दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2025 या प्रतिष्ठित परिषदेत केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया भारताचे प्रतिनिधित्व करणार


ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 ची झलक प्रदर्शित होणार, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) मधील भारताच्या दालनाचेही करणार उद्घाटन

मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) मधील भारताच्या सहभागातून जागतिक डिजीटल तंत्रज्ञान व मोबाईल परिसंस्थेचे नेतृत्व करणारा देश म्हणून भारताची भूमिका अधोरेखित होणार

तंत्रज्ञान विश्वाचे जागतिक केंद्र म्हणून भारत वेगाने उदयाला येत आहे, या पार्श्वभूमीवर मोबाईल वर्ल्ड काँग्रेससारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवरील सहभागाच्या निमित्ताने तंत्रज्ञान विश्वातील आंतरराष्ट्रीय भागिदारांसोबत होणारी चर्चा ही आपल्या नवोन्मेषाला गती देण्यासाठी आणि देशातील डिजिटल पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी महत्त्वाची: ज्योतिरादित्य सिंधिया

केंद्रीय मंत्री जोतिरादित्य सिंधिया मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) मधील ग्लोबल टेक गव्हर्नन्स: रायजिंग टू दि चॅलेंज तसेच बॅलन्सिंग दि इनोव्हेशन अँड रेग्युलेशन: ग्लोबल परसेप्टिव्ह ऑन टेलिकॉम पॉलिसी  या दोन संत्रांना संबोधित करणार

Posted On: 01 MAR 2025 9:07AM by PIB Mumbai

 

यावर्षीच्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2025 या प्रतिष्ठित परिषदेत केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. स्पेनमध्ये बार्सिलोना इथे 3 ते 6 मार्च 2025 या कालावधीत ही परिषद होणार आहे. ही परिषद म्हणजे तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठा आणि प्रभावशाली कार्यक्रमांपैकी एक आहे.

या परिषदेत ज्योतिरादित्य सिंधिया इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 ची झलक प्रदर्शित करतील, यासोबतच ते मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) मधील भारताच्या दालनाचेही उद्घाटन करतील.

इंडिया मोबाईल काँग्रेस हा भारताच्या नवोन्मेषविषयक परिसंस्थेचे जगला दर्शन घडवणारा महत्वाचा मंच आहे. याचबरोबरीने या मंचाच्या माध्यमातून भारतातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्या तसेच नवोन्मेष क्षेत्रातील प्रतिनिधींना त्यांनी साध्य केलेली अत्याधुनिक प्रगती तसेच शाश्वत उपाययोजा जगासमोर मांडण्याची संधी मिळते. मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये उभारलेल्या भारत पॅव्हेलियनमध्ये दूरसंचार क्षेत्राशी संबंधित उपकरणांचे भारतातील 38 उत्पादक त्यांची अत्याधुनिक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर उत्पादने प्रदर्शित करणार आहेत.

या परिषदेतील केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सहभागातून जागतिक डिजिटल व मोबाईल क्षेत्राचे नेतृत्व करणारा देश म्हणून भारताच्या वाढत्या भूमिकेला अधोरेखित करणारा ठरणार आहे. या परिषदेतील त्यांच्या सहभागामुळे डिजिटल परिवर्तन, नवोन्मेष तसेच दूरसंचार व तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्यांबाबतची भारताची वचनबद्धताही अधोरेखित होणार आहे.

या परिषदेनिमीत्त आपल्या स्पने दौर्‍यात, केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया 5G, कृत्रिम बुद्धिमत्ता, 6G, क्वांटम तसेच अत्याधुनिक मोबाईल तंत्रज्ञान या बाबतीतील प्रगत घडामोडींच्या अनुषंगाने या क्षेत्रातील जगातील आघाडीचे उद्योजक, धोरणकर्ते व नवोन्मेषकांसोबतची चर्चा करणार आहेत. ही परिषदे म्हणजे मोबाईल उद्योगाला नवा आकार देणाऱ्या महत्वाच्या कलांविषयी (trend) चर्चा करण्यासाठीचा एक महत्त्वाचा मंच ठरेणार आहे, तसेच या परिषदेतून डिजिटल क्षेत्रासंबंधीच्या भारताच्या महत्वाकांक्षा देखील ठळकपणे अधोरेखित होणार आहेत.

आपल्या या आगामी दौर्‍याविषयी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली. तंत्रज्ञान विश्वाचे जागतिक केंद्र म्हणून भारत वेगाने उदयाला येत आहे, या पार्श्वभूमीवर मोबाईल वर्ल्ड काँग्रेससारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवरील सहभागाच्या निमित्ताने तंत्रज्ञान विश्वातील आंतरराष्ट्रीय भागिदारांसोबत होणारी चर्चा ही आपल्या नवोन्मेषाला गती देण्यासाठी व देशातील डिजिटल पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान क्षेत्रातील जगभरातील आघाडीच्या तज्ञांसोबत विचारांची देवाणघेवाण, तसेच मोबाईल व दूरसंचार क्षेत्रातील सहकार्याच्या संधींबाबत चर्चा  करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले.

या परिषदेत होणाऱ्या विविध सत्रांनाही केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया संबोधित करणार आहेत. यात ते 'ग्लोबल टेक गव्हर्नन्स: रायजिंग टू दि चॅलेंज (जागतिक तंत्रज्ञानविषयक प्रशासन: आव्हानांचा सामना करताना), तसेच बॅलन्सिंग दि इनोव्हेशन अँड रेग्युलेशन: ग्लोबल परसेप्टिव्ह ऑन टेलिकॉम पॉलिसी (नवोन्मेष आणि नियमांमधील संतुलन: दूरसंचार धोरणाविषयीचा जागतिक दृष्टिकोन) या दोन संत्रांना संबोधित करणार आहेत.

बार्सिलोना इथे आयोजित मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2025 च्या निमित्ताने जागतिक स्तरावरील आघाडीचे कार्यकारी अधिकारी, दूरदर्शी संकल्पना - कल्पना मांडणारे तज्ञ व नवोन्मेषक सहभागी होणार आहेत. त्यामुळे हा मंच एका अर्थाने धोरणात्मक सहकार्य, ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी तसेच तंत्रज्ञानाच्या जगातील भारताच्या नेतृत्वाचे दर्शन घडवण्यासाठी मोठी संधी देणारा मंच ठरणार आहे.

 

 

***

S.Pophale/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2107186) Visitor Counter : 45