राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बीआयटी मेसराच्या अमृत महोत्सवी समारंभाला राष्ट्रपतींची उपस्थिती

Posted On: 15 FEB 2025 1:17PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झारखंडमध्ये रांची इथे आज (15 फेब्रुवारी 2025) बीआयटी मेसरा संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात सहभागी झाल्या.

या कार्यक्रमात राष्ट्रपती म्हणाल्या, सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आधुनिकीकरणाने आपली जगण्याची पद्धत बदलून टाकली आहे. कालपर्यंत ज्याचा आपण विचारही करू शकत नव्हतो ते आज प्रत्यक्षात घडताना दिसत आहेत. कृत्रिम प्रज्ञा व मशिन लर्निंग क्षेत्रातील अपेक्षित अत्याधुनिक सुधारणांमुळे येणाऱ्या काळात अधिक परिवर्तन पहायला मिळेल.  कृत्रिम प्रज्ञा जशी वेगाने अर्थकारण बदलत आहे तसे भारत सरकार बदलत्या परिस्थितीला वेगाने सामोरे जात आहे. उच्च शिक्षण संस्थांमध्ये कृत्रिम प्रज्ञा समाविष्ट करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. 

राष्ट्रपती म्हणाल्या की, तंत्रज्ञानामुळे समाजात मोठी उलथापालथ घडून आल्यानंतर त्याच्या कमकुवत गटांवर होणाऱ्या परिणामांविषयी आपण सतर्क असले पाहिजे. यातून मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या संधी सर्वांसाठीच उपलब्ध असल्या पाहिजेत. घडून येणारे मोठे बदल सर्वांसाठीच फायदेशीर असले पाहिजेत.

राष्ट्रपती म्हणाल्या, बहुतेक वेळा आपल्या भोवतीच्या समस्यांवरील उत्तरासाठी फार मोठ्या तांत्रिक हस्तक्षेपाची गरज नसते. छोट्या प्रमाणातील, पारंपरिक पर्याय विसरू नका असा सल्ला त्यांनी तरुण पिढीला दिला. नवोन्मेषक आणि उद्योजक यांनी पारंपरिक समुदायांच्या ज्ञानाकडे दुर्लक्ष करता कामा नये असे राष्ट्रपती म्हणाल्या.

हा अमृत महोत्सवी कार्यक्रम म्हणजे बीआयटी मेसरा संस्थेचे अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक, संशोधनात्मक आणि नवोन्मेषाचे योगदान साजरे करण्याची उचित संधी आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या. अनेक क्षेत्रात ही संस्था आघाडीवर असल्याचे नमूद करताना आपल्याला आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. 1964 मध्ये याच संस्थेत भारतातील पहिला अंतराळ अभियांत्रिकी आणि अंतराळ प्रक्षेपण विभाग स्थापन झाला होता. अभियांत्रिकी उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योजकता पार्कची स्थापनादेखील याच संस्थेत 1975 मध्ये करण्यात आली होती. भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन क्षेत्रात बीआयटी मेसरा यापुढेही अमूल्य योगदान देत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

                   

***

S.Kane/S.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2103504) Visitor Counter : 36