्हाला बाबा फरीदच्या दोह्यांमध्ये गवसला. बुल्ले-शाहांच्या स्वरात मिळाला, मीरच्या गाण्यात मिळाला, इथेच आम्हाला कबीरही भेटले, रहीम आणि रसखान देखील भेटले. या साधू आणि संतांनी भक्तीला एक नवा आयाम देऊ केला. तुम्ही सूरदास वाचत असाल किंवा रहीम आणि रसखान किंवा बंद डोळ्यांनी हजरत खुसरोंना ऐकलेत, तेव्हा तुम्ही खोलवर त्याच जागी पोचता, जे अध्यात्मिक प्रेमाचे शिखर आहे. तिथे सर्व मानवी बंधने तोडली जातात व माणूस आणि भगवंताचा मिलाप झाल्याचे जाणवते. आपण लक्षात घ्या, हमारे रसखान मुस्लिम थे, पण ते हरी भक्त होते. रसखान म्हणत-
प्रेम हरी को रूप है, त्यों हरि प्रेम स्वरूप। एक होई द्वै यों लसैं, ज्यौं सूरज अरु धूप॥
म्हणजे प्रेम आणि भगवंत तसे पाहिले तर दोन्ही एकच रुपे आहेत, जसे सूर्य आणि सूर्यप्रकाश आणि हीच जाणीव तर हजरत खुसरो यांनाही झाली होती. त्यांनी लिहिले होते,
खुसरो दरिया प्रेम का, सो उलटी वा की धार। जो उतरा सो डूब गया, जो डूबा सो पार।।
म्हणजेच प्रेमामध्ये आकंठ बुडलो तरच भेदभावाचे अडथळे दूर होऊ शकतील. इथे झालेल्या भव्य सादरीकरणातही आपल्याला त्याचीच जाणीव झाली.
मित्रांनो,
सूफी परंपरेने केवळ माणसांतील आध्यात्मिक अंतर कमी केले नाही तर जगातील अंतरही कमी केले. मला आठवते की मी 2015मध्ये अफगाणिस्तानच्या संसदेत गेलो होतो, मला भावनिक शब्दांतून रुमीची आठवण झाली. आठ शतकांपुर्वी, रुमीचा जन्म अफगाणिस्तानच्या बल्ख प्रांतात झाला. आजही मला रुमीच्या लेखनाचा हिंदी अनुवाद इथे नक्कीच पुन्हा सांगावासा वाटतो कारण आजही त्याचे शब्द तितकेच प्रासंगिक आहेत. रूमी म्हणाला होता,
शब्दों को उंचाई दें, आवाज को नहीं, क्योंकी फूल बारीश में पैदा होते हैं, तूफान में नहीं।।
त्यांची अजून एक गोष्ट मला आठवते, स्थानिक शब्दांत सांगायचे तर, त्याचा अर्थ आहे, मी न पुर्वेचा आहे न पश्चिमेकडचा, मी ना समुद्रातून बाहेर पडलोय ना जमीनीतून आलो आहे, माझी कोणतीही जागा नाही, मी कोणत्याच जागेचा नाही, (मैं न पूरब का हूं न पश्चिम का, न मैं समंदर से निकला हूं और न मैं जमीन से आया हूं, मेरी जगह कोई है, है ही नहीं, मैं किसी जगह का नहीं हूं) म्हणजेच मी सर्वच जागी आहे. हे विचार, हे तत्वज्ञान आमच्या वसुधैव कुटुंबकम् या भावनेपेक्षा निराळे नाही. जेव्हा जगातल्या विविध देशांमध्ये मी भारताचे प्रतिनिधित्व करतो, तेव्हा हे विचार मला ताकद देतात. मला आठवतंय, मी जेव्हा इराणला गेलो होतो, तेव्हा संयुक्त पत्रकार परिषदेत मी मिर्झा गालिब यांचा शेर वाचला होता-
जनूनत गरबे, नफ्से-खुद, तमाम अस्त।
ज़े-काशी, पा-बे काशान, नीम गाम अस्त॥
म्हणजे, आम्ही जागृत होतो, तेव्हा काशी आणि काशान मधले अंतर केवळ अर्ध्या पावलाचे असल्याचे दिसते. खरंच, आजच्या जगात, युद्धामुळे मानवतेचे मोठे नुकसान होत आहे, तेव्हा हा संदेश खूप उपयुक्त ठरू शकतो.
मित्रांनो,
हजरत अमिर खुसरो यांना ‘तुती-ए-हिंद’ म्हटले जाते. भारताच्या प्रेमाखातर, भारताची स्तुती करणारी जी गाणी त्यांनी गायली आहे, हिंदुस्तानच्या महानतेचे, मनमोहकतेचे जे वर्णन त्यांनी केले आहे, ते त्यांच्या नुह-सिप्हर या पुस्तकात वाचायला मिळते. हजरत खुसरो यांनी भारताचे वर्णन त्या काळातील जगातील सर्व मोठ्या देशांपेक्षा श्रेष्ठ असे केले आहे. संस्कृत ही जगातली सर्वोत्तम भाषा आहे असे वर्णन त्यांनी केले. भारतातील ऋषीमुनींना ते महान विद्वानांपेक्षा श्रेष्ठ मानत होते. भारतातील शून्य, गणित, विज्ञान आणि तत्वज्ञान याचे ज्ञान जगाच्या उर्वरीत भागात कसे पोचले. भारतातील गणित अरबस्तानात कसे पोचले आणि हिंदसा म्हणून तेथे ओळखले जाऊ लागले. हजरत खुसरो यांनी केवळ त्यांच्या पुस्तकात याची नोंद केली नाही तर त्याविषयी त्यांना अभिमानही आहे. गुलामगिरीच्या दीर्घ कालावधीत कितीतरी गोष्टी नष्ट झाल्या, म्हणून जर आपल्याला भूतकाळाचा परिचय असेल तर त्यात हजरत खुसरोंच्या रचनांची मोठी भूमिका आहे.
मित्रांनो,
आपल्याला हा वारसा समृद्ध करत रहावा लागेल. जहां-ए-खुसरो यांच्यासारखे प्रयत्न ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पूर्ण करत आहेत याचे मला समाधान वाटते आणि गेली 25 वर्ष सातत्याने हे काम करणे ही काही छोटी गोष्ट नाही. मी माझ्या मित्राचे खूप खूप अभिनंदन करतो. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन करतो. काही अडचणी असूनही मला या कार्यक्रमाचा आनंद घेण्याची संधी मिळाली, त्यासाठी माझ्या मित्राचे मी मनापासून आभार मानतो.
खूप खूप धन्यवाद! खूप खूप धन्यवाद!
***
S.Tupe/H.Kulkarni/VSS/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2107529)
Visitor Counter : 8
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Marathi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu