माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वेव्ह्ज ट्रेलर निर्मिती स्पर्धा


जिथे सर्जनशीलतेची भेट चित्रपटाशी होते

Posted On: 18 FEB 2025 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2025

परिचय

सर्जनशील प्रतिभेचा अविष्कार : वेव्ह्ज : ट्रेलर मेकिंग स्पर्धा ही उदयोन्मुख चित्रपटनिर्मात्यांसाठी नेटफ्लिक्सच्या विस्तृत आशयसंग्रहाचा वापर करून आकर्षक ट्रेलर निर्मिती करण्याची एक रोमांचक संधी आहे. जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद म्हणजेच वेव्ह्जच्या क्रिएट इन इंडिया चॅलेंज या चौथ्या स्तंभाअंतर्गत या स्पर्धेच्या माध्यमातून सहभागी सदस्यांना काही गाजलेल्या  दृश्यांची पुनर्कल्पना करण्यास किंवा ट्रेलर- निर्मितीच्या कलेद्वारे नवीन दृष्टीकोन सादर करण्यास प्रोत्साहित करते. या स्तंभाअंतर्गत चित्रपट तयार करणे, निर्मिती, जागतिकीकरण या जगाचा धांडोळा घेऊन सहभागींना त्यांची प्रतिभा आणि नैपुण्य दाखवण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान केले जाणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि नेटफ्लिक्स, भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ आणि रेस्किल यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्जनशील भागीदार असून या स्पर्धेचा उद्देश आशय निर्मात्यांच्या पुढील पिढीला प्रेरणा देऊन त्यांना सुसज्ज करणे असा आहे.

1 ते 4 मे 2025 या कालावधीत  मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डन्स येथे होणारी  जागतिक दृक-श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, वेव्ह्ज माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक कार्यक्रम असेल. उद्योग धुरीण, निर्माते आणि नवोन्मेषकांना एकत्र आणून, वेव्हज भारताच्या सर्जनशील क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक व्यासपीठ म्हणून काम करताना उदयोन्मुख कल, संधी आणि आव्हानांवर चर्चा करेल.

वेव्हजच्या केंद्रस्थानी असलेल्या क्रिएट इन इन इंडिया चॅलेंजेस'ला प्रचंड प्रतिसाद  मिळाला असून  जगभरातून 70,000 हून अधिक जणांनी नोंदणी केली आहे.  सर्जनशीलता आणि नवोन्मेषाला प्रेरणा देण्यासाठी आखलेला हा उपक्रम कथाकारांना सीमा ओलांडण्यास आणि आशय निर्मितीची पुनर्परिभाषा करण्यास सक्षम करतो. आतापर्यंत सुरू केलेल्या 31 चॅलेंजेसपैकी 22 चॅलेंजेसमध्ये जागतिक सहभाग नोंदवला गेला आहे.  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रमुख उपक्रम म्हणून, ही आव्हाने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी  गतिमान केंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत करत आहेत.

ही स्पर्धा व्हिडीओ एडिटिंग, चित्रपट निर्मिती किंवा आशय निर्मितीची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि इच्छुक चित्रपट निर्मात्यांसाठी खुली आहे. यात सहभाग घेण्यासाठी अर्जदारांचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.

मनोरंजन उद्योगातील तज्ञांचे एक पॅनेल सर्जनशीलता, कथाकथन, तांत्रिक अंमलबजावणी आणि एकूण परिणाम या निकषांवर ट्रेलरचे मूल्यांकन करेल. अनेक फेऱ्यांमधून निवड प्रक्रिया होईल, सहभागींना त्यांची कलाकृती अधिक संपन्न करण्यासाठी  विविध टप्प्यांवर अभिप्राय मिळतील.       

