माहिती आणि प्रसारण मंत्रालय
जागतिक दृक्श्राव्य मनोरंजन परिषद (वेव्हज), आयईआयसी आणि विनझो यांनी भारतातील गेमिंग विषयक नवोन्मेष उपक्रमांचे जागतिक मंचावर प्रदर्शन करण्यासाठी टेक ट्रम्फच्या तिसऱ्या पर्वाची केली सुरुवात
वेव्हजतर्फे सुवर्णसंधी: 20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करा, नोंदणी प्रक्रिया लवकरच समाप्त होत आहे, ही संधी घालवू नका.
Posted On:
15 FEB 2025 5:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 15 फेब्रुवारी 2025
तुम्हाला गेमिंग उद्योगात कारकीर्द उभारण्याची इच्छा आहे पण योग्य मंच आणि वित्तपुरवठ्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे? जागतिक दृक्श्राव्य मनोरंजन परिषदेने (वेव्हज) टेक ट्रम्फ च्या तिसऱ्या पर्वाच्या रूपाने तुमच्या प्रतिभेचे दर्शन घडवण्याची अतुलनीय संधी आणली आहे, मग तुम्ही भारतात असा किंवा परदेशात! देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या सहभागींसाठी खुली असलेल्या या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता 20 फेब्रुवारी, 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
देशातील या सर्वात मोठ्या गेमिंग स्पर्धेच्या विजेत्यांना 17 ते 21 मार्च दरम्यान सॅन फ्रान्सिस्को येथे होणाऱ्या गेम डेव्हलपर्स परिषदेत (जीडीसी) तसेच नंतर भारतातील वेव्हज मध्ये संपूर्णतः पुरस्कृत पद्धतीने आपापली उत्पादने, आयपी तसेच तंत्रज्ञान यांचे सादरीकरण करण्याची संधी मिळेल.

टेक ट्रम्फ कार्यक्रम
क्रिएट इन इंडिया स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा एक भाग म्हणून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या (एमआयबी) भागीदारीसह परस्परसंवादी मनोरंजन आणि नवोन्मेष मंडळातर्फे (आयईसीआय) टेक ट्रम्फ हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. जागतिक दृक्श्राव्य मनोरंजन परिषदेपूर्वी (वेव्हज) ही स्पर्धा भारतातील गेमिंग प्रतिभा ओळखून, त्यांना मान्यता देऊन गेम डेव्हलपर परिषद, 2025 मध्ये वेव्हज तसेच इंडिया पॅव्हिलियनच्या आंतरराष्ट्रीय मंचांवर ती प्रदर्शित करेल.
टेक ट्रम्फच्या तिसऱ्या पर्वासाठी 1000 हून अधिक नोंदण्या यापूर्वीच झाल्या असून भारतातील गेमिंग परिसंस्था आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कायमस्वरूपी प्रभाव पाडण्यासाठी सज्ज झाली असून चैतन्यपूर्ण आणि जागतिक दृष्ट्या मान्यताप्राप्त अशा ‘मेड इन इंडिया’ तंत्रज्ञान उद्योगाची उभारणी करण्याच्या देशाच्या महत्त्वाकांक्षेला जोपासत आहे.
हा उपक्रम गेमिंग तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा यांचे जागतिक उर्जाकेंद्र बनण्याच्या भारताच्या स्वप्नाला अनुसरून आहे. भारतातील एव्हीजीसी आणि (विस्तारित वास्तव) एक्सआर या देशाच्या अर्थव्यवस्थेत आता महत्त्वाचे योगदान देणाऱ्या क्षेत्रांच्या विकासाने त्याला हातभार लावला आहे. फिक्की-ईवाय अहवालानुसार, भारतातील माध्यम क्षेत्रामध्ये डिजिटल आणि ऑनलाईन गेमिंग यांची सर्वाधिक वाढ झाली आहे.
अधिक माहितीसाठी कृपया पुढील संकेतस्थळाला भेट द्या: https://www.thetechtriumph.com/
स्पर्धेतील टप्पे
1. 20 फेब्रुवारी 2025 – गेम सबमिशन
स्पर्धेसाठी नोंदणी
2. 23 फेब्रुवारी 2025 – तज्ज्ञांकडून मूल्यांकन
निवड झालेल्या उमेदवारांचे परीक्षकांसमोर सादरीकरण
3. 28 फेब्रुवारी 2025 – महाअंतिम फेरी
निकालाची घोषणा
4. 5 मार्च 2025 – कार्यक्रमासाठी सज्जता
जागतिक स्तरावरील प्रदर्शनासाठी आमच्यासोबत तयारी करा
पात्रतेचे निकष
संवादात्मक मनोरंजन क्षेत्रातील सर्व संस्था अथवा व्यक्तींसाठी स्पर्धा खुली असून डेव्हलपर्स, स्टुडिओ, स्टार्ट अप्स व संगणक, कन्सोल, मोबाइल गेम्स यांच्यासह गेमिंगशी संबंधित तंत्रज्ञान यामध्ये कार्यरत तंत्रज्ञान कंपन्या यांचा यामध्ये समावेश आहे. सपर्धक विकासाच्या कुठल्याही टप्प्यावरील असले तरी त्यांच्याकडे किमान कामकाजाच्या पद्धतीचा नमुना असणे आवश्यक आहे.
गेमिंग स्टुडिओ व इस्पोर्टस – वैयक्तिक विकासक, स्टुडिओ, (संगणक/मोबाइल/कन्सोल) गेम्स तयार करणारे छोटे स्टार्टअप्स आणि इस्पोर्टसमध्ये सहभागी कंपन्या/व्यक्ती यांच्यासह कार्यक्रम निर्मिती व कौशल्य व्यवस्थापन, इ स्पोर्टस क्लब व इस्पोर्टस क्षेत्रातील प्रभावी व्यक्ती
गेमिंगचा व्यवसाय – गेमिंग कंपन्यांसाठी महत्त्वाच्या कार्याचा पर्याय विकसित करणारे व्यवसाय – देयके, सुरक्षा, लाइव्ह पर्याय, प्रतिबद्धता, वितरण, अर्थकारण, स्थानिकीकरण, दर्जा हमी, कायदेविषयक व आर्थिक सेवा
स्पर्धेत सहभागी होण्याची प्रक्रिया
पहिला टप्पा – गेम सबमिशन – स्पर्धेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या स्पर्धा अर्जाच्या माध्यमातून तुमचा गेम सबमिट करुन तुम्ही हा प्रवास सुरू करू शकता
दुसरा टप्पा – तज्ज्ञांकडून मूल्यांकन – आमची तज्ज्ञांची समिती सादर झालेल्या सर्व अर्जांचे परीक्षण व छाननी करुन प्रत्यक्ष सादरीकरणात सहभागी होण्यासाठी स्पर्धकांच्या नावांची यादी तयार करेल. प्रत्यक्ष सादरीकरणानंतर परीक्षकांची समिती अंतिम निकाल जाहीर करेल.
तिसरा टप्पा – कार्यक्रमासाठीची सज्जता – विजेत्यांची नावे जाहीर झाल्यानंतर स्पर्धेचे आयोजक त्यांच्याशी संपर्क साधून विविध ठिकाणच्या प्रमुख सादरीकरणाच्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करतील व सहाय्य करतील.

द टेक ट्रम्फ – भारत पर्व 3
नवोन्मेषकांना जागतिक स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करुन देऊन जागतिक स्तरावर तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला अग्रक्रमांकावर नेण्याचे द टेक ट्रम्फ – भारत पर्व 3 या स्पर्धेचे उद्दीष्ट आहे. अत्याधुनिक नवकल्पनांना प्रोत्साहन देणे, जागतिक मंचावर आपले तंत्रज्ञान प्रदर्शित करण्याची संधी सहभागी स्पर्धकांना मिळवून देणे यावर या स्पर्धेचा भर आहे.
***
S.Kane/S.Chitnis/S.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2103610)
Visitor Counter : 28