माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सिम्फनी ऑफ इंडिया चॅलेंज 2025: वेव्हज अंतर्गत संगीतातील नैपुण्य आणि नवोन्मेष सादर करण्यासाठी एक व्यासपीठ
अव्वल तीन विजेते संघ जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेत करणार सादरीकरण
Posted On:
13 FEB 2025 9:53PM by PIB Mumbai
मुंबई, 13 फेब्रुवारी 2025
वेव्हज अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेअंतर्गत एक प्रमुख उपक्रम असलेल्या सिम्फनी ऑफ इंडिया चॅलेंज 2025 मध्ये विलक्षण सांगीतिक प्रवास अनुभवण्यासाठीचा टप्पा निश्चित झाला असून देशभरातील संगीत क्षेत्रातील उत्तमोत्तम प्रतिभेचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ सज्ज आहे. या स्पर्धेला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे 212 संगीतकारांनी आरंभीच्या टप्प्यात नोंदणी केली होती, त्या सर्वाना अत्यंत कठोर अशा निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागल्यानंतर त्यापैकी अव्वल 80 अद्वितीय शास्त्रीय आणि लोक कलाकारांची निवड करण्यात आली आहे. हे सर्व जण आता भव्य गाला फेरीत भाग घेतील.
सोलो परफॉर्मन्स अर्थात एकट्याच्या सादरीकरणाने सुरुवात करून, या कलाकारांना आरंभी चार गटात आणि नंतर आठ आणि शेवटी 10 संगीतकारांमध्ये विभागले जाईल जे मूळ संगीत तयार करतील आणि संगीताच्या प्रतिभेची अद्भुत स्वरमयी जादू निर्माण करण्यासाठी जुन्या गाण्यांना नवा साज देतील. प्रत्येकी 10 संगीतकारांपैकी अंतिम अव्वल 3 गट मेगा सिम्फनी तयार करतील आणि त्यांना अतिशय प्रतिष्ठेच्या वेव्हजच्या व्यासपीठावर सादरीकरण करण्याची संधी मिळेल. या मालिकेतील तीन विजेत्या संघांना उत्साही प्रेक्षकांसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळेल ज्यामुळे त्यांना स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळण्याबरोबरच नवीन शैली, प्रकार आणि संगीताचा प्रभाव मांडता येईल.
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) साठी सुरू केलेल्या ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज - सीझन 1’ चा भाग असलेले सिम्फनी ऑफ इंडिया चॅलेंज हे 25 आव्हानांपैकी एक आहे.
सिम्फनी ऑफ इंडिया चॅलेंज सहभागी कलाकारांना त्यांचे संगीत वैविध्यपूर्ण आणि अतिशय व्यापक स्तरावरील प्रेक्षकांसमोर सादर करण्याची अमूल्य संधी प्रदान करते, त्यांचे संगीत क्षेत्रातील करिअर सुरू करण्यासह संगीत आणि मनोरंजनाच्या गतिमान जगात त्यांना ओळख मिळवून देते.
हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी एक रोमांचकारी अनुभव ठरेल. या कार्यक्रमात प्रेक्षकांना विविध शैलींमधील विविध संगीत सादरीकरणांचा अनुभव घेता येईल आणि त्यामुळे हा कार्यक्रम संगीत प्रेमींच्या विविध अभिरुचींचा गौरव करणारा ठरेल.
‘सिम्फनी ऑफ इंडिया चॅलेंज’ कार्यक्रमाचे उद्दिष्ट सर्जनशीलता आणि संगीताच्या सीमा ओलांडणे आणि त्याचबरोबर समुदाय, नवोन्मेष आणि वाढीची भावना निर्माण करणे हे आहे. तरुण प्रतिभेला जोपासण्यासाठी आणि जगभरातील प्रेक्षकांना नवीन संगीतमय अनुभव देण्यासाठी ‘वेव्हज’ हे एक आघाडीचे व्यासपीठ म्हणून सज्ज आहे.
महावीर जैन फिल्म्सच्या सहकार्याने दूरदर्शन या चॅलेंज कार्यक्रमाची निर्मिती करत आहे तर प्रसिद्ध दिग्दर्शिका श्रुती अनिंदिता वर्मा यांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. प्रतिभावंत गौरव दुबे यांनी आयोजित केलेल्या या चॅलेंजचे परीक्षक पद्मश्री सोमा घोष, गायिका श्रुती पाठक आणि लोक गायिका स्वरूप खान आहेत. या चॅलेंजमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय मार्गदर्शक पर्कशनवादक तौफिक कुरेशी, बासरीवादक पद्मश्री रोणू मजुमदार, व्हायोलिनवादक सुनीता भुयान, तालवादक पंडित दिनेश, तन्मय बोस, लेस्ली लुईस आणि बासरीवादक राकेश चौरसिया हे या मालिकेचे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
‘सिम्फनी ऑफ इंडिया चॅलेंज’ हा कार्यक्रम लवकरच दूरदर्शनवरून प्रसारित केला जाईल. अधिक माहितीसाठी आणि कार्यक्रमाच्या अपडेट्ससाठी, कृपया www.wavesindia.org या WAVES अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.


वेव्हज बद्दल अधिक माहिती :
जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट (वेव्हज) चे उद्घाटन संस्करण 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसारण, डिजिटल मीडिया, जाहिरात, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, ई-स्पोर्ट्स आणि संगीत क्षेत्रांमध्ये संवाद घडवून आणण्यासाठी WAVES ला एक प्रमुख जागतिक व्यासपीठ म्हणून परिकल्पित केले आहे. वेव्हज 2025 मध्ये प्रसार माध्यमे आणि मनोरंजन उद्योगासाठी एक अग्रगण्य गुंतवणूक स्थळ म्हणून भारताची भूमिका अधिक मजबूत करण्यासाठी काही अभूतपूर्व घोषणा आणि उपक्रम सादर केले जातील.
S.Patil/B.Sontakke/S.Mukhedar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2103008)
Visitor Counter : 21