माहिती आणि प्रसारण मंत्रालय
बर्लिनेल 2025 मध्ये वेव्हज आऊटरिच कार्यक्रम संपन्न!
बर्लिन चित्रपट महोत्सवात सहभागी चित्रपट उद्योगांतील प्रमुख व्यक्तींना वेव्हज 2025 परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण
Posted On:
15 FEB 2025 8:01PM by PIB Mumbai
मुंबई 15 फेब्रुवारी 2025
बर्लिन चित्रपट महोत्सव 2025 मध्ये आज वेव्हज 2025 साठीचा आऊटरिच कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी भारतीय शिष्टमंडळाने युरोपियन चित्रपट बाजारपेठेत आघाडीवर असलेल्या जगभरातील प्रमुख चित्रपट निर्मात्यांशी विचार विनिमय केला. हे सत्र म्हणजे भारतातील प्राचीन वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञानविषयक प्रगतीचे अनोखे मिश्रण प्रदर्शित करण्यासाठीचा मंच ठरला आणि त्यातून माध्यमे तसेच मनोरंजन क्षेत्र यांच्या जागतिक सहयोगी संबंधांना चालना मिळाली.देशातील एव्हीजीसी क्षेत्रात सहयोग आणि नवोन्मेष यांना प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने या सत्रादरम्यान चित्रपट उद्योगातील आघाडीचे निर्माते आणि प्रमुख तंत्रज्ञान तज्ञ यांना वेव्हज 2025 या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले.
बर्लिन येथील कार्यक्रमात बोलताना, ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता शेखर कपूर यांनी भारतीय मनोरंजन उद्योगातील प्रचंड क्षमता अधोरेखित करणारे प्रेरणादायक भाषण केले. वेव्हज हा कार्यक्रम म्हणजे आघाडीच्या आंतरराष्ट्रीय उद्योगांना भारताच्या जलदगतीने विकसित होणाऱ्या एव्हीजीसी-एक्सआर(अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि विस्तारित वास्तव) क्षेत्राशी सहयोग करण्याची उत्तम संधी आहे असे ते म्हणाले.
शेखर कपूर यांनी बोलताना भारतातील तंत्रज्ञानविषयक प्रगतीवर अधिक भर दिला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारत लवकरच जागतिक नेतृत्व म्हणून उदयाला येईल असा विश्वास व्यक्त केला.
कथा सांगण्यासाठी विविध माध्यमांची आवश्यकता असते आणि वेव्हज 2025 हा कार्यक्रम सर्जकांना अभिनव आणि गुंगवून टाकणाऱ्या पद्धतीने त्यांच्या कथा सांगण्यासाठी अत्याधुनिक मंच उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आला आहे असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी भारताचे प्रचंड सांस्कृतिक वैविध्य, परंपरा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी त्यांचा संगम अधोरेखित करणारे सादरीकरण केले.
या सादरीकरणातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
- भारतातील प्राचीन कथाकथन परंपरांना आधुनिक डिजिटल स्वरुपांशी जोडण्यात वेव्हज ची भूमिका.
- बी2बी सहयोग आणि वेव्हज बजार या वेव्हज मंचाच्या माध्यमातून भारतीय आणि जागतिक सर्जकांमधील सहयोगाची जोपासना करण्यावर या उपक्रमाने लक्ष केंद्रित केले आहे.
- वेव्हएक्ससीलरेटर कार्यक्रमाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी अॅनिमेशन, गेमिंग आणि एक्सआर तंत्रज्ञानातील संधी
- क्रिएट इन इंडिया स्पर्धेच्या पहिल्या पर्व अंतर्गत 30 हून अधिक स्पर्धांच्या माध्यमातून कल्पनाशक्ती तसेच नवोन्मेष यांच्या ताकदीचे प्रदर्शन करणे.
- आशय निर्माते, स्टार्ट अप्स तसेच माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील तंत्रज्ञान प्रगतीला पाठबळ देणारे सरकारी उपक्रम
***
S.Kane/S.Chitnis/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2103696)
Visitor Counter : 24