पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची केली पायाभरणी
"आपली मंदिरे, मठ आणि पवित्र स्थळे हे एकीकडे श्रद्धा व संसाधन केंद्र राहिले आहेत आणि दुसरीकडे ती विज्ञान आणि सामाजिक जाणीवांचीही केंद्र आहेत": पंतप्रधान
"आयुर्वेद आणि योगशास्त्र हे विज्ञान आपल्या ऋषींनी दिले, जे आज संपूर्ण जगात नावाजले गेले आहे": पंतप्रधान
"जेव्हा देशाने मला सेवा करण्याची संधी दिली, तेव्हा 'सबका साथ, सबका विकास' हा मंत्र सरकारचा संकल्प बनवला आणि 'सबका साथ, सबका विकास' हा संकल्प सर्वांसाठी उपचार, सर्वांसाठी आरोग्य यावर आधारित आहे": पंतप्रधान
Posted On:
23 FEB 2025 7:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी झाली. अगदी काही दिवसातच बुंदेलखंडमध्ये दुसऱ्यांदा उपस्थित राहण्याचे भाग्य लाभल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले की, आध्यात्मिक केंद्र असलेले बागेश्वर धाम आता आरोग्य केंद्र देखील होणार आहे. त्यांनी सांगितले की, 10 एकर क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेमध्ये पहिल्या टप्प्यात 100 खाटांचे रुग्णालय उभारले जाईल.
पंतप्रधानांनी धीरेंद्र शास्त्री यांचे या उदात्त कार्यासाठी अभिनंदन केले आणि बुंदेलखंडच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सध्या काही राजकीय नेते धर्माचा उपहास करत आहेत आणि लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत. त्यांनी असेही नमूद केले की, विदेशी शक्ती देखील अशा लोकांना मदत करत आहेत, जेणेकरून आपला धर्म आणि राष्ट्र कमकुवत होईल. अशा लोकांनी हिंदू धर्माला विरोध करण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. पंतप्रधानांनी आपल्या श्रद्धा, परंपरा आणि मंदिरांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांचा उल्लेख केला.
ते पुढे म्हणाले की, आपल्या संतांवर, संस्कृतीवर आणि तत्त्वज्ञानावर टीका होत आहे. आपले सण, परंपरा आणि विधींना लक्ष्य केले जाते, तसेच आपल्या धर्माच्या प्रगतिशील स्वरूपावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. समाजात फूट पाडून त्याच्या एकतेवर आघात करणे हे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले.
धीरेंद्र शास्त्री यांनी दीर्घकाळापासून समाजात एकतेचा मंत्र पसरवण्याचे कार्य केले आहे, असे सांगून पंतप्रधानांनी घोषणा केली की, शास्त्री यांनी आता समाज आणि मानवतेच्या कल्याणासाठी कर्करोग संस्था उभारण्याचा आणखी एक संकल्प केला आहे.
त्यामुळे बागेश्वर धाम आता भक्ती, आरोग्य आणि निरोगी जीवनाचे केंद्र बनेल, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले, "आपल्या ऋषींनी आपल्याला आयुर्वेद आणि योगशास्त्र दिले आहे, जे आता संपूर्ण जग नावाजत आहे."
सेवा करणे आणि लोकांचे दु:ख दूर करणे हेच खरे धर्माचे स्वरूप असल्याचे ते म्हणाले. "नरात नारायण" आणि "शिवात सर्व जीव" ही आपली परंपरा आहे, असे सांगत त्यांनी महाकुंभच्या ऐतिहासिक यशाचे कौतुक केले.
ते पुढे म्हणाले की, "महाकुंभमध्ये कोट्यवधी लोकांनी स्नान करून संतांचे आशीर्वाद घेतले. याच वेळी 'नेत्र महाकुंभ' देखील सुरू आहे. या ठिकाणी दोन लाख लोकांची नेत्रतपासणी झाली, दीड लाख लोकांना मोफत औषधे आणि चष्मे मिळाले, तर 16 हजार लोकांना मोतीबींदू आणि इतर शस्त्रक्रियांसाठी विविध रुग्णालयांत पाठविण्यात आले आहे."
