सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात पुण्यामध्ये जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी समारोप सोहळ्याला केले संबोधित

Posted On: 22 FEB 2025 7:09PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रात पुण्यामध्ये जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी समारोप सोहळ्याला संबोधित केले. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

जनता सहकारी बँकेने संपादन केलेला विश्वास ही आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे, असे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले. निस्वार्थ जीवन जगलेले आणि कोणत्याही आव्हानाला पाठ न दाखवणारे नामवंत विचारवंत आणि प्रसिद्ध आरएसएस कार्यकर्ते मोरोपंत पिंगळे यांनी जनता सहकारी बँकेची स्थापना केली होती, असे ते म्हणाले.  या बँकेच्या स्थापनेच्या माध्यमातून मोरोपंतांनी जे बीज पेरले त्याचे आता एका मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे, ज्याने 10 लाख लोक जोडले गेले आहेत, असे शाह म्हणाले.

2047 सालापर्यंत भारताला संपूर्णपणे विकसित राष्ट्र बनवणे आणि 2027 पर्यंत देशाला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणे हे दोन संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर ठेवले आहेत, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. सहकार क्षेत्राच्या विकासाशिवाय हे दोन संकल्प अपूर्ण राहतील, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक व्यक्तीचा विकास आणि प्रत्येक घराची समृद्धी झाली नाही तर हे दोन संकल्प अपूर्ण राहू शकतील, यावरही त्यांनी भर दिला.

गेल्या तीन वर्षात मोदी सरकारने सहकार चळवळीला विशेष चालना दिली आहे, असे केंद्रीय सहकारमंत्र्यांनी नमूद केले. भारताच्या सहकारी मॉडेलला बाजारपेठेच्या दृष्टीने उपयुक्त बनवण्यात आले आहे आणि मोदी सरकार आपल्या युवा वर्गाचे सहकाराच्या शिक्षणाने सक्षमीकरण करण्यासाठी सहकारी विद्यापीठ विधेयक आणत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सरकारला सहकारी नवोन्मेषाचे एकात्मिकरण करायचे आहे आणि त्याला देशाच्या विकासाचे चालक बळ बनवायचे आहे, असे त्यांनी नमूद केले. सहकाराच्या विकासाला योग्य दिशा देण्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे त्यांनी सांगितले.

सातत्यपूर्ण विकासासाठी सहकारी क्षेत्राकडून नव्या तंत्रज्ञानाचा अंगिकार अनिवार्य आहे, असे अमित शाह म्हणाले. देशामध्ये एकूण 1465 नागरी सहकारी बँका असून त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात 460 बँका आहेत असे त्यांनी सांगितले.

1949 मध्ये स्थापना झाल्यानंतर 1988 मध्ये जनता सहकारी बँक शेड्युल्ड सहकारी बँक झाली, 2005 मध्ये तिने कोअर बँकिंगचा अंगिकार केला आणि 2012 मध्ये ती बहु-राज्य शेड्युल्ड सहकारी बँक बनली आणि त्यानंतर देशातील पहिली सहकारी डीमॅट संस्था बनण्याचा बहुमान देखील तिने मिळवला, अशी माहिती त्यांनी दिली. 71 शाखा आणि 2 विस्तारित काउंटर तसेच 1,75,000 सदस्य आणि 10 लाख समाधानी ग्राहकांसह ही बँक केवळ एक बँक नाही, तर एक मोठे कुटुंब बनले आहे, अशा शब्दात त्यांनी या बँकेची प्रशंसा केली.

***

M.Pange/S.Patil/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2105597) Visitor Counter : 64