राष्ट्रपती कार्यालय
छतरपूरमधील गढा येथे सामूहिक विवाह सोहळ्याला राष्ट्रपतींची उपस्थिती
Posted On:
26 FEB 2025 2:40PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (26 फेब्रुवारी 2025) मध्य प्रदेशातील छतरपूर मधील गढा येथे श्री बागेश्वर जन सेवा समितीद्वारे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहिल्या.

उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, आज आपला देश महिला विकासाकडून महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाकडे वाटचाल करत आहे आणि आपण सर्वांनी आपल्या मुलींना आणि बहिणींना सशक्त आणि सक्षम बनवण्यासाठी योगदान दिले पाहिजे. महिलांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले. आपले छोटे छोटे प्रयत्न त्यांना सक्षम बनवतील असे त्या म्हणाल्या. महिलांनी स्वतःला शिक्षित आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, आपल्या परंपरेत, संतांनी शतकानुशतके लोकांना मार्ग दाखवला आहे. त्यांनी समकालीन समाजात प्रचलित असलेल्या सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला आहे. त्यांनी जात, लिंग इत्यादींवर आधारित भेदभावाविरुद्धही आवाज उठवला आहे. गुरु नानक असोत, संत रविदास असोत, संत कबीर दास असोत, मीराबाई असोत किंवा संत तुकाराम असोत, या सर्वांनी त्यांच्या शिकवणींद्वारे लोकांना योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित केले आहे. भारतीय समाजाप्रति त्यांच्या योगदानामुळे त्यांना आदराचे स्थान मिळाले आहे. त्या म्हणाल्या की, समकालीन आध्यात्मिक नेते स्वयंपूर्ण , सुसंवादी आणि पर्यावरण-स्नेही भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -
***
S.Patil/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2106456)
Visitor Counter : 51