गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मणिपूरच्या सुरक्षा परिस्थितीबाबत नवी दिल्लीत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि या संदर्भात आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी पूर्णतः कटिबद्ध

8 मार्च 2025 पासून मणिपूरमधील सर्व रस्त्यांवर लोकांचा मुक्तपणे वावर सुनिश्चित करण्याचे तसेच आडकाठी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश

खंडणीच्या सर्व प्रकरणांमध्ये कठोर कारवाई सुरूच ठेवणार 

मणिपूर लगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील नियुक्त प्रवेश बिंदूंच्या दोन्ही बाजूंना कुंपण घालण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना

मणिपूरला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी, अंमली पदार्थांच्या व्यापाराशी निगडित संपूर्ण नेटवर्क उध्वस्त करण्याचे निर्देश

Posted On: 01 MAR 2025 2:38PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे मणिपूरच्या सुरक्षा परिस्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक झाली. या बैठकीला मणिपूरचे राज्यपाल, केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, लष्कर उपप्रमुख, पूर्व कमांडचे लष्करी कमांडर, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि आसाम रायफल्सचे महासंचालक, मणिपूरचे सुरक्षा सल्लागार आणि गृह मंत्रालय (एमएचए), लष्कर आणि मणिपूर प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून या संदर्भात आवश्यक ती सर्व मदत करत असल्याची माहिती केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बैठकीदरम्यान दिली.

8 मार्च 2025 पासून मणिपूरमधील सर्व रस्त्यांवर लोक मुक्तपणे वावरतील याची खातरजमा करण्याचे तसेच आडकाठी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले.

मणिपूर लगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील नियुक्त प्रवेश बिंदूंच्या दोन्ही बाजूंना कुंपण घालण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश अमित शाह यांनी दिले. मणिपूरला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी, अंमली पदार्थांच्या व्यापाराशी निगडित संपूर्ण नेटवर्क उध्वस्त केले पाहिजे असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

***

S.Patil/V.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2107456) Visitor Counter : 11