आपल्या ऋषींच्या मार्गदर्शनाखाली महाकुंभ दरम्यान अनेक आरोग्यविषयक उपक्रम राबवले जात आहेत, जिथे हजारो डॉक्टर आणि स्वयंसेवक निःस्वार्थ भावनेने सेवा देत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. कुंभमेळ्यात आलेल्या भाविकांनी या प्रयत्नांचे कौतुक केले असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतभरात मोठी रुग्णालये चालवण्यात धार्मिक संस्थांची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली. अनेक आरोग्य आणि विज्ञान संशोधन संस्थांच्या कारभाराचे व्यवस्थापन धार्मिक ट्रस्टद्वारे केले जाते आणि कोट्यवधी गरीब लोकांना उपचार आणि सेवा प्रदान करतात. भगवान श्रीरामांशी संबंधित बुंदेलखंडमधील पवित्र धार्मिक तीर्थस्थळ चित्रकूट, दिव्यांग आणि रुग्णसेवेचे एक प्रमुख केंद्र झाले आहे. आरोग्याचे आशीर्वाद देऊन बागेश्वर धाम या गौरवशाली परंपरेत एक नवा अध्याय जोडत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी अशीही घोषणा केली की दोन दिवसांनी, महाशिवरात्रीला 251 मुलींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. पंतप्रधानांनी, या उदात्त पुढाकाराविषयी बागेश्वर धामचे कौतुक केले आणि सर्व नवविवाहित जोडप्यांना आणि मुलींना भविष्यातल्या सुंदर आय़ुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.
‘शरीरमाद्यम खलु धर्म साधनम्’ हा संस्कृत श्लोकाचा उल्लेख करून, आपले शरीर आणि आरोग्य हेच आपला धर्म, आनंद आणि यश प्राप्त करण्याचे प्राथमिक साधन असल्याचे सांगून ते म्हणाले, देशाने सेवेची संधी देत जेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवला, तेव्हा त्यांनी ‘सबका साथ सबका विकास’ हा मंत्र सरकारचा संकल्प बनवला. ‘सबका साथ, सबका विकास’ याचा प्रमुख पाया हा ‘सबका इलाज, सबको आरोग्य’ असल्याचं सांगून सर्वांसाठी आरोग्यसेवा यावर भर देत विविध पातळ्यांवर रोग प्रतिबंधावर लक्ष केंद्रित केले आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालयांची निर्मिती करण्यात आल्याचे मान्य करून शौचालयांच्या कामामुळे अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारात घट झाल्याचे निदर्शनास आणून दिले. शौचालयांमुळे कुटुंबियांनी वैद्यकीय खर्चांवरील हजारो रुपयांची बचत केल्याचे दर्शवणाऱ्या एका अभ्यासाचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये त्यांचे सरकार सत्तेत येण्यापूर्वी, देशातील गरिबांना आजारपणापेक्षा उपचाराच्या खर्चाची जास्त भीती वाटत असे आणि कुटुंबातील गंभीर आजार संपूर्ण कुटुंबाला संकटात टाकू शकत होते असे निदर्शनास आणून दिले. ते देखील एका गरीब कुटुंबातून आले आहेत आणि अशा प्रकारच्या अडचणींचे ते साक्षीदार राहिले आहेत असे सांगून, उपचारांवरचा खर्च कमी करण्याचा आणि लोकांना जास्त पैसा वाचवता यावा यासाठी संकल्प केला. गरजू व्यक्ती सरकारी योजनांपासून वंचित राहू नये याप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत मोदी यांनी वैद्यकीय खर्चावरील भार कमी करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि आयुष्मान कार्डद्वारे प्रत्येक व्यक्तीला 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देण्याची तरतूद अधोरेखित केली. ज्यांनी हे कार्ड काढले नाही त्यांनी ते लवकरात लवकर काढून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
