सांस्कृतिक मंत्रालय
महाकुंभ 2025 मध्ये आतापर्यंत 45 कोटी भाविकांचा सहभाग
महाकुंभ 2025 मध्ये भाविकांच्या उपस्थितीचा विक्रमी उच्चांक
Posted On:
11 FEB 2025 5:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025
महाकुंभ 2025 मध्ये 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत पवित्र स्नानासाठी 45 कोटींहून जास्त भाविकांच्या सहभागाची नोंद झाल्यामुळे हा सोहळा इतिहासातील सर्वाधिक मोठा धार्मिक सोहळा ठरला आहे. या कुंभ मेळ्याच्या एकूण 45 दिवसांच्या कालखंडात 45 कोटी भाविक उपस्थित राहतील, अशी राज्य सरकारला अपेक्षा होती. मात्र केवळ एका महिन्याच्या काळातच भाविकांच्या संख्येने हा आकडा ओलांडला असून हा कुंभ मेळा समाप्त होण्यासाठी अद्यापही 15 दिवस बाकी आहेत. आध्यात्मिक महत्त्व, भव्य धार्मिक विधी आणि सोहळ्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे हा कुंभ मेळा गर्दीचे व्यवस्थापन, स्वच्छता आणि डिजिटल सुविधा यामध्ये नवे मापदंड प्रस्थापित करणारा ठरला आहे.

45 कोटी इतक्या विक्रमी संख्येने भाविकांचा ओघ असल्याने गर्दीच्या व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे. यापुढचे अमृत स्नान 12 फेब्रुवारी 2025 रोजी माघ पौर्णिमा स्नानाच्या दिवशी आहे.गुरु बृहस्पतींच्या पूजनाशी संबंध असल्याने आणि या दिवशी या संगमावर स्वर्गातून गंधर्व भूलोकी उतरतात अशी हिंदू पुराणातील धारणा असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. माघ पौर्णिमा स्नानाच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन सुविहित होण्याकरिता राज्य सरकारने मेळ्याच्या परिसरात 11 फेब्रुवारी 2025 च्या सकाळपासून वाहनबंदी क्षेत्र घोषित केले आहे आणि केवळ अत्यावश्यक आणि आकस्मिक सेवांच्या वाहनांनाच तिथे प्रवेश दिला जाईल.

महाकुंभ 2025 ला जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी भारतीय रेल्वे आपल्या सेवा पूर्ण क्षमतेने चालवत आहे. 9 फेब्रुवारी रोजी सुमारे 330 रेल्वे गाड्यांमधून 12.5 लाख भाविक दाखल झाले तर 10 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत आणखी 130 गाड्या रवाना झाल्या. 12 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या अमृत स्नानाच्या तयारीचा अधिकारी आणि केंद्रीय मंत्र्यांनी आढावा घेतला. प्रयागराज जंक्शनसह सर्व आठ रेल्वे स्थानकांचे परिचालन पूर्ण क्षमतेने केले जात आहे तर गर्दीच्या व्यवस्थापनासाठी स्नानाच्या प्रमुख तारखांच्या काळात प्रयागराज संगम स्थानक तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे.
विविध संस्थांच्या सहकार्याने राज्य सरकारने एक बहु-स्तरीय सुरक्षा आणि देखरेख प्रणाली तैनात केली आहे. एआय-आधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे, ड्रोन टेहळणी आणि रियल टाईम ऍनालिटिक्सच्या वापरामुळे महत्त्वाच्या जागी भाविकांची सुरक्षित ये-जा सुनिश्चित झाली आहे.स्नान घाटांवर भाविकांना सहजतेने स्नान करता यावे यासाठी प्रशासनाने डिजिटल टोकन प्रणालीचा वापर सुरू केल्यामुळे, स्नानासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी टाळता आली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांसाठी विशेष सुविधा करण्यात आल्या, ज्यामुळे हा कुंभ मेळा आध्यात्मिक अनुभूती देणारा एक सर्वसमावेशक सोहळा ठरला.
महाकुंभ 2025च्या ऐतिहासिक महत्त्वामध्ये भर टाकत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 10 फेब्रुवारी 2025 रोजी धार्मिक विधींमध्ये सहभागी झाल्या. त्यांच्या भेटीमध्ये त्रिवेणी संगमावरील पवित्र स्नानाचा समावेश होता, ज्यामुळे या सोहळ्याचे आध्यात्मिक महत्त्व सर्वोच्च शासन पातळीवर पोहोचले. राष्ट्रपतींनी प्रमुख धार्मिक स्थळांवर वंदन केले आणि संत आणि भाविकांसोबत संवाद साधला. राष्ट्रपती मुर्मू यांच्या व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या व्यतिरिक्त अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी संगमावर पवित्र स्नान केले. बॉलिवुड आणि भारतीय क्रीडा क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्तीमत्वे देखील या सोहळ्यात तसेच धार्मिक विधींमध्ये सहभागी झाले आणि सर्वसामान्य जनतेसोबत संवाद साधला. आदरणीय संत आणि आध्यात्मिक नेत्यांच्या सहभागामुळे या सोहळ्याचे पावित्र्य आणि भव्यता आणखी वृद्धिंगत झाले आहे.
कल्पवास म्हणजे उपवास आणि आध्यात्मिक नियमांचे पालन करण्याचा काळ असून महाकुंभ दरम्यान याला खूप महत्त्व आहे. या वर्षी, 10 लाखांहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर कल्पवास ठेवला असून माघ पौर्णिमेला शेवटचे पवित्र स्नान, पूजन आणि दान देऊन याची सांगता होईल. परंपरेनुसार कल्पवासी सत्यनारायण कथा वाचन , हवन पूजा आणि त्यांच्या तीर्थपुरोहितांना दान अर्पण करतील. कल्पवासाच्या सुरुवातीला पेरलेली बार्ली गंगेत विसर्जित केली जाते आणि तुळशीचे रोप दैवी वरदान म्हणून घरी नेले जाते. बारा वर्षांच्या कल्पवास चक्राची महाकुंभात सांगता होते आणि त्यानंतर आपापल्या गावांमध्ये गावजेवण घातले जाते.

इथल्या व्यापक आरोग्य सेवांद्वारे 7 लाखांहून अधिक यात्रेकरूंना वैद्यकीय सेवा मिळाली आहे. यामध्ये 23 ॲलोपॅथिक रुग्णालयांमध्ये 4.5 लाखांहून अधिक व्यक्तींवर उपचार, 3.71 लाखांहून अधिक लोकांच्या पॅथॉलॉजी चाचण्या आणि 3,800 किरकोळ आणि 12 मोठ्या यशस्वी शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, 20 आयुष रुग्णालयांनी 2.18 लाखांहून अधिक यात्रेकरूंना आयुर्वेद, होमिओपॅथी आणि निसर्गोपचार उपचार प्रदान केले आहेत. एम्स दिल्ली, आयएमएस बीएचयू मधील तज्ञ आणि कॅनडा, जर्मनी आणि रशियामधील आंतरराष्ट्रीय तज्ञ एकत्र आल्यामुळे जागतिक दर्जाची आरोग्य सेवा मिळत आहे. पंचकर्म, योग चिकित्सा, आणि आरोग्य विषयक जागरूकता सामग्रीचे वितरण यासारख्या सेवांना चांगला प्रतिसाद मिळाला असून इथे उपस्थित असलेल्यांना निरामय आरोग्याची अनुभूती होत आहे.

यंदाचा कुंभमेळा आतापर्यंतचा सर्वात स्वच्छ कुंभमेळा बनवण्याच्या उद्देशाने, प्रशासनाने कठोर कचरा व्यवस्थापन योजना लागू केली आहे. परिसर कचरामुक्त रहावा यासाठी 22,000 हून अधिक स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नदीचे पाणी स्वच्छ आणि पवित्र स्नानासाठी योग्य राहावे यासाठी मोठ्या प्रमाणावर जल प्रक्रिया उपक्रम राबविण्यात आला आहे. प्लास्टिकवर बंदी आणि जैविक पद्धतीने विघटन होणाऱ्या कटलरीचा वापर यासारख्या पर्यावरणपूरक पद्धतींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. कुंभ मैदानावर उभारण्यात आलेले हजारो बायो-टॉयलेट आणि स्वयंचलित कचरा विल्हेवाट युनिट्स यामधून स्वच्छ भारत मिशनचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.
संपूर्ण कार्यक्रमात, शास्त्रीय नृत्य सादरीकरण, लोकसंगीत आणि अध्यात्मिक प्रवचने असे सांस्कृतिक कार्यक्रम केंद्रस्थानी असून भाविक आणि अभ्यागतांना मंत्रमुग्ध करतात. पद्म पुरस्कार विजेते आणि विविध राज्यांतील लोक कलाकारांसह नामवंत कलाकार कथ्थक, भरतनाट्यम तसेच लावणी आणि बिहू यांसारख्या पारंपारिक लोकनृत्यांमधून भारताच्या विविध परंपरांचे दर्शन घडवतात. कुंभमेळा दरम्यान विविध साहित्य संमेलने देखील आयोजित केली जात आहेत. जेथे विद्वान मंडळी प्राचीन धर्मग्रंथ, वैदिक तत्त्वज्ञान आणि समकालीन काळात सनातन धर्माची प्रासंगिकता यावर चर्चा करतात. कारागिरांनी हस्तकला, हातमाग उत्पादने आणि धार्मिक कलाकृतींचे स्टॉल लावले असून मेळ्याला एका चैतन्यमय सांस्कृतिक संगमात रूपांतरित करतात.

महाकुंभ 2025 हे केवळ धार्मिक संमेलन नाही; हे सूक्ष्म नियोजन, सांस्कृतिक जतन आणि तंत्रज्ञान नवोन्मेष यांचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. 45 कोटींहून अधिक भाविकांनी आतापर्यन्त सहभाग नोंदवला असून आणि समारोपापूर्वी आणखी लोक येतील अशी अपेक्षा आहे. हा कुंभ आधुनिकता आणि परंपरा यांची सांगड घालण्याच्या भारताच्या क्षमतेचा दाखला असून सर्वांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध आणि निरंतर अनुभव सुनिश्चित करत आहे.
संदर्भ
माहिती आणि जनसंपर्क विभाग , उत्तर प्रदेश सरकार
https://kumbh.gov.in/en/bathingdates
महा कुंभ मालिका: 23/लेख
पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
N.Chitale/S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2101824)
Visitor Counter : 120