कालावधी :

उद्‌घाटन: 29 सप्टेंबर 2024

अर्ज प्रक्रिया सुरु : 29 सप्टेंबर 2024

अंतिम ट्रेलर सादर करणे: 31 मार्च 2025 पर्यंत

अव्वल  20 जणांच्या नावांची  घोषणा: एप्रिल 2025 चा दुसरा आठवडा

ट्रेलर मेकिंग स्पर्धा: वेव्ह्ज परिषद  (1 ते 4 मे, 2025)   

नोंदणीविषयीचा तपशील

नोंदणी प्रक्रिया सध्या सुरु असून ती 31 मार्च 2025 पर्यंत सुरु आहे. 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत, जगभरातून एकूण 3,313 सहभागींनी नोंदणी केली आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी अनेक इच्छुकांनी प्रतिसाद दिला असून त्यात आशय निर्माते आणि व्हिडिओ एडिटर बनण्याची इच्छा असलेले महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच आपला छंद किंवा आवड जोपासण्याची इच्छा असणारे किंवा सध्या याच क्षेत्रात कार्यरत असलेले आणि संपादक आणि निर्माते म्हणून कार्य करु इच्छिणाऱ्या व्यावसायिकांचा समावेश आहे.

येथे नोंदणी करा : https://reskilll.com/hack/wavesficci/signup

पुरस्कार आणि कौतुक

सर्व सहभागी

वैध ट्रेलर सादर केल्यास सहभागाचे प्रमाणपत्र

अव्वल  50

उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र आणि फिक्की  आणि नेटफ्लिक्स  द्वारे विशेष मान्यता

अव्वल 20

चषक , विशेष पुरस्कार आणि मुंबईतील वेव्ह्ज परिषदेत  सहभागी होण्याची संधी

रोड शो: सर्जनशीलता आणि स्पर्धेला चालना

सर्जनशील प्रतिभेला अधिक समृद्ध करण्यासह त्यांना प्रेरणा देणारे  रोडशो, ट्रेलर निर्मिती स्पर्धेच्या केंद्रस्थानी आहे. गुरु तेग बहादूर चार शतकोत्तर  अभियांत्रिकी महाविद्यालय (GTB4CEC) येथे नुकताच झालेला रोडशो याचा दाखल देत असून याअंतर्गत महत्त्वाकांक्षी चित्रपट निर्मात्यांना शिक्षण आणि उद्योगविषयक माहिती देण्यात आली. हे रोड शो अंतिम सोहळ्याच्या सज्जतेच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत सहभागींना आकर्षक ट्रेलर तयार करण्यासाठी कौशल्य आणि आत्मविश्वासाने सुसज्ज करत आहेत.

सहभागींचा अनुभव :

हँड्स-ऑन वर्कशॉप्स अर्थात प्रत्यक्ष कार्यशाळा : ग्रीन स्क्रीन एडिटिंग, कलर करेक्शन आणि प्रगत व्हिडिओ एडिटिंग तंत्रांचे व्यावहारिक प्रशिक्षण.

क्रिएटिव्ह चॅलेंज अर्थात सर्जनशीलतेला आव्हान: उपस्थितांनी दिलेल्या संकल्पनेवर आधारित आकर्षक ट्रेलर तयार केले असून त्यातून त्यांची  कथाकथनाची  आणि तांत्रिक क्षमता दिसून येते.

इंडस्ट्री इनसाइट्स अर्थात मनोरंजन विश्वातील अनुभूती : तज्ञांचे एक पॅनेल ट्रेलरचे मूल्यमापन करते आणि सहभागींना त्यांची कलाकृती अधिक बहारदार  करण्यासाठी मौल्यवान अभिप्राय दिले जातात.

प्रतिभेचे दर्शन: नवोदित चित्रपट निर्माते आणि एडिटर्स यांचा चैतन्यदायी सहभाग या  स्पर्धेची सर्जनशील परिसंस्था मजबूत करतो.    

संदर्भ :

S.Patil/B.Sontakke/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2104517) Visitor Counter : 14