70 वर्षांवरील वृद्धांना कुटुंब गरीब असो, मध्यमवर्गीय असो किंवा श्रीमंत असो, मोफत उपचारांसाठी आयुष्यमान कार्ड ऑनलाईन मिळू शकते तसेच आयुष्मान कार्डासाठी कोणीही पैसे देऊ नयेत असे आवाहन केले आणि जर त्यासाठी कोणी पैसे मागितले तर त्यांनी तक्रार करावी असे आवाहन केले. अनेक उपचारांसाठी रुग्णालयात भरती होण्याची आवश्यकता नसते असे नमूद करून डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे घरच्या घरी घेतली जाऊ शकतात. औषधांचा खर्च कमी करण्यासाठी, 14000 हून अधिक जनऔषधी केंद्र देशभरात सुरू करण्यात आली आहे, जी परवडणाऱ्या औषधांचा पुरवठा करतात असेही त्यांनी यावेळी सांगितले. मूत्रपिंडाचा आजार ही आणखी एक महत्त्वाची आरोग्य समस्या असून त्यासाठी सतत डायालिसिसची गरज भासते आणि 700 जिल्ह्यांहून अधिक ठिकाणी 1500 डायालिसिस केंद्रे उभारण्यात आली आहेत, जिथे मोफत डायलिसिस सेवा उपलब्ध करून देतात. या सरकारी योजनांविषयी सर्वांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांमध्ये जागरुकता पसरवण्याचे आणि कोणीही लाभांपासून वंचित राहू नये याची खात्री करण्याचे आवाहन केले.
“कर्करोग हा सर्वत्र एक महत्त्वाचा विषय झाला असून; सरकार, समाज आणि संत असे सर्वच जण कर्करोगाविरूद्धच्या लढाईत एकत्र आलो आहोत.”, मोदींनी अधोरेखित केले. एखाद्याला कर्करोगाचे निदान झाले तर गावकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते, यावर त्यांनी भाष्य केले. यामध्ये लवकर निदानाचा अभाव आणि ताप, वेदना यांच्यावर घरगुती उपायांवर अवलंबून राहाण्याची मानसिकता यावर प्रकाश टाकत, परिणामी परिस्थिती वाईट होते तेव्हा उशिरा निदान होते. कर्करोगाचे निदान झाल्याचे ऐकून कुटुंबामध्ये निर्माण होणारी भीती आणि गोंधळ लक्षात घेता, अनेकदा त्यांना फक्त दिल्ली आणि मुंबई येथील उपचार केंद्रांविषयी माहिती असते. या आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांवर त्यांनी भर दिला ज्यामध्ये कर्करोगाशी लढण्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक घोषणांचा समावेश असल्याचं सांगितले. ते पुढे म्हणाले की, कर्करोगावरील औषधोपचार अधिक किफायतशीर करण्यासाठी सरकार वचनबद्ध असून, पुढील तीन वर्षात प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग डेकेअर केंद्रे उघडण्याची घोषणा त्यांनी केली. ही केंद्रे निदान आणि काळजी सेवा दोन्ही पुरवतील. जिल्हा रुग्णालयांमध्ये आणि कर्करोग दवाखाने आणि स्थानिक परिसरात वैद्यकीय केंद्रे सुरू करणार असल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी कर्करोगापासून संरक्षणासाठी सतर्कता आणि जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी स्पष्ट केले की कर्करोगाचे लवकर निदान होणे अत्यंत गरजेचे आहे, कारण तो एकदा शरीरात पसरला की त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होते. त्यांनी 30 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य तपासणीद्वारे स्क्रीनिंग करण्यासाठी सुरू असलेल्या राष्ट्रीय मोहिमेचा उल्लेख केला आणि सर्वांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. कोणताही संशय असल्यास त्वरित कर्करोग तपासणी करून निष्काळजीपणा टाळावा, असे त्यांनी बजावले.
कर्करोगाबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत, त्यामुळे त्याबद्दल योग्य माहिती असणे आवश्यक आहे. कर्करोग संसर्गजन्य नाही आणि तो स्पर्शाने पसरत नाही, हे स्पष्ट करताना त्यांनी तंबाखू, गुटखा, सिगारेट, विडी आणि मसाल्यांच्या अतिसेवनामुळे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, असे सांगितले. या घातक पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन करत, त्यांनी आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचे अधोरेखित केले. स्वतःच्या शरीराची जबाबदारी घेत योग्य जीवनशैली अवलंबण्याचा सल्ला त्यांनी दिला आणि आरोग्य तपासणीला प्राधान्य देण्याचे महत्त्व समजावून सांगितले.
पंतप्रधानांनी आपल्या सेवाभावाची आठवण करून देताना, मागील छत्तरपूर दौऱ्यात त्यांनी हजारो कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्याचे सांगितले. विशेषतः 45,000 कोटी रुपयांच्या केन-बेतवा लिंक प्रकल्पाचा त्यांनी उल्लेख केला, जो अनेक दशकांपासून प्रलंबित होता. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की बुंदेलखंडच्या कायमस्वरूपी पाणीटंचाईवर मागील कोणत्या सरकारांनी ठोस उपाययोजना केल्या होत्या? त्यांनी स्पष्ट केले की, हा प्रकल्प केवळ जनतेच्या आशीर्वादाने शक्य झाला आहे.
जलजीवन मोहिमे अंतर्गत हर घर जल योजनेच्या माध्यमातून बुंदेलखंडातील गावांना पाईपने शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे, असे सांगून त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर सरकारच्या विशेष प्रयत्नांचा उल्लेख केला. शेती आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार अहोरात्र कार्यरत आहे, असे सांगत त्यांनी कृषीविकासाच्या दिशेने सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
बुंदेलखंडच्या विकासासाठी महिला सक्षमीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून पंतप्रधानांनी लखपती दीदी आणि ड्रोन दिदी या योजनांची माहिती दिली. त्यांनी जाहीर केले की 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिलांना ड्रोन ची हाताळणी करण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जात आहे, जेणेकरून भविष्यात हे तंत्रज्ञान शेतीतील औषध फवारणी आणि कृषी सहाय्यक कामांसाठी वापरता येईल. यामुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी उत्पादन वाढेल.
पंतप्रधानांनी स्वामित्व योजनेअंतर्गत गावांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, या तंत्रज्ञानाच्या मदतीने जमिनीचे अचूक मोजमाप आणि अधिकृत जमीन नोंदी तयार केल्या जात आहेत. मध्यप्रदेशमध्ये या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाल्यामुळे, लोकांना त्यांच्या जमिनींच्या अधिकृत कागदपत्रांच्या आधारे बँकांकडून कर्ज मिळवणे अधिक सोपे झाले आहे. परिणामी ग्रामीण भागात व्यावसायिक संधी वाढत असून, नागरिकांचे उत्पन्नही वाढत आहे.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना बुंदेलखंडच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारे पूर्ण बांधिलकीने कार्यरत आहेत, हे स्पष्ट केले. हा प्रदेश सतत समृद्धीच्या दिशेने वाटचाल करेल आणि नागरिकांचे जीवनमान उंचावेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.
मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगुभाई छगनभाई पटेल आणि मुख्यमंत्री मोहन यादव, तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पार्श्वभूमी
गढा गाव, छत्तरपूर जिल्हा, मध्यप्रदेश येथे बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्था उभारली जात आहे. या संस्थेमुळे समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा मिळेल.
विशेषतः 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या कर्करोग रुग्णालयात गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना मोफत उपचार दिले जातील. हे रुग्णालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल आणि येथे अनुभवी तज्ञ डॉक्टर उपलब्ध असतील, जेणेकरून रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळेल.
* * *
S.Patil/Nitin/Vijayalaxmi/Gajendra/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2105665)
Visitor Counter